काल विश्व संवाद केंद्रातर्फे नागपुरात नारद जयंतीचा कार्यक्रम झाला. त्यानिमित्ताने दोन पत्रकारिता पुरस्कारांच्या वितरणाचाही कार्यक्रम झाला. झी २४ तास वाहिनीचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे होते. त्यांचेच प्रमुख भाषणही झाले. त्यांनी स्वत:च्या अनुभवांची शिदोरी उकलत वृत्त वाहिन्यांच्या संदर्भात जी काही माहिती दिली, भाष्य केले; ते एकाच वेळी- आश्चर्यकारक, चिंताजनक, करमणूक करणारे अन अंतर्मुख करणारे होते. सामान्य माणसाने वाहिन्यांकडे पाहण्याची दृष्टी सुधारून घेण्याला मदत करणारे होते. बरेच लिहिता, सांगता येईल. सांगेनही. तूर्त फक्त एक किस्सा.
कविवर्य ग्रेस गेले. त्यानंतर झी २४ तास वर त्यांनी ग्रेस यांच्यावर एक कार्यक्रम केला. त्यात बोलताना मेधा पाटकर जे म्हणाल्या ते त्यांनी सांगितले. मेधा पाटकर म्हणाल्या- `मातीच्या चुलीवर पितळेच्या गंजात दुध तापवतात. ते पूर्ण तापतं आणि उतू जायला लागतं. त्यावेळी ते भांडं सांडशीने उचलून सारवलेल्या ओल्या जमिनीवर ठेवलं की जशा खुणा तयार होतात, तशा ग्रेसच्या प्रतिमा आमच्या मनात पक्क्या बसल्या आहेत.' या वाक्यावर सभागृहाने टाळ्या वाजवल्या. डॉ. निरगुडकर म्हणाले- `टाळ्या कसल्या वाजवता? आमच्या पत्रकारांनी मला प्रश्न विचारला, सांडशी म्हणजे काय?'
आता बोला...
- श्रीपाद कोठे
२ मे २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा