सकाळी उठल्यावर न चुकता, `कराग्रे वसते लक्ष्मी', `समुद्रवसने देवी' आणि `सर्वेपि सुखिनः सन्तु' म्हणून मगच अंथरूणातून उठायचं; हा नेम आहे. संस्कार म्हणा, सवय म्हणा, भोळेपणा म्हणा की बावळटपणा. पण आता त्याला एक गोष्ट जोडण्याचं ठरवलं आहे. रात्री झोपताना एक प्रार्थना करायची, `या जगात जनावरांच्या रुपात राहणारा कोणीही माणूस उद्या सकाळी झोपेतून उठू नये.' याचं जे काही पाप लागेल, नरकात जावं लागेल आणि आणखीन काय काय असेल ते सगळं भोगायची तयारी करून ही प्रार्थना करणार आहे. जनावरांच्या रुपात राहणारा माणूस याची सरळ सोपी व्याख्या आहे- `स्वत:शिवाय अन्य कोणाचा विचार न करणारा माणूस.'
इतक्या टोकाचा विचार करण्याचं कारण जुनंच- कानठळ्या बसवणारा डी.जे. नावाचा प्रकार. विज्ञान तंत्रज्ञानाने लावलेला अणुबॉम्बपेक्षा त्रासदायक प्रकार म्हणजे डी.जे. अणुबॉम्ब एका क्षणात साफ करतो. स्पष्ट शत्रुत्व घोषित करतो. इथे सगळाच मामला तिरपागडा. डी.जे. लावणारा शत्रूही नसतो आणि तरीही प्रचंड वैताग देतो. बरे पोलिसांना फोन केला तर त्यांचे उत्तर असते की काय करायचे, रात्री ११ वाजेपर्यंत काही करता येत नाही. कायदे करणारेही इतके बिनडोक कसे काय असू शकतात हा प्रश्नच आहे. अरे, रात्री ११ वाजेपर्यंत काय त्रास होत नाही का? आणि एखाद्याचा आनंद हा दुसऱ्याला त्रास देणाराच का असावा? मागचा पुढचा कोणताही विचार न करता असे डी.जे. लावणारे, त्यांना परवानगी देणारे, तसे कायदे बनवणारे हे सगळेच राक्षस आहेत.
याविरुद्ध काय आणि कशी मोहीम करावी हा गहन प्रश्न आहे. अनेकांचे अनेक निहित स्वार्थ, दुराग्रह, अंगातली मस्ती अशा अनेक बाबी आहेत. बरे कोणत्या कामगार संघटना, विद्यार्थी संघटना, वेगवेगळी मंडळे, वृत्तपत्रे, अन्य प्रसार माध्यमे वगैरे कोणीही याबद्दल काहीही बोलायला, करायला तयार नाहीत. यासंबंधात काय होईल, काय नाही हा भाग पुढचा पुढे. मी मात्र आजपासूनच हे लोक उद्या सकाळी उठूच नयेत, अशी प्रार्थना करणार आहे. जगभरातील ज्यू लोक १२०० वर्षे रोज प्रार्थना करीत असत, उद्या सकाळी आपण जेरुसलेम मध्ये भेटू. १२०० वर्षांनी त्यांची प्रार्थना सफल झाली म्हणतात. माझी प्रार्थनाही जेव्हा सफल व्हायची तेव्हा होवो. तोपर्यंत एकच प्रार्थना- `माणसाच्या रूपातल्या जनावरांनी उद्याचा दिवस पाहू नये.'
- श्रीपाद कोठे
२८ मे २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा