बुधवार, २५ मे, २०२२

space आणि स्थान

काल बारावीचा निकाल लागला. आज वृत्तपत्रात सगळीकडे एकच प्रश्न- तू कोण होणार आहेस? उत्तरंही नेहमीचीच. गेली कित्येक वर्ष यात काहीही वेगळं दिसत नाही. तू कोण होणार आहेस? या प्रश्नावर, मी माणूस होणार आहे, मी संत होणार आहे, मी ईश्वर होणार आहे; असं उत्तर कोणी दिल्याचं आठवत नाही. तुम्ही म्हणाल- अहो, तो प्रश्न अन ते उत्तर अगदी छोट्याशा मर्यादित अर्थानेच असतं. त्यात कशाला बाकीच्या गोष्टी घुसवता. हा तर्क अन युक्तिवाद अगदी बरोबर आहे अन तो मला पटतोही. मात्र त्यावरच माझा आक्षेपही आहे. एखादी गोष्ट पटणे, म्हणजे ती योग्य असणे नव्हे. माझा आक्षेप हा की, हे मर्यादितपण, हे तात्पुरतेपण आपण शिक्षणाचा, शिक्षण व्यवस्थेचा; एवढेच नव्हे तर जीवनाचा भागच बनवून टाकला आहे. हे मर्यादितपण, हे तात्पुरतेपण सगळ्या समस्यांचे मूळ आहे. आयुष्यातल्या कोणत्याही वळणावर, कोणत्याही टप्प्यावर, कोणत्याही थांब्यावर, अथवा कोणत्याही क्षणावर; व्यापक जीवनादर्श पुढे ठेवणंच आम्ही विसरलो आहोत अथवा आम्ही ते सोडून दिले आहे. परिणामी प्रेरणा खुंटल्या, विचारशीलता अधू झाली. चतुराई वाढली, पण समंजसपणा- विवेकीपणा- विचारशीलता- लोपली. चतुराई वाढल्याने क्षमता, कौशल्य इत्यादी वाढले. पण कशासाठी हे सारे, याचा विवेक गमावला आणि भेसूर निरर्थकता जन्माला घातली. ज्यांना जगण्याचे प्रश्न आहेत त्यांचे असमाधान समजून तरी घेता येईल, पण ज्यांना खाणेपिणे, राहणेजगणे, औषधपाणी यांच्या समस्या नाहीत त्यांचे असमाधान कसे समजून घ्यायचे? हे असमाधान एकतर चुकीच्या मार्गाने गेल्याने आलेले असते किंवा आतील आध्यात्मिकता ढवळून निघाल्याने आलेले असते. दोन्ही गोष्टी व्यापक जीवनादर्शाच्या अभावी आलेल्या असतात. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर दिली जाणारी समर्याद उत्तरे पुढे गेल्यावर कोणत्या आकांक्षा निर्माण करतात? मला जगातील सगळ्यात मोठा डॉक्टर व्हायचे आहे, मला सगळ्यात मोठा व्यापारी व्हायचे आहे, सगळ्यात मोठा वकील व्हायचे आहे, सगळ्यात मोठा अमुक व्हायचे आहे, सगळ्यात मोठा तमुक व्हायचे आहे... ना आर्यभट्टाने, ना कणादाने, ना सुश्रुताने, ना न्यूटनने, ना आईनस्टाईनने, ना शंकराचार्यांनी, ना येशूने, ना रामाने, ना कृष्णाने; कोणीही मला जगात सगळ्यात मोठे अमुक व्हायचे वगैरे ठरवले नव्हते. ते स्वत: जे होते तेच राहिले अन स्वत: अधिक अधिक उंच, व्यापक, सखोल होत राहिले. `कोणापेक्षा' हा विषयच त्यांच्या गावी नव्हता. आजही काही लोक हे स्वत:सारखे राहण्याचे अन स्वत: उंच, व्यापक, सखोल होत जाण्याचे तत्व बोलतात. मात्र ज्यांची नावे वानगीदाखल वर घेतली आहेत त्यांच्यात अन या लोकात एक मूलभूत फरक आहे. ते लोक स्वत: मोठे झालेत दुसऱ्यांसाठी, हे लोक स्वत: मोठे होतात स्वत:साठी. `कशासाठी' या प्रश्नाच्या उत्तरात सगळा दृष्टीकोन सामावलेला असतो. म्हणूनच आमच्या पूर्वजांनी घोषणा दिली- `कृण्वन्तो विश्वमार्यम' सगळ्या जगाला आर्य करण्याची, सगळ्या जगाला उन्नत करण्याची. `मी' माझी space आणि माझे स्थान यांची काळजी करतानाच, बाकीच्यांची space आणि बाकीच्यांचे स्थान यांचीही काळजी घ्यायला हवीच. मी जगातला सगळ्यात मोठा अमुक होईन असे कोणी म्हणतो तेव्हा तो अन्य कोणाची तरी space आणि स्थान लाटत असतो एवढे खरे. आयुष्याच्या सगळ्या वळणांवर व्यापक जीवनादर्शांची चर्चा म्हणूनच व्हायला हवी.

- श्रीपाद कोठे

नागपूर

गुरुवार, २६ मे २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा