लंडनच्या `दि एको'मध्ये १८९६ साली स्वामीजींची एक मुलाखत प्रसिद्ध झाली होती. त्यात `दि एको'च्या प्रतिनिधीचा पहिलाच प्रश्न होता की, `आजकाल लोक असार व गौण भागावर अधिक भर देतात असे तुम्हास वाटते काय?' त्यावर स्वामीजींनी जे उत्तर दिले ते समाजातील अर्थमानसिकतेवर प्रकाश टाकणारे आहे. स्वामीजी म्हणाले- `मागासलेल्या राष्ट्रात सर्वत्र आणि पुढारलेल्या देशात कमी सुसंस्कृत असलेल्या वर्गात तसेच आढळते. सुसंस्कृत आणि श्रीमंत लोकांची गोष्ट निराळी आहे असे तुमच्या प्रश्नात अभिप्रेत आहे आणि खरोखरच ती निराळी आहे. धनिक वर्ग एक तर द्रव्याचा उपभोग घेण्यात दंग आहे किंवा अधिक द्रव्यप्राप्तीसाठी धडपडत आहे. हे लोक आणि संसारातील कामात मग्न असलेले बहुसंख्य लोक म्हणतात की धर्म हा मिथ्या आहे, निरर्थक आहे, मूर्खपणा आहे. अन त्यांना प्रामाणिकपणे तसे वाटत असते. देशभक्ती किंवा रूढी हाच प्रचलित धर्म बनला आहे. लोक आजकाल चर्चमध्ये जातात ते केवळ कोणाच्या लग्नासाठी किंवा केवळ कोणाला पुरण्यासाठी जातात.' सुसंस्कृत आणि श्रीमंत यातील सूक्ष्म भेद स्वामीजींनी फार खुबीने या उत्तरात स्पष्ट केला आहे. सुसंस्कृत लोकांची गोष्ट निराळी आहे याचा अर्थ ते लोक धर्माच्या गौण भागाकडे विशेष लक्ष न देता त्यातील मुख्य भागच ग्रहण करतात आणि श्रीमंत लोकांची गोष्ट निराळी आहे याचा अर्थ, श्रीमंत लोक धर्माच्या गौण वा मुख्य कोणत्याच भागाकडे लक्ष देत नाहीत.
या उत्तरावर प्रतिनिधीने दुसरा प्रश्न विचारला- `आपल्या संदेशामुळे हे लोक चर्चमध्ये अधिक जाऊ लागतील काय?' या प्रश्नाच्या उत्तरात स्वामीजींनी आपले म्हणणे अधिक खोलवर स्पष्ट केले. ते उत्तरले- `माझ्या बोलण्याचा तसा परिणाम होईल असे मला वाटत नाही. कारण कर्मकांडाशी किंवा विशिष्ट मतांशी माझा मुळीच संबंध नाही. धर्मच मानवी जीवनाचे सर्वस्व आहे आणि प्रत्येक गोष्टीत धर्म आहे हे दाखवून देणे एवढेच माझे जीवितकार्य आहे. इंगलंडमधील एकंदर विचारप्रवाहाबद्दल आम्ही काय बोलणार? लोकराज्याचा उदय होणार हेच साऱ्या घटना दर्शवित आहेत. त्याला तुम्ही सोशालिझम म्हणा की आणखी काही म्हणा. काम कमी असावे, कोणाचा जुलूम नसावा, युद्ध होऊ नये, भरपूर अन्न मिळावे आणि अशा रीतीने जीवनातील आवश्यकतांची पूर्ती व्हावी हीच लोकांची आकांक्षा असणार. धर्माचा, मानवाच्या चांगुलपणाचा आधार प्राप्त झाल्याशिवाय या देशातील सभ्यता किंवा इतर कोणतीही सभ्यता टिकून राहण्याची काय शाश्वती आहे? धर्म हा सर्व गोष्टींच्या मुळाशी जातो हे निश्चित जाणून असा. धर्म जर सुप्रतिष्ठित असेल तरच सर्वकाही चांगले होईल. धर्माचा जो सारभूत तत्वज्ञानात्मक भाग आहे त्याची लोकांच्या मनात स्थापना करणे फारच कठीण कार्य आहे. कारण लोकांचे प्रचलित आचारविचार या तत्वज्ञानात्मक भागापासून फार दूर असतात.'
स्वामीजींनी या उत्तरात लोकांच्या चांगुलपणाचा जो मुद्दा मांडला आहे, त्याची आज पदोपदी आठवण आल्याशिवाय राहत नाही. भ्रष्टाचार, घोटाळे, स्वार्थ, एकमेकांचे गळे कापणे, जळी- स्थळी- काष्ठी- पाषाणी- जागृतीत- स्वप्नावस्थेत- पैशाकडे असलेली धाव आणि त्याला लाभणारी प्रतिष्ठा; यांनी अर्थचक्रापुढे (अर्थव्यवस्था, अर्थरचना, अर्थोत्पादन, अर्थोपभोग, अर्थवितरण, अर्थनियोजन हे सगळे मिळून अर्थचक्र) उपस्थित केलेले प्रश्न पहिले की, स्वामीजींचे म्हणणे पटल्याशिवाय राहत नाही. समाजाचे अर्थकारण धर्मापासून तुटून राहू नये. ते तसे राहिले तर अनर्थकारी ठरेल असाच त्याचा आशय आहे.
- श्रीपाद कोठे
१३ मे २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा