बुधवार, १८ मे, २०२२

संपत्तीचा अधिकार

 

लॉकडाऊनमुळे अर्थकारणाची मोठी चर्चा जगभरात सुरू आहे. काय झालं नेमकं लॉकडाऊनमुळे? आदल्या दिवशीपर्यंत असलेली संपत्ती, पैसा, लॉकडाऊन झाल्याबरोबर संपून गेला का? उडून गेला का? जादूने गायब झाला का? जळून राख झाला का? असं काहीच झालं नाही. पैसा जेवढा होता तेवढाच होता. फक्त एकच झाले की त्याचे फिरणे बंद झाले. हे फिरणे सुरू होणे एवढीच फक्त महत्वाची गोष्ट. पण तसे न होता, किंबहुना पैसा पुन्हा फिरू लागण्याचे प्रयत्न सुरू होण्यापूर्वीच जगभरातील सरकारांनी अर्थव्यवस्थेत अतिरिक्त पैसा ओतणे सुरू केले. यामुळे अर्थकारणात पैसा वाढणार. आधीचा पैसा जिथल्या तिथे आणि अर्थचक्र फिरण्यासाठी नव्याने पैसा. हा अधिकचा पैसा येतो कुठून? १) नवीन वा वाढीव कर, २) कर्ज, ३) चलनाची नवीन छपाई. याच्या परिणामी चलनवाढ म्हणजेच सामान्य भाषेत महागाई वाढते. अर्थचक्र फिरू लागते. पण अर्थचक्रातील पैसा फारसा वाढत नाही. जी वाढ दिसते ती फक्त कागदांवर. कारण कागदांवर जुना पैसा आणि नवीन पैसा एकत्र दिसतो पण प्रत्यक्षात जुना थांबलेला पैसा जिथला तिथे साचतो. नवीन पैसा व्यवहारात फिरतो. ही एक प्रकारे स्वतःची, अन अर्थकारणाची फसवणूक आहे. वर्षानुवर्षे अशीच फसवणूक होत आली आहे. त्यामुळे जगातला एकूण पैसा आणि माणसांचे जगणे यांचा ताळमेळ कधीच बसत नाही. यासाठी नवीन पैसा ओतण्याआधी एका ठिकाणी थांबून संचय होणारा पैसा अर्थचक्रात कसा येईल याचा विचार करावा लागेल. पण कसा येईल हा पैसा अर्थचक्रात? ज्यांच्याकडे काही दिवस वा काही महिने खर्च चालवण्याची क्षमता आहे त्यांचा पैसा फिरत राहतो. पण ज्यांच्याकडे त्याहून अधिक वा खूप अधिक आहे त्यांचा पैसा मात्र साचून राहतो. तो त्यांचा पैसा असल्याने त्याला हात लावता येत नाही. सरकारांचा नाईलाज होतो. या ठिकाणी एक मूलभूत प्रश्न येतो. तो म्हणजे - संपत्तीचं स्वामित्व.

संपत्ती कोणाची? संपत्तीवर अधिकार कोणाचा? या संदर्भात तीन विचार प्रामुख्याने पुढे येतात.

१) संपत्तीची मालकी व्यक्तीची. त्यामुळे त्याचा विनियोग, उपभोग यांचा अधिकार त्याचा. ही भांडवलशाही दृष्टी म्हणता येईल.

२) संपत्तीवर अधिकार समाजाचा म्हणजे सरकारचा. ही साम्यवादी दृष्टी म्हणता येईल. ती प्रत्यक्षात आलेली नाही, येऊ शकत नाही. कोणताही मानव समूह ते मान्य करू शकत नाही.

३) संपत्ती बाळगणारा हा त्या संपत्तीचा विश्वस्त आहे. हा सर्वोदयी विचार म्हणता येईल. मात्र कट्टर सर्वोदयी वा गांधीवादी तरी हे मान्य करून आपल्या संपत्तीवर उदक सोडायला तयार होतील का?

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनीही यासंबंधात विचार मांडलेला आहे. ते म्हणतात - 'खाजगी संपत्ती पूर्णपणे नष्ट करणे अयोग्य आहे. असे केल्याने व्यक्तीची प्रतिष्ठा, सुरक्षितता, समाधान आणि उद्यमशीलता नष्ट होतात. परंतु संपत्तीचा अनिर्बंध अधिकार व तिचा अनिर्बंध उपभोग हेही योग्य नाही. संपत्तीच्या अधिकाराला मर्यादा असल्या पाहिजेत. या मर्यादा व्यक्ती व समाज यांच्या समुचित गरजा व जीवनमूल्ये यांच्या आधारे ठरवण्यात याव्या.' याचे आणखी विवेचन करताना पंडित दीनदयाळ उपाध्याय म्हणतात - 'संपत्तीचे मानवी जीवनातील स्थान व प्रयोजन कोणते हे तपासून पाहिल्याशिवाय अर्थशास्त्राची मांडणी होऊ शकणार नाही. संपत्तीविषयक समस्यांचा विचार करताना अर्थशास्त्राला नीतीशास्त्रात व राज्यशास्त्रात शिरावे लागेल.' आज अनेक अर्थतज्ञही हाच विचार बोलू लागले आहेत की, केवळ अर्थशास्त्र मानवाच्या आर्थिक समस्या सोडवू शकणार नाही. त्याला नीतिशास्त्र, धर्म, आध्यात्म यांची जोडही द्यावीच लागेल. म्हणूनच आपला समग्र विचार मांडताना दीनदयाळ उपाध्याय स्पष्ट शब्दात सांगतात - 'समाजाला आदर्शवादी बनवावे लागेल.' आज संपत्तीच्या स्वामीत्वाची जी चर्चा होते, त्या संबंधात जे निर्णय वा विचार होतो, त्या संदर्भातले कायदे वा घटनेतील तरतुदी; या सगळ्यांपेक्षा दीनदयाळ उपाध्याय यांचा विचार वेगळा आणि मौलिक आहे. तर्काच्या आधारे अधिक योग्य आहे. समाज आणि विविध सामाजिक व्यवस्थांनी तो स्वीकारण्याचा प्रयत्न करावा लागेल.

- श्रीपाद कोठे

मंगळवार, १९ मे २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा