हिंदू मंदिरांच्या संपत्तीवरून सध्या वाद सुरू झाला आहे. या निरर्थक आणि चुकीच्या वादासाठी हिंदुत्वाचे पाठीराखे जबाबदार आहेत हे स्वीकारण्यास अडचण येऊ नये. काँग्रेस पक्षाने मंदिरांची संपत्ती देशासाठी वापरावी अशी अपेक्षा व्यक्त केल्यामुळे त्याला विरोध केलाच पाहिजे; ही भावनाच विचित्र आणि चुकीची आहे. काँग्रेस हिंदुत्वविरोधी आहे की नाही यावर वेगळी चर्चा होईल पण त्याने उपस्थित केलेल्या विषयावर चर्चा करताना, त्याला विशिष्ट दिशा देताना; त्याच्या side effects चा विचार करायचा की नाही? राजकीय प्रतिक्रियेची आमची उबळ इतकी अनिर्बंध व्हावी की, आम्ही सारासार विचाराला तिलांजली द्यावी? समजा मंदिरांच्या संपत्तीचा उपयोग सरकारने केला तरी तो अंदाधुंद राहील का? तसा वापर काँग्रेसच्या तिजोरीत पैसा ओतेल का? इथल्या कामांसाठी, लोकांसाठी वापरला जाणारा पैसा इटलीला कसा काय पोहोचेल? आपण काय बोलतो, काय नाही; कशाचंही काही भान राहू नये हे लज्जास्पद आहे.
दुसरा मुद्दा येतो, केवळ हिंदू मंदिरांची संपत्ती का? याच्याही विविध बाजू आहेत. काँग्रेसने हिंदू मंदिरांच्या संपत्तीचा उपयोग करावा अशी अपेक्षा केली असेल तर सरकारने तोच विषय पुढे नेऊन, सगळ्या धार्मिक संस्थांच्या संपत्तीच्या उपयोगाची एखादी योजना बनवावी. त्याऐवजी निरर्थक तू तू मी मी आवडणं हे आमचा सामाजिक स्तर खालावल्याचं चिन्ह आहे.
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे - संपत्तीविषयीची दृष्टी. संपत्तीविषयी एक आध्यात्मिक दृष्टी प्रतिपादन करणाऱ्या हिंदूंनी त्या दृष्टीला तिलांजली द्यावी का? व्यवहार म्हणून, बाकीचे अमुक अमुक पद्धतीने वागतात म्हणून; वगैरे वगैरे वगैरे तर्क देत आपण आपली दृष्टी, भूमिका, विचार, भाव गंगार्पण करायचे का? जीवनाच्या सगळ्याच अंगांविषयी असे धर्मसंकट उभे राहू शकते. नव्हे उभे झालेले आहे. मानवी जीवनाला सर्वार्थाने वर उचलून घेणे, मानवी मनाला, मानवी भावनांना, मानवी जाणिवांना, मानवी जीवनाला वर उचलणे; अधिक परिष्कृत करणे; मानवाची उंची आणि व्याप्ती असीम वाढवणे; हे हिंदुत्व आहे. टुकार घाणेरड्या राजकारणापायी त्याला चूड लावायची का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. राजकीय खाज बोळवण्यासाठी या समाजाच्या, या देशाच्या चारित्र्याचा DNA बदलून टाकण्यात आम्हाला लाज वाटावी की वाटू नये, हा मूळ मुद्दा आहे.
एक निश्चित समजून चालावे की हिंदुत्वाचे हे उर्जस्वल चारित्र्य कोणाचेही कर्तृत्व नसून; या समग्र अस्तित्वाच्या मूळ तत्वातून ते आलेलं आहे. अशा अब्जावधी मानवी कर्तृत्वान्ना आणि गलिच्छ राजकारणाला हवेत भिरकावून देऊन पुन्हा त्या उर्जस्वल चारित्र्याची स्थापना ते स्वतःच करेल.
स्वामी विवेकानंद म्हणतात - मी त्या ईश्वराचा सेवक आहे ज्याला माणूस म्हणून ओळखले जाते. मंदिरांचे सोने चांदी या ईश्वरासाठी उपयोगात आणण्यात वाईट वा चुकीचे काय आहे? जोवर सूर्य चंद्र आहेत तोवर आपल्या नावाने सोने चांदीचे ढीग जमा करणे हा कोणता धर्म, हे कोणते आध्यात्म, हे कोणते शहाणपण? तारतम्य आणि विवेकाने मंदिरांची संपत्ती देशासाठी वापरण्यात काहीही गैर नाही. मंदिरे तसा उपयोग करीत असतातच तो शेवटल्या रुपयांपर्यंत करून त्याग आणि समर्पणाचा, अध्यात्माचा आदर्श स्थापित करायलाही हरकत नाही. भावनावेगात वा आवेशात न येता याबद्दल भूमिका घ्यायला हवी.
- श्रीपाद कोठे
शुक्रवार, १५ मे २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा