सोमवार, ९ मे, २०२२

दान

एक कोटी रुपये दान देऊ शकतील असे एखाद कोटी लोक भारतात नक्कीच आहेत. त्यांनी ते द्यावे. दान हा अर्थचक्राचा महत्वाचा घटक व्हायला हवा. आज ती कल्पनाही केली जात नाही. जे कल्पना करतात वा करू शकतात ते बोलण्या, लिहिण्याला, मांडण्याला बिचकतात. कोण काय म्हणेल? कोण हसतील? कोण टर उडवतील? कोण अशास्त्रीय ठरवेल? याचा विचार त्यांच्यावर स्वार असतो. दान हा अर्थचक्राचा घटक, हा हिंदू वा भारतीय विचार आहे. सगळ्या गोष्टींना हिंदू वा भारतीय tag लावणारे बहुतांश लोक हिंदू वा भारतीय ethos आणि मूल्यांचा विचार करत नाहीत हे दुर्दैवी वास्तव आहे.

'पोटाला आवश्यक तेवढ्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्याहून अधिक बाळगणारा चोर आहे' हा हिंदू अर्थशास्त्राचा विचार प्रसिद्ध तत्त्वचिंतक दत्तोपंत ठेंगडी मांडत असत. डॉ. हेडगेवार यांनीही १९२० च्या काँग्रेस अधिवेशनात स्वयंसेवक दलाचे प्रमुख म्हणून विषय नियामक समितीकडे पाठवलेल्या एका प्रस्तावात 'जगाची भांडवलशाहीतून मुक्तता' असा शब्दप्रयोग केला होता. स्वामी विवेकानंद यांनी सरकारी सवलतींपेक्षा दानाची पद्धत समाजधारणेला अधिक चांगली असल्याचे म्हटले आहे. आज मात्र दान, गरिबांचा विचार, संपत्तीची अधिकतम मर्यादा, न्याय्य वाटप; इत्यादी गोष्टी हिणकस म्हणून पाहिल्या जातात. साम्यवादावर प्रहार करणारे हिंदुत्ववादी कळत नकळत भांडवलशाही स्वीकारतात. हे दोन्ही विचार समाजाला, मनुष्य जीवनाला आणि अर्थचक्रालाही लाभकारी नाहीत; हे एकतर त्यांना समजत नाही वा समजून घ्यायचे नाही. विचारांचे आणि दृष्टीचे हे परिवर्तन कसे आणता येईल ही मोठी समस्या आहे.

पुष्कळ गोष्टी स्पष्टपणे बोलता यायला हव्यात. एखादी गोष्ट स्पष्टपणे बोलणे म्हणजे दुष्टपणा नसतो. हे समीकरण डोक्यातून काढून टाकायला हवे. स्वामी विवेकानंद आणि अमेरिकेतील जगप्रसिद्ध उद्योजक जॉन डी. रॉकफेलर यांच्या दोन भेटी आणि संवाद हा या संदर्भात दिशादर्शक आहे. रॉकफेलर हे अब्जोपती उद्योजक काही लोकांच्या आग्रहास्तव विवेकानंदांना भेटायला गेले. त्यावेळी स्वामीजींनी त्यांना स्पष्ट सांगितले की, तुम्हाला मिळालेली संपत्ती तुमची नाही. ती लोकांच्या कल्याणासाठी तुमच्याकडे देण्यात आली आहे. रॉकफेलर यांना याचा राग आला. ते निघून गेले. काही दिवसांनी पुन्हा आले आणि त्यांनी आपण एका संस्थेला दिलेल्या दानाची माहिती सांगितली. अन ते स्वामीजींना म्हणाले, 'याने तुमचे समाधान होईल अशी आशा करतो.' त्यावर स्वामीजी त्यांना म्हणाले, 'तुम्हीच मला धन्यवाद द्यायला हवेत.' त्यानंतर १८९५ पासून रॉकफेलर यांच्या कल्याण निधीला सुरुवात झाली. 'पैसा मिळवणे आणि जमा करून ठेवणे हा मानवी जीवनाचा उद्देश नाही' असे मत त्यांनी नंतरच्या काळात व्यक्त केले होते.

या घटनेतील संपूर्ण आशय आमच्या जीवन जाणिवांचा, सिद्धांतांचा, व्यवस्थांचा, विचारांचा, चर्चांचा विषय व्हायला हवा. नुसत्या वांझ राजकीय चर्चांएवढे ते सोपे नाही. कठीण गोष्टींना सामोरे जाणे हे केवळ रणांगणावर आवश्यक असते असे नाही. ते वैचारिक, भावनिक रणांगणावर सुद्धा आवश्यक असते. असे योद्धे पुढे यायला हवेत.

- श्रीपाद कोठे

रविवार, १० मे २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा