सध्या पेट्रोलची दरवाढ आणि देशाचा विकास, कल्याणकारी योजना आदींचे अगदी रण माजले आहे. अतिशय गुंतागुंतीच्या या विषयांकडे आपण पुरेशा गांभीर्याने पाहतो का हा मुद्दा आहे. काही ठळक मुद्दे विचारार्थ-
१) विकास आणि योजना यांचे दाखले देऊन जेव्हा पेट्रोल दरवाढीचे समर्थन केले जाते तेव्हा एक गोष्ट विसरली जाते की, ज्यांच्यासाठी योजना केल्या जातात त्यांनाच पुन्हा दरवाढीचे चटके बसतात. गोळाबेरीज शून्य. मग योजनांची टिमकी कशाला वाजवायची? उदा.- रस्ते बांधण्यासाठी पैसे लागतात. त्यासाठी दरवाढ. ठीक. मान्य. पण त्या रस्त्यावरून एस.टी.त बसून येणारा आदिवासी वा ग्रामवासी एस.टी. भाडेवाढीचा बळी ठरतोच. अशी अनेक उदाहरणे देता येतील. एका नळाने टाके भरायचे आणि दुसरे नळ उघडून ठेवायचे, अशी ही स्थिती आहे.
२) विकास आणि कल्याणकारी योजना यांचा अर्थ काय? एखाद्याच्या मनातील कल्पनाचित्र, स्वप्नं, जीवनशैली, गरजा हे सारे आज आम्ही एकत्र करून टाकले आहे. हे चुकीचे आहे. चार पदरी, सहा पदरी रस्ते हा विकास आहेच, पण यातील किती गरजेचे आहेत आणि किती स्वप्न याचा ताळेबंद मांडायचा की नाही? शहरीकरण म्हणजे फक्त महानगरे का? आटोपशीर शहरे हा विचार का करू नये?
३) महसूल केवळ पेट्रोल वा अन्य एखाद्या वस्तूतूनच मिळतो का? एखाद्या वस्तूतून अधिकाधिक किती महसूल मिळवायचा याचा विवेक हवा की नाही? भ्रष्ट लोकांची जप्त करण्यात येणारी संपत्ती, जप्त केली जाणारी संपत्ती यांची विकासासाठी लागणाऱ्या महसुलाच्या संदर्भात चर्चा का होत नाही? एखाद्या गोष्टीचा सर्वंकष विचार का नाही? आजही लुना वा त्यासारखी वाहने चालवून कसेबसे जगणारे असंख्य लोक आहेत. त्यांचाही विचार हवा की नाही?
४) धोरणे आणि योजना आदींचा विचार आपल्या साधनांच्या आधारे करायचा की दुसऱ्यांच्या साधनसंपत्ती आणि मापदंडावरून? अमेरिका, रशिया, आखाती देश यांच्याकडे स्वत:चे पेट्रोल आहे. आपल्याला निसर्गाने कच्चे तेल दिलेले नाही. हे वास्तव स्वीकारून जगायचे की नाही? मग पर्याय काय? पशुउर्जेचा विचार का नको? लोक हसतील, जग हसेल, नावं ठेवेल, कसतरी वाटतं; या कारणांसाठी पशुउर्जा नाकारणे योग्य का म्हणायचे? बैल, घोडे, गाढव, खेचर यांचा अधिकाधिक वापर करण्याचा विचार का नको? त्यातील अमानुषता काढून टाकून, त्यासाठीचे उपाय करून त्यांचा वापर करायला काय हरकत आहे? बिनकामाचा माणूस भार असतो, मग बिनकामाचे पशू भार नाहीत का? तसेही बैलांना गाडीला किंवा नांगराला जुंपत असत, गायींना नाही. ही मानवीय करुणाच होती. तिचा अधिक विस्तार करून आणि त्याचवेळी या करुणेचा अतिरेक टाळून पशुउर्जा वापरता येऊ शकते. मातीच्या रस्त्यांपेक्षा डांबरी रस्त्यांवर मोठ्या लोखंडी चाकाच्या गाड्या कमी कष्टात चालू शकतात. शिवाय renewable energy. `महानगरे' याऐवजी आटोपशीर शहरे आणि सायकलींचा वापर. जग काय म्हणेल ते म्हणू द्यावे. आपल्याला आपले जगणे महत्वाचे, हा विचार करण्यात चूक काय? प्रतिष्ठेच्या भिकार कल्पना टाकणे जड का वाटावे?
५) ७० वर्षात काही झाले नाही म्हणून ५ वर्षात सारे काही करून टाकण्याचा आक्रस्ताळेपणा कशासाठी? असा आक्रस्ताळेपणा करूनही अपेक्षित ते साध्य होईल याची शाश्वती आहे का? समाजाची गती, वृत्ती, स्वभाव याकडे दुर्लक्ष करून चालणे योग्य आहे का? समाजाची गती, वृत्ती, स्वभाव यातील परिवर्तन अशा घिसाडघाईने होत नसते, त्याचा थोडा थोडा प्रयत्न करत राहावे लागते. आपला समाज मंद गतीने चालणारा असेल तर ते स्वीकारले पाहिजे. तिसऱ्या वर्गाच्या विद्यार्थ्याला सहा महिन्यात पहिला मेरीट आणण्याचा प्रयत्न स्पृहणीय म्हणता येत नाही.
- श्रीपाद कोठे
३१ मे २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा