पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराची चर्चा करताना कुठे कुठे काश्मीरचा उल्लेखही करण्यात आला. सहज एक जुना प्रसंग आठवला. दहा बारा वर्षं झाली असतील. नागपूरच्या पत्रकार भवनात एक कार्यक्रम होता 'जम्मू काश्मीर अभ्यास केंद्राचा'. रा. स्व. संघाचे वर्तमान सहसरकार्यवाह श्री. अरुणकुमार कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता होते. 'जम्मू काश्मीर अभ्यास केंद्राचं' काम त्यांच्याकडे होतं. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून एक स्थानिक मोठी व्यक्ती होती. (नाव मुद्दाम सांगत नाही कारण मग चर्चा भरकटते.) अध्यक्षांनी त्यांच्या भाषणात काश्मीरची स्थिती, त्या स्थितीची भीषणता, स्वतःचे अनुभव; हे सगळं सांगून तिथली दाहकता श्रोत्यांना समजावली. मग मुख्य वक्ता श्री. अरुणकुमार उभे झाले. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच केली की, 'मी अध्यक्षांशी सहमत नाही. मी जम्मू काश्मिरात नियमित जातो, सतत सगळ्या गोष्टी पाहत असतो; मला तिथे जे दिसते ते मी सांगणार आहे. अध्यक्षांना जे दिसले त्यापेक्षा निराळे मला दिसते.' एवढी प्रस्तावना करून त्यांनी; कल्हणबिल्हण, शैव परंपरा, केशर, पर्यटन, विद्यमान हिंदू संस्था, संघटना, कार्ये वगैरे वगैरे सांगितले. राजकीय इतिहास सांगितला. कायद्याची चर्चा केली. जम्मू काश्मीरची भयानक स्थिती वगैरे त्यात काहीही नव्हते. आज परिणाम दिसत आहेत.
ज्यांना चांगलं व्हावं असं वाटतं, चांगलं करायचं आहे; त्यांनी याचा विचार करायला हवा. ज्यांना चांगल्याची फक्त चर्चा करायची आहे त्यांची गोष्ट वेगळी.
- श्रीपाद कोठे
६ मे २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा