बुधवार, ४ मे, २०२२

मार्क्सविचार

आज ५ मे. कार्ल मार्क्सचा जन्मदिवस. मार्क्सच्या विचारांवर आधारित कम्युनिझम नावाची राजकीय विचारधारा आता गतार्थ झाली आहे. त्याच्यावर भरपूर टीका, विश्लेषण, लिखाण होत असते. दुर्दैवाने वर्गसंघर्षाचा त्याचा सिद्धांत मात्र टीकाकार सुद्धा, जाणते अजाणतेपणी स्वीकारतात. त्यांचीही सगळी मांडणी ते आणि आम्ही, हे आणि ते; अशीच असते. असं का होतं याची स्वतंत्र चर्चा करावी लागेल. पण कम्युनिझमवर आक्षेप घेतानाही मूळ विचार तसाच राहतो. वास्तविक आज जगाने स्वीकारलेल्या सगळ्याच विचारांच्या मुळाशी ही संघर्षात्मक भूमिकाच आहे. उत्तर आणि दक्षिण ध्रुव हे सुद्धा परस्परांचे विरोधक आहेत अशी मांडणी होऊ शकते. कम्युनिझम आणि अन्य विचारधारांनी दिलेले शब्द आणि नारेही या संघर्षात्मक भूमिकेवर आधारित आहेत. हा विचार जगाच्या जीवनदृष्टीत खोलवर घुसला आहे. त्यामुळेच कम्युनिझमवर टीका करतानाही आपले विचार, धोरणे, भूमिका या संघर्षात्मक विचारांच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला जातो. जगाच्या मापदंडात आपले विचार, धोरणे, भूमिका बसवण्यापेक्षा; भारताने आता शब्दावली, नारे, मूल्य, दृष्टी, भूमिका मूलभूत विचारांवर जगापुढे ठेवायला हवे. याचाच एक भाग म्हणून - 'स्वातंत्र्य, समता, बंधुता' याऐवजी 'स्वातंत्र्य आणि दिव्यता' हा नारा जगापुढे ठेवायला हवा. व्यक्ती की समाज, सत्ता की right to privacy, स्त्री की पुरुष, लहान शहरे की मोठी, भांडवल की श्रम, विज्ञान की धर्म, प्रयत्न की दैव, न्यायपालिका की संसद; हा जो 'की' (or) वारंवार आपल्यापुढे येतो; त्याला योग्य आणि समाधानकारक उत्तर देण्याचं काम 'स्वातंत्र्य आणि दिव्यता' हा नारा करेल. आज प्रचलित बहुतांश नारे आणि शब्द यात जीवनाचा आशय missing आहे. अन केवळ व्यवहार सांगून माणसाचे प्रश्न सुटू शकत नाहीत. त्याला जीवनाचा आशय द्यावा लागतो. भारतीय मानसाने यावर चिंतन करायला हवे.

- श्रीपाद कोठे

मंगळवार, ५ मे २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा