मंगळवार, १७ मे, २०२२

ही लढाई बरी नव्हे...

एकदा युधिष्ठिराला विचारण्यात आले- `जगातील सगळ्यात मोठे आश्चर्य कोणते?' त्यावर युधिष्ठीर म्हणाले- `माणूस रोज स्वत:च्या डोळ्यांनी मरण पाहतो आणि तरीही स्मशानातून बाहेर पडताना असा बाहेर पडतो की, आपण अमर आहोत. जगातील हे सगळ्यात मोठे आश्चर्य आहे.' युधीष्ठिरांच्या या उत्तरावर दुमत होण्याचे कारण नाही. उलट सगळ्यांना पटेल असेच ते उत्तर आहे. पुढच्या क्षणी काय होणार हे सांगता येत नाही, सगळ्या गोष्टींची अखेर मृत्यू आहे हेही ठरलेले आहे आणि तरीही माणूस असा वागत असतो की, तो जणूकाही अमरपट्टा घेऊन आलेला आहे.

अरुणा शानभाग या अभागी महिलेचा आज मृत्यू झाला. त्यासंबंधीचे वृत्त पाहताना युधीष्ठिराच्या या उत्तराची प्रकर्षाने आठवण झाली. खरे तर गेली ४२ वर्षे त्या मृत्यूची याचना करीत होत्या, कधी यमाकडे तर कधी तुमच्या आमच्या जगाकडे. आज अखेर तो दिवस उजाडला. `मी अरुणा' नाटकात अरुणा शानभाग यांची भूमिका करणाऱ्या चिन्मयी सुभाष यांची प्रतिक्रियाही ऐकली. त्यांनी नाटकाविषयी, अरुणा शानभाग यांच्याविषयी सांगितले. आठवणींना उजाळा देताना त्या म्हणाल्या- `आम्ही त्यांचा मोठा वाढदिवस साजरा केला होता. अर्थात त्यांना काहीच जाणीव नव्हती. ते सारे आपल्यासाठीच होते.' फार मोठा अर्थ या दोन वाक्यात आहे. खरंच जीवन म्हणजे काय? जगणे म्हणजे काय? पाच सहा फुटाचा देह, त्याचे अवयव, चालणारा श्वास की मेंदूची प्रतिक्रियाशक्ती? मेंदूची ही प्रतिक्रिया कितीही क्षीण असली किंवा समजण्याच्या पलीकडची असली किंवा अनाकलनीय असली, तरीही त्याला जीवन वा जगणे म्हणायचे? कशाला म्हणायचे जगणे? आम्हाला तो देह पाहिला की बरे वाटते म्हणून तो टिकवायचा? त्या देहातील जे कोणी आहे त्याला बरे वाटते वा नाही याचा विचार न करताच? धडधाकट शरीराच्या व्यक्तीला शरीर सोडावेसे न वाटणे स्वाभाविक असते. तसेच ते `गलितगात्र' या शब्दाच्याही पलीकडे गेलेल्याला वाटत असेल? अगदी सर्वोच्च न्यायालयानेही दयामरणाची याचिका फेटाळून लावली होती. त्यांची सेवा करणाऱ्या नर्सेसनी त्यावेळी पेढे वाटून आनंदही साजरा केला होता. पण खरेच `आपले वाटणे' यापलीकडे अशा गोष्टींना अर्थ असतो? मानवी जगण्याचा तराजू अशावेळी अकारण भावनांच्या बाजूने थोडा अधिक झुकतो का?

त्यांच्या अंत्यसंस्कारावरून झालेला वादही असाच दुर्दैवी. नाते आणि परंपरा यांचे कारण सांगून त्यांच्या अंत्यसंस्काराचा हक्क मागणे अयोग्यच आहे, पण आम्ही त्यांची सेवा केली म्हणून आम्हाला तो हक्क आहे हे म्हणणेही योग्य नाही वाटत. मुळात अंत्यसंस्कार करणे ही हक्काची बाब कशी असू शकते? आपण किती छोट्या छोट्या गोष्टीत अडकतो? अन युधिष्ठिराचे उत्तर आठवते. जिथे या सगळ्या जगालाच तात्पुरते अस्तित्व आहे तिथे अंत्यसंस्काराचा हक्क मागणे कसेतरीच वाटते नाही का? नर्सेसनी सुद्धा शव नातेवाईकांना देऊन टाकले असते तरी त्यांनी केलेली सेवा, त्यांचे समर्पण, त्यांची बांधिलकी कोणीही नाकारली नसती. नातेवाईकांचा तर प्रश्नच नाही. सहानुभूती पदरात पडून घेण्याचाच त्यांचा हा प्रयत्न आहे. परंतु खरा प्रश्न- कोण खरे, कोण खोटे वगैरे नाहीच. प्रश्न आहे- अधिकार वगैरेचा विचारच मुळात चुकीचा आहे हा. त्यातही माणूस गेल्यानंतर तर अशी अधिकारांची लढाई केविलवाणीच ठरते.

अर्थात हे काही नवीन नाही. अगदी सामान्य माणसांच्या सामान्य कुटुंबातही असे वाद होतात. कोणी अंत्यसंस्कार करायचे यावरून. संतांच्या शिष्यांमध्येही असे वाद झालेले आहेत आणि त्यापायी अंत्यसंस्कार दोन दोन तीन तीन दिवस रखडलेले आहेत. अलीकडच्या काळात गाजलेला वाद म्हणजे कवी ग्रेस यांचा. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी असाच वाद झाला होता आणि सुमारे दोन तास अंत्यसंस्कार खोळंबला होता. जगातील सगळ्यात मोठे आश्चर्य कोणते, या प्रश्नावरील युधिष्ठिराचे उत्तर किती सार्वलौकिक होते याचाच प्रत्यय अशा वेळी येतो.

जीवन आणि मृत्यू यांचाही विचार अशा वेळी मनात येतोच. भारतीय राज्यघटनेने सगळ्यांना जगण्याचा मुलभूत अधिकार दिलेला आहे असे म्हटले जाते. कधीकधी गंमत वाटते याची. राज्यघटना अस्तित्वात नव्हती तेव्हा तो अधिकार नव्हता का? हा अधिकार असा देता वगैरे येतो का? देता येतच असेल तर जन्माला घालणारा सोडून कोण तो देऊ किवा काढून घेऊ शकतो? मुळात जन्म म्हणजे काय? जगणे म्हणजे काय? जीवन म्हणजे काय? मृत्यू म्हणजे काय? दोघांचा काय संबंध? मृत्यू म्हणजे पूर्णविराम का? मृत्यू म्हणजे अस्तित्वहीन होणे का? भगवद्गीता तर म्हणते की- मृत्यू म्हणजे केवळ वस्त्र बदलणे. जीर्ण झालेले कायारूपी वस्त्र टाकून देऊन नवीन वस्त्र परिधान करणे. भारतीय चिंतन तर मृत्यू मानतच नाही. आम्ही अमृताचे पुत्र आहोत, अमर आहोत, आम्हाला मरण नाहीच असे ते म्हणते. जन्म अथवा मृत्यू याचा अर्थच आम्हाला कळलेला नसताना, त्यांच्या अधिकारांची वगैरे लढाई बरी वाटत नाही.

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार, १८ मे २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा