वा वा... आधी सलमान, आता जयललिता. काहीच महिन्यांपूर्वी खुर्ची सोडावी लागलेल्या अम्मा चार आठ दिवसात पुन्हा मुख्यमंत्री होणार. आनंद आहे. कशाकशाचं कौतुक करायचं आम्ही? न्यायव्यवस्थेचं, लोकशाहीचं, प्रसार माध्यमांचं, पोलिसांचं, तपास यंत्रणांचं, नोकरशाहीचं, जनता जनार्दनाचं? घाबरू नका, थोड्याच दिवसात देशातील सगळे तुरुंग, पोलीस कोठड्या रिकाम्या होतील आणि देश पूर्णपणे गुन्हेमुक्त होईल. मग फक्त चालेल आरोग्यदायी स्पर्धा. कोण सत्तेवर येतो याची स्पर्धा, कोण भ्रष्टाचार अधिक करतो याची स्पर्धा, कोण किती गुंड पोसतो याची स्पर्धा, कोण किती मुडदे पाडतो याची स्पर्धा, कोण अमली पदार्थांची तस्करी वगैरे जास्त करतो त्याची स्पर्धा, कोण जास्तीत जास्त बेताल- बेमुर्वतखोर- उन्मत्तपणे- वागतो याची स्पर्धा. अन या स्पर्धेतून सर्वोत्तम तोच टिकेल आणि आबादी आबाद होईल. अर्थात ही स्पर्धा मान्य नसणारे उरणारच नाहीत, हे वेगळे सांगायला नकोच.
यातील प्रतिक्रियेचा भाग बाजूस काढून विचार केला तर लक्षात येते की- न्यायप्रक्रिया, व्यवस्था, फौजदारी व दंड संहिता, कायदे, नियम सगळंच आमूलाग्र बदलण्याची गरज आहे. त्याहीपेक्षा अधिक म्हणजे आपण स्वीकारलेली फार उदात्त वगैरे वाटणारी ब्रिटीश संसदीय व्यवस्था बदलण्याची गरज आहे. निवडणुका या सगळ्या वाईट गोष्टींची जननी आहे, हे प्रत्यक्ष राजकारणीही मान्य करतात. पण खरी जननी आहे आपली संसदीय व्यवस्था. मुळात लोकशाही याचा अर्थ फक्त आपल्या येथे असलेली संसदीय व्यवस्था एवढाच नाही. लोकशाहीच्या अन्यही व्यवस्था आहेत. मुख्य म्हणजे या व्यवस्थांमध्ये आणखीन भर टाकली जाऊ शकत नाही असेही नाही. पण त्यासाठी प्रथम प्रामाणिक मन, प्रामाणिक भावना आणि प्रामाणिक विचारांची गरज आहे.
कायदे, संसदीय व्यवस्था, एवढेच नव्हे तर ज्याचे अतिशय फाजील कौतुक केले जाते ते `फेडरल स्ट्रक्चर' सुद्धा बदलण्याची गरज आहे. त्यासाठी नवीन घटना समिती बसवायला हवी. पण असा विचार जरी व्यक्त केला तरी केवढा आणि किती वेगवेगळा आकांत केला जाईल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या उथळपणाला काहीही उपाय नाही. या जगातील सगळी क्षमता आणि बुद्धिमत्ता संपून गेलेली आहे असेच मानायचे असेल तर त्याला काय करणार? आज स्पष्ट, सत्य बोलण्याची सुद्धा कोणाची इच्छा आणि तयारी नाही. हे परिवर्तन घडवून आणणे तर दूरची गोष्ट राहिली. भुलभुलय्यात फिरण्यातच सार्थकता मानणाऱ्यांची कमी नाहीच ना?
- श्रीपाद कोठे
११ मे २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा