नुकतंच स्टीफन हॉकिंग यांचं एक मत प्रसिद्ध झालं आहे. त्यात ते म्हणतात- `पुढील १०० वर्षांनी माणसाने राहण्यासाठी ही पृथ्वी योग्य राहणार नाही. त्याने आपले दुसरे घर शोधावे.' त्यांच्या या मतासाठी त्यांनी तीन कारणे सांगितली आहेत- जीवनाचा वेग, माणसातील हिंसक वृत्तीत झालेली वाढ आणि तंत्रज्ञानाचा वाढता पसारा. हे वाचताना गंमत वाटली. आपण ज्या फांदीवर बसलो आहोत त्यावर कुऱ्हाड चालवू नये, ही अतिशय बाळबोध परंतु जीवनमरणाशी संबंधित शिकवण सुद्धा आता आम्ही गुंडाळून ठेवतो आहोत. आधुनिक बुद्धिवाद आणि विज्ञानवाद याद्वारे आम्ही आज आत्मघातापर्यंत पोहोचलो आहोत. तरीही आमच्या बुद्धीची गुर्मी काही उतरत नाही. आमचा शेवट झाला तरीही चालेल, पण आम्ही बुद्धी अन कथित विज्ञानाचा दंभ आणि दर्प टाकून द्यायला तयार नाही. हॉकिंग सारखा प्रचंड बुद्धिमान माणूस माणसाला ही पृथ्वी सोडून जाण्याचं आवाहन करतो, पण त्यानेच केलेल्या याविषयीच्या कारणमीमांसेला धरून; यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी बंद करा, याची कारणेच मोडीत काढा, असे काही म्हणत नाही. आम्ही मोडीत निघालो तरीही चालेल पण आम्ही आमचा मार्ग, आमची दिशा, आमची दृष्टी बदलणार नाही. कथित आधुनिकतेपोटी आम्ही मुलभूत शहाणपण सुद्धा गमावून बसण्याच्या टोकावर आलो आहोत. दुर्दैवाने कोणी यावर बोलायला, याकडे लक्ष द्यायला तयार नाही. अन इंग्रजीत ज्याला `call spade a spade' असे म्हणतात तसे रोखठोक बोलायचे धाडसही कोणी करीत नाही. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील. मी मोदीजींचा नाव घेऊन मुद्दाम उल्लेख केला. त्यांच्यावर टीका हा उद्देश नाही. पण आज असलेली त्यांची लोकप्रियता, त्यांच्या शब्दाला असलेले वजन आणि अर्थ पाहता, त्यांनी अतिशय नेमके बोलायला हवे. त्यांच्या एकेका शब्दाचे अनेक आणि खोल अर्थ होतात. त्यामुळे ते जेव्हा वैज्ञानिकतेवर बोलतात तेव्हा त्यांना अभिप्रेत असलेले व नसलेले अर्थही त्यातून काढले जातात. खालच्या स्तरापर्यंतच्या विचारपद्धतीवर, दृष्टिकोनावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे त्यावर किती भर द्यायचा, त्याचा किती आणि कशा प्रकारे, कशा शब्दात पाठपुरावा करायचा याचाही सखोल विचार आवश्यक ठरतो. तसा तो होताना दुर्दैवाने दिसत नाही. याचा अर्थ विज्ञान नाकारणे, बुद्धी नाकारणे असा होत नाही. अगदी आदिम समाजात सुद्धा विज्ञान आणि बुद्धी दोन्हीही होतेच अन पुढेही राहणारच. मुद्दा एवढाच की त्यांच्या कक्षा काय आणि किती असाव्यात? त्यांच्या कक्षा ठरवताना कशाच्या संदर्भात विचार करावा. आज बुद्धी आणि विज्ञान या दोघांनीही समग्र अस्तित्वाचे संदर्भ धुडकावून लावले आहेत. चिंतेचा विषय हा आहे. या दोन्हीचा भस्मासुर झाला आहे. आम्ही त्याचा विचार करण्याचे शहाणपण दाखवणार का? कळीचा मुद्दा हा आहे. एका गीतातील एक ओळ सहजपणे आठवते- `सृजनहीन विज्ञान व्यर्थ है, यदि प्राणी का उपकार नही है... भौतिकता के उत्थानो मे जीवन का उत्थान न भुले... स्वार्थसाधना कि आंधी मे वसुधा का कल्याण न भुले...'
स्टीफन हॉकिंगच्या या मताच्या संदर्भात काही दशकांपूर्वी Arnold Toynbee यांनी व्यक्त केलेले विचार चिंतनीय वाटतात. Toynbee म्हणतात- `today we are still living in this transitional chapter of the world's history, but it is already becoming clear that a chapter which had a western beginning will have to have an indian ending if it is not to end in the self destruction of the human race. in the present age, the world has been united on the material plane by western technology. but this western skill has not only `annihilated distance'; it has armed the people of the world with weapons of the devastating power at a time when they have been brought to point blank range of each other without yet having learnt to know and love each other. at this supremely dangerous moment in human history, the only way of salvation of mankind is an indian way. the emperor ashoka's and mahatma gandhi's principles of non-violence and shri ramkrushna's testimony to the harmony of religions, here we have the attitude and the spirit that can make it possible for the human race to grow together into a single family- and, in the atomic age, this is the only alternative to destroying ourselves.
in the atomic age the whole human race has a utilitarian motive for following the indian way. no utilitarian motive could be stronger or more respectable in itself. the survival of the human race is at stake. yet even the strongest and most respectable utilitarian motive is only a secondary reason for taking ramakrushna's and gandhi's and ashoka's teaching to heart and acting on it. the primary reason is that this teaching is right- and is right because it flows from a true vision of spiritual reality.'
स्वामी विवेकानंद म्हणाले होते- विज्ञान आणि अध्यात्माला एकत्र यावेच लागेल. अन या एकीकरणात दोघांनाही परस्परांना खूप तपासावे लागेल आणि सवलती द्याव्या लागतील. गेल्या शंभर वर्षात विज्ञानाने खूप सवलती घेतल्या आणि अध्यात्माची खूप तपासणी झाली. आता विज्ञानाची तपासणी सुरु होण्याची वेळ आलेली आहे. आम्ही तयार आहोत का? दुर्दैवाने हिंदुत्ववादी, गांधीवादी, भारतवादी फक्त शब्द वापरतात गाभ्याला स्पर्शही करीत नाहीत. toynbee ने पौर्वात्य व पाश्चात्य असा जो भेद केला आहे तो समजून न घेता; `पाश्चात्य'वर पूर्वेचे आवरण चढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तो निश्चितच अपुरा आणि चुकीचा आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, ९ मे २०१७
श्रीपादजी अगदी मूलभूत स्वरूपाचे चिंतन आपण मांडले.आपल्या वैचारिक अभिनिवेशांना बाजूला ठेवून संपूर्ण मानव समुदायाच्या कल्याणाचा विचार मांडणारे असे चिंतन ही संबंध विश्वमानवाचीच आजची चिंता आहे.एका अर्थाने त्याच्या उद्याच्या अस्तित्वाची ही काळजी आहे.
आपण हॉकिंग,टॉयनबी,विवेकानंद यांचा उल्लेख केला आहे.गांधीजी,गोळवलकर गुरुजी,आणि दिंनदयालजी यांनीही अशाच स्वरूपाचे विचार मांडले आहेत.हाही उल्लेख आवर्जून करायला हवा होता.
मानवी जीवन सुखकर,समृद्ध करायला निघालेला आणि त्यामुळेच सगळ्याच मानवी समुदायाला प्राणापेक्षा प्रिय असलेला विज्ञानाचा ब्रह्मराक्षस सगळी मानवी सभ्यताच गिळंकृत करेल की काय अशी भिती सगळ्या विश्वालाच भेडसावते आहे.त्यातूनच "Living right way.. through nature and spirituality " यासारखी चिंतने, परिषदा, चळवळी उभ्या होत आहेत.एकूणच माणूस,समाज आणि निसर्ग यांच्या सहयोग आणि परस्परावलंबित्वावर पुन्हा एकदा जग विचार करायला लागलं आहे.
थोडक्यात मानवी समाजासाठी श्रेय काय ? विज्ञानाने निर्माण केला आभासी आणि आसुरी समृद्धीच्या राक्षसी विळख्यातून मानवी अस्तित्व कसे टिकवून ठेवायचे यावर अनेक चिंतक चिंता व्यक्त करीत आहेत.
अडचण या विचारांना प्रत्यक्षात कोणी आणि कसे उतरवायचे ही आहे.त्यासाठी मुळातून आपल्या राजकीय,सामाजिक प्रक्रियेबद्दल चिंतन व्हायला हवे.
समाजाची धारणा आणि त्याला खऱ्या योग्य पथावर नेण्याचे कार्य सत्तानिरपेक्ष सज्जन शक्तीजिचे नेतृत्व सर्वसंगपरित्याग केलेल्या ऋषी परंपरेकडे असेल, या समाजधारणेतून आपल्याकडे व्यक्ती,समाज आणि पर्यावरण यांच्या परस्पर सहयोगातून साकारलेले आदर्श जीवन अस्तित्त्वात आले होते.आपण म्हणता त्याप्रमाणे निस्वार्थ तपस्या आणि साधनेतून समाज जीवनाच्या सम्यक हिताचे सत्य ही ऋषी शक्ती निर्भयपणे समाजासमोर मांडीत असे.त्यांचा सत्याचा आग्रह निरपेक्ष राहात असे.समाजाला काय श्रेयस आणि काय प्रेयस याचे योग्य ते भान देत श्रेयसाप्रती अनुगामी करणे हाच त्यांचा जीवनोद्देश राहात असे
आज ती रचना अस्तित्वात नाही.त्याऐवजी राजसत्ता केंद्रित समाज रचना जगासोबत आपणही स्वीकारली आहे.साऱ्या सामाजिक जीवनाचे केंद्र राजकीय सत्ता झाले आहे.तीच सर्वंकष आणि सार्वभौम झाली आहे.समाज जीवनाची सारी क्षेत्रे विलक्षण गतीने आणि ताकदीने प्रभावित करण्याची ताकद तिच्यात आहे.दुर्दैव हे आहे की सत्तेचे राजकारण समाजाच्या श्रेयसापेक्षा प्रेयसालाच जास्त महत्व देणारे आहे.कारण लोकमत हेच सत्तेच्या राजकारणाचे कारक आहे. लोकानुरंजन,लोकानुनय,त्यातून लोकप्रियता,त्यातून सत्ता,सत्तेतून ,मत्ता,मत्तेतून पुन्हा सत्ता हे विषचक्र ही लोकतंत्र नावाच्या राजकीय रचनेची अपरिहार्यता आहे.त्यामुळे नरेंद्र मोदी असोत की अन्य कोणी, या राजकीय चक्रव्यूहात ते अडकले आहेत. आणि तीच त्यांची मर्यादा आहे.
जे समाजाला प्रिय आहे पण दूरगामी दृष्टीने घातक त्याच्यासाठी आहे.त्यापासून समाजाला परावृत्त करण्याची ताकद कोणत्याच राजकीय नेतृत्वात आज शक्य नाही.कारण त्यांना पुन्हा लोकांमधून निवडून यायचे आहे.
त्यामुळे समाजाला कठोरपणे खऱ्या श्रेयसाकडे नेणे एकट्या राजकीय सत्तेच्या आधारे कदापि शक्य नाही.मोदींसारख्या कणखर राजकीय शक्तीला समाजातील सज्जनांच्या बलदंड प्रसंगी सत्तेलाही नमवू शकणाऱ्या सज्जन शक्तिची समर्थ साथ त्यासाठी गरजेची आहे.
सध्या तरी संघशिवाय अशी दुसरी शक्ती दृष्टीपथ्यास नाही.आपण उल्लेख केलेले सारे महानुभाव वैश्विक मांगल्याचे आणि श्रेयसाचे हे मुलभूत चिंतन मांडून थांबले.ते साकार कशाच्या आणि कोणाच्या बळावर करायचे याची ब्लूप्रिन्ट दुर्दैवाने ते देऊ शकले नाही.सत्ता निरपेक्ष शाश्वत समाज धारणेसाठी आवश्यक सज्जन शक्तीची ब्लूप्रिन्ट डॉ हेडगेवार नावाच्या समाज शास्त्रज्ञाला सुचली.त्याचे स्वप्न आता राष्ट्रजीवनाला प्रभावित करू शकेल या ताकदीला नक्कीच पोहचले आहे. प्रश्न आपण उपस्थित केलेल्या मूलगामी चिंतन आणि बदलाचे हे आव्हान ही संघशक्ती कशी पेलणार आणि ते संघाने पेलावे यासाठी समाजातील सज्जन शक्ती संघाशी स्वतःला जोडून घेत सक्रिय कशी होणार हाच आहे.
- आशुतोष अडोणी
आशुतोष जी, आपल्या आत्मिय दीर्घ प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.
काही मुद्दे-
1) डॉक्टर हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, दीनदयाळ जी यांचा उल्लेख माझ्या लेखात नाही हे खरं आहे. मला वाटतं प्रत्येक वेळी ते आवश्यक नाही. विषयवस्तू आणि त्याची मांडणी या अनुषंगाने सहज जे येईल ते मांडावे. माझी तशी भूमिका असते. अमुक नाव यायला हवं किंवा अमुक यायला नको हे दोन्ही नसतं. शिवाय विशिष्ट समूह हेही लक्ष्य नसल्याने मांडणीच्या चौकटीत येईल तसे उल्लेख असतात.
2) आपण ब्ल्यु प्रिंट चा उल्लेख केला आहे. तशी ब्ल्यू प्रिंट शक्य आणि आवश्यक असते का? यावर दीनदयाळजींनी काहीही लिहिलेलं वा बोललेलं नाही. परंतु त्यांचा याबाबत काय विचार राहू शकला असता यावर दत्तोपंत ठेंगडी यांनी त्यांचे मत मांडले आहे. अन हे मत मांडताना, स्वा. सावरकर, लेनिन आणि चे गव्हेरा यांच्यात लंडन हाऊस मध्ये ब्ल्यू प्रिंटवर काय चर्चा झाली होती त्याचा संदर्भ दिला आहे. शक्य झाल्यास तो नजरेखालून घालावा.
3) संघ आणि संघटित ऋषीशक्ती - संघ, संघटना याबद्दल आपण सगळ्यांनाच एक वेगळं ममत्व आहे. मी स्वतः तृतीय वर्ष शिक्षित तर आहेच, अन बारा वर्ष तृतीय वर्षात शारीरिक शिक्षक आणि चर्चा प्रवर्तक राहिलो आहे. तरीही मला वाटते, संघटना या गोष्टीच्या मर्यादेचा विचार फारसा होत नाही. तो व्हायला हवा. पंथवेडेपणा त्यातून जन्माला येण्याची शक्यता असते.
संघटनेच्या या अंगभूत मर्यादांमुळेच ऋषी शक्ती संघटीत नव्हती, नाही अन असू शकत नाही. गरजेनुसार एकत्र होण्याची मात्र शक्यता असते. तशी ती होत आली आहे, पुढेही येत राहील. त्यासाठी संघटना (organisation) आणि संघटित अवस्था (organised state) यांचा सखोल विचार आवश्यक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा