कोविडच्या संदर्भातील दोन कविता आणि 'वैकुंठधामातील मुडद्यांचा संवाद' शीर्षकाने पाच कथा वाचण्यात आल्या. यावर काही लिहू असं वाटलं नव्हतं त्यामुळे हे साहित्य संग्रही ठेवावं असं काही वाटलं नाही. मात्र त्यातली पारुल खक्कर यांची एक कविता आणि पाच लघुकथा पुन्हा सापडल्या. एक कविता मात्र सापडली नाही. काय व्यक्त व्हावं समजेना. दुर्लक्ष करावं असंही वाटलं. पण पुन्हा विचार आला की, दुर्लक्ष करणं बरं नाही.
जीवनातील महत्वाच्या घटनांचे पडसाद साहित्यात उमटणं हे अतिशय स्वाभाविक आहे. अन सगळ्या जगाला हलवून सोडणाऱ्या कोविडचे पडसाद साहित्यात उमटणार नाहीत असं तर शक्यच नाही. सध्याची स्थिती हा केवळ विनोदाचा मसाला नक्कीच नाही. त्यावर गंभीर साहित्य निर्माण होणे आवश्यक आहे, अपरिहार्य आहे अन योग्यही.
परंतु साहित्य म्हणजे केवळ क्षणिक भावनांचा एकांगी शब्दखेळ असतो का? असावा का? मानवी भावभावना, अडीअडचणी, संघर्ष, तडजोडी, सृजन, विनाश, घडणे, बिघडणे; हे साहित्यातून येणारच. यायलाच हवं. आत्यंतिक व्यावहारिक मनांना संवेदनांचे अस्तर लावून त्याची मानवीयता जिवंत ठेवण्याचं काम हेच साहित्य करत असतं. पण ही सारी शब्दसृष्टी अविचारी, एकांगी, अविवेकी असावी का? या प्रश्नाचे उत्तर जर नकारार्थी असेल किंवा नकारार्थी असायला हवे असेल तर; साहित्य सृजकांचीही काही जबाबदारी असते हे लक्षात घ्यायला हवे. काय असते ही जबाबदारी? ही जबाबदारी असते, जीवनाचा सखोल आणि समग्र विचार करणे. साहित्यिक हा विचारवंत असेलच असे नाही, त्याने वैचारिक लेखनच करावे असेही नाही. पण आपले लिखाण वरवरचे, भावनावेगात वाहणारे नसावे; आपल्या लिखाणाने वाचकांना विचारी बनवता आले नाही तरी अविचारी बनवू नये; एवढे तर पाहायला हवेच ना? आपल्याकडे शब्द आहेत आणि त्यांची जुळणी करण्याचे देवदत्त कौशल्य आहे म्हणून; आपल्या भावना भडकपणे, वाचणाऱ्यांना पिसाट बनवण्याच्या पद्धतीने मांडाव्या का? साहित्यसृजकांनी आपल्या श्रेष्ठत्वासोबतच आपल्या या जबाबदारीचेही भान ठेवायला हवे.
आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. मानवी जीवनासंबंधीच्या आजच्या कल्पना, धारणा, गृहितके, स्वप्ने, आकांक्षा, अपेक्षा, विश्लेषणे इत्यादी खूप एकांगी आहेत. मानवी जीवनाची श्रेष्ठता जमेस धरूनही हे म्हणणे भाग आहे की, मानव एकटा वा समूह म्हणून सर्वशक्तिमान नाही. मानवाचे व्यावहारिक जीवन आणि भावजीवन या दोन्हीला हे लागू होते. आज मात्र मानवी जीवनाची ही मर्यादा, अन त्याचे पराधीनत्व मान्य करणे पाप समजण्याचा काळ आहे. माणूस जे करेल ते व्हायलाच हवे ही आजच्या मानवाची विकृत आकांक्षा आहे. अन मानव जे करेल ते होईलच हा अतिविकृत विश्वास आहे. यातूनच व्यवस्था, सरकारे, माणसे यांचे मूल्यमापन केले जाते. मानवी अपूर्णता लक्षात घेऊन अधिकाधिक पूर्णतेकडे जाण्याचा प्रयत्न करण्याऐवजी अपयशाच्या जबाबदाऱ्या निश्चित करून संघर्ष छेडले जातात. हे अयोग्य आहे याची जाण उत्पन्न करण्याची स्वाभाविक जबाबदारी असलेले साहित्य सृजक देखील याच मार्गाने जातात. परिणामी जीवनासोबतच साहित्य क्षेत्रही कार्यकर्त्यांचे आखाडे होत जातात.
या आखाड्यांच्या नशेत आज समाज डोलतो आहे. समाज ही कार्यकर्त्यांच्या दावणीला बांधलेली वस्तू नाही. अधिकाधिक विकसित होत जाणारी ती एक प्रक्रिया आहे याचा विचार, ज्यांनी करायला हवा ते मानस घडवणारेही करीत नाहीत; ही शोकांतिका आहे.
जीवनाचे एकांगी, विकृत, विद्रुप दर्शन आणि जीवनाचे सर्वांगीण, समग्र, सखोल आकलन; यांचा हा तात्विक संघर्ष आहे. आमचे आणि तुमचे करून काहीही होणार नाही. साहित्याच्या संदर्भातच बोलायचे तर, भावनांना विचारांची डूब देण्याची गरज आहे. जाता जाता कोणाच्या तरी भावनांना हात घालणे किंवा संवेदनशीलतेच्या नावाखाली भडकपणा करणे टाळायलाच हवे. साहित्याने केवळ मानवी मन व्यक्त करू नये, सोबतच मानवी मन घडवावे देखील. त्यासाठी जे जे आवश्यक आहे ती ती साहित्यसृजकांची जबाबदारी ठरते.
- श्रीपाद कोठे
मंगळवार, १८ मे २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा