सोमवार, ३० मे, २०२२

हिंदुत्वाचा आर्थिक आशय

आजचा भाजप हा हिंदुत्व आणि उपभोगवाद, भांडवलशाही यांचे एकीकरण असलेला राजकीय पक्ष आहे. हिंदुत्वाचा राजकीय आशय, काही प्रमाणात हिंदुत्वाचा सामाजिक आशय समाजात स्थिर झाले आहेत आणि भाजपातही स्थिर झाले आहेत. मात्र हिंदुत्वाचा आर्थिक आशय अजून हिंदुत्वनिष्ठांनाच नीट आकलन झालेला नाही. हिंदुत्वाचे रक्षण आणि अभिमान यासाठी ज्याप्रमाणात हिंदू सक्रीय आहे त्या प्रमाणात हिंदुत्वाचा आर्थिक आशय आणि आयाम समजून घेण्याची तयारी अद्याप नाही. एकात्म मानववादाच्या आधारे हिंदुत्वाचा आर्थिक आशय समाजात रुजविण्यात हिंदुत्वनिष्ठ अपयशी ठरले आहेत. एकात्म मानववाद म्हणजे अंत्योदय अशी घोषणा देऊन भाजपने स्वत:चे आणि समाजाचेही नुकसान केले आहे. अमक्याने अमके म्हटले आहे, अशी दोन चार कोटेशंस तोंडावर फेकण्याने काही होऊ शकत नाही. दत्तोपंत ठेंगडी यांनी `तिसरा मार्ग' लिहिला म्हणून जग बदलत नाही. किंवा गुरुजी, दत्तोपंत ठेंगडी, दीनदयाळ उपाध्याय किंवा अगदी विवेकानंदांपासून सगळे हिंदुत्वनिष्ठ महान व्हावेत म्हणूनही `तिसरा मार्ग' चालण्याची गरज नाही. ते महान ठरतील वा लहान; परंतु मानवजातीच्या भल्यासाठी हिंदुत्वाचा आर्थिक आशय आणि त्याचे आयाम मध्यवर्ती मानवी जीवनाचा भाग व्हायला हवेत. याची जाणीव कितपत आहे?

आज संपूर्ण जगात उपभोगवाद आणि भांडवलशाही यांचाच बोलबाला आहे, हा काही तर्क वा विश्लेषण होऊ शकत नाही. प्रश्न आहे तो - हा बोलबाला किती योग्य वा कल्याणकारी आहे हा? तसा तो नसेल तर तो चुकीचा मार्ग टाकून देण्याचे धाडस आणि शहाणपण दाखवावे लागेल. उगाच टिमक्या वाजवण्यात अर्थ नाही. स्वास्थ्य नीट राहावे याऐवजी औषधे खाण्याला प्राधान्य देणारी माणसाची मानसिकता, त्याची ही सुखलोलुपता, त्याचे हे निर्ढावलेपण चूक आहे तर चूकच म्हटले पाहिजे. चूक म्हणून काही होणार आहे का? हो. होणार आहे. काही प्रमाणात का होईना, मानवाचा विवेक कायम राहणार आहे. परंतु `काय होणार चुकीला चूक म्हणून' ही वृत्ती ठेवली तर विवेक गमावायला वेळ लागणार नाही आणि एकदा विवेक गमावला की मानवाला भविष्य नाही.

- श्रीपाद कोठे

३१ मे २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा