मंगळवार, ३ मे, २०२२

रोमांचक खेळ

अशाच घरगुती गप्पा सुरु होत्या. ग्रहज्योतिष्याचा विषय निघाला. स्वाभाविकच लग्नाचे योग, वर्ज्य योग वगैरे. आमच्या वहिनी म्हणाल्या, `ते मृत्यू षडाष्टक वगैरे काहीतरी असतं ना? सिंह आणि मकर राशीचं मृत्यू षडाष्टक असतं असं म्हणतात. काय असतं ते?’ थोडीबहुत जुजबी माहिती होती त्यावरून मी म्हणालो, `हो. सिंह राशीचा राशीस्वामी आहे सूर्य आणि मकर राशीचा राशीस्वामी आहे शनी. सूर्य व शनी हे पूर्णत: विरुद्ध प्रकृतीचे ग्रह आहेत. एक तेजस्वी, दुसरा निस्तेज; एक वेगवान, दुसरा संथ; एक प्रकाशाचा कारक, दुसरा अंधार; वगैरे वगैरे. त्यामुळे ते परस्परांचे शत्रू असतात. म्हणून हे मृत्यू षडाष्टक. म्हणजे अगदी मृत्यूच होतो की नाही माहीत नाही; पण त्यांच्यातलं नातं मात्र मरत असावं.’ त्यावर वहिनी म्हणाल्या, `शनी तर रवीचा म्हणजे सूर्याचा पुत्र आहे ना, मग ते शत्रू कसे काय?’

येथून मात्र विषय बदलला. मी म्हणालो, `आपले पूर्वज संवेदनशील होते पण बावळट नव्हते. मुख्य म्हणजे, ते सत्याचे उपासक होते. सत्याचा शोध घेताना, ते मांडताना सगळ्या भावभावना बाजूला ठेवण्याचं धैर्य त्यांच्याजवळ होतं. दोन व्यक्तींमध्ये पिता-पुत्राचं नातं आहे म्हणजे ते मित्रच असले पाहिजेत, त्यांच्यात प्रेमच असले पाहिजे वगैरे भाबडेपणा त्यांच्या ठायी नव्हता.’ आणि हे खरंच नाही का? दोन व्यक्तींमध्ये स्नेह, प्रेम, आपुलकी ही त्या दोन व्यक्तींमधील असते. दोन व्यक्तींची तार जुळली असेल तर ती त्या दोन व्यक्तींची बाब असते. दोन व्यक्तींचं पटावं की नाही, त्यांच्यात स्नेह प्रेम राहावं की नाही; या गोष्टी नात्याने निश्चित होत नसतात. दोन व्यक्तींच्या सहृदय सहअस्तित्वाचं नातं हे परिमाण नाही राहू शकत. सहृदयतेच्या पोटी नातं जन्म घेऊ शकतं (प्रियकर-प्रेयसी किंवा नवरा-बायको याशिवायची नातीही) किंवा नातं जुळल्यावर त्यात सहृदयता जन्माला येऊ शकते. पण म्हणून नातं आहे म्हणजे सहृदयता असलीच पाहिजे असे मात्र नाही.

नाती ही प्रामुख्याने व्यावहारिक व्यवस्था आहे. व्यक्तीच्या गरजा पूर्ण होण्यासाठी आणि समाज सुव्यवस्थित राहावा यासाठी नात्यांची गरजही असते. प्रेम, स्नेह, आदर, सहृदयता कधी आणि कुठे प्राप्त होईल, होईल अथवा नाही; या सगळ्या जरतरच्या गोष्टी. परंतु माणूस एकीकडे स्वप्न, आशा, आदर्श या पातळ्यांवर जगत असला तरीही बहुतांश वेळ आणि बहुसंख्य माणसे व्यावहारिक जगातच जगत असतात. शिवाय भावभावना, स्वप्न, आशा, आदर्श यावर व्यावहारिकतेचा मोठा परिणामही होत असतो. त्यामुळे दोन व्यक्तींचे संबंध निर्माण होणार आणि नाती जन्माला येणारच. शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक अशा विविध गरजा आणि सुरक्षा यासाठी नाती अपरिहार्य आहेत. स्वाभाविकच जी गोष्ट इतकी अपरिहार्य आहे ती अधिक सुरळीत व्हावी, न कुरकुरता चालावी यासाठी त्यातून सहृदयता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येतो आणि त्या नात्यांमधून सहृदयतेची अपेक्षाही करण्यात येते. या अपेक्षेचा थोडा दबावही येतो. सहृदयता निर्माण करण्यात त्याचा थोडा उपयोगही होतो. मात्र हा दबाव जास्त झाला तर त्याची विपरीत प्रतिक्रियाही येऊ शकते. व्यवहारात जगणाऱ्यांना नातीच पुरेशी होऊन जातात. प्रेम, स्नेह, आदर, सहृदयता यांची अनेकांना अनेकदा गरजही वाटत नाही. असे सगळे असले तरीही नाती ही काही मनाच्या तारा जुळण्याची हमी राहू शकत नाही. व्यावहारिक नाती आणि त्यापलीकडील भावपूर्ण देवाणघेवाण एकत्र प्राप्त होणे ही आनंदाची, अभिमानाची आणि दुसऱ्यांसाठी असुयेची बाब ठरू शकते. प्रत्यक्षात हे असूही शकते वा नसूही शकते याची प्रगल्भ जाणीव असणे आवश्यक.

ही जाणीव असल्यानेच व्यास, वाल्मीकिंसारख्या दृष्ट्या ऋषींनी- साहित्यिकांनी; हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद, देवकी आणि कंस, रावण आणि बिभीषण अशी विजोड नातीही चित्रित केली आहेत आणि आमच्या ज्योतिषअभ्यासकांनी नात्यांच्या सर्वप्रकारच्या संबंधांची आणि विजोडतेची चर्चा आणि चिकित्सा केली आहे. प्रेम, स्नेह, आदर, सहृदयता या बाबी व्यक्तिगत असतात. त्यांना चौकटीत बांधता येत नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि ते देवाघरचे देणेही असते. त्याचे निश्चित असे गणित मांडता येत नाही. म्हणून तर मानवी जन्माचा हा खेळ रोमांचकपणे सुरु आहे ना?

- श्रीपाद कोठे

नागपूर

शनिवार, ३ मे २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा