रविवार, ६ मार्च, २०२२

राष्ट्रीयता- डॉ. झाकीर हुसेन आणि बिपिनचंद्र पाल

प्रसिद्ध ब्रिटीश लेखक, विचारवंत Samuel Johnson यांनी ७ एप्रिल १७७५ रोजी म्हटलेलं -  Patriotism is the last refuge of a scoundrel - हे वाक्य गेल्या काही दिवसात पुन्हा ऐकू येऊ लागलं आहे. राजकीय हेतूने प्रेरित लोक आणि स्वनामधन्य अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले तथाकथित बुद्धिवादी, विचारवंत, कार्यकर्ते हेदेखील या कळपात सामील होतात. अन देश, देशभक्ती, राष्ट्र, राष्ट्रभक्ती सगळे काही उडवून लावतात. त्यांनी याचा किती प्रामाणिक अन गंभीर विचार केला असतो कोणास ठावूक. मात्र, या पार्श्वभूमीवर भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांनी २७ डिसेंबर १९६७ रोजी पतियाळा येथे श्रीगुरुगोविंदसिंह भवनाच्या कोनशीला समारंभ प्रसंगी व्यक्त केलेले विचार मननीय आहेत. डॉ. झाकीर हुसेन म्हणतात-

`मला वाटते की, माणसाला घर या शब्दाचा नीट अर्थबोध झाला तरच त्याला मातृभूमीशी असलेल्या आपल्या संबंधांचे खरे महत्व आकलन होते. घर या कल्पनेची अनेकविध अंगोपांगे आहेत. एखाद्या बालकाच्या दृष्टीने घर म्हणजे आईची प्रेमळ आणि सर्व काही देणारी कूस असते. जसजसा तो मोठा होतो तसतशी आईवडिलांची झोपडी वा प्रासाद जे असेल ते, त्याच्या दृष्टीने घराचे प्रतिक बनते. हळूहळू जाणीवेचा जसजसा विकास होतो, तसतसे संपूर्ण रस्ता किंवा वस्ती यांना त्याच्या मनात घराचा आशय प्राप्त होतो. मग साऱ्या आसमंतातील झाडे, वनस्पती, चिमण्या, ओळखीचे चेहरे, पाळीव प्राणी इत्यादी सभोवारच्या गोष्टी त्याच्या विलोभनीय गृहकल्पनेची शोभा बनतात. याप्रमाणे उच्च जाणीवांच्या आणि ज्ञानाच्या क्षेत्रात तो प्रवेश करतो तेव्हा; कितीतरी गोष्टींचा समावेश असलेला परिसर या दृष्टीने तो घराकडे पाहू लागतो. त्यात घराच्या विविध भिंती अन उंबरठे असतात. नाना प्रकारची ध्येये अन स्वप्ने यांचे जणू मूर्त रूपच त्यांनी धारण केलेले असते. धार्मिक कथा व रूपक कथा, कला आणि साहित्य, इतिहास व संस्मरणीय घटनांची मालिका इत्यादी व आणखी खूपशा गोष्टींची आकर्षक मांडामांड त्यात झालेली असते. थोडक्यात अनेक अंगोपांगांनी ती वास्तू विकास पावते आणि सगळ्या राष्ट्राला त्याच्या कवेत घेते. राष्ट्राचे सगळे निवासी आपल्या घरातील आप्त आहेत असे वाटू लागते. सत्य आणि न्याय यावर उभी असलेली राष्ट्राची राजकीय ध्येये, त्याचप्रमाणे त्याचे अनमोल सांस्कृतिक धन आणि परंपरा, त्याच्या इतिहासातील आनंददायक व सोनेरी क्षण हे सारे घराच्या दर्शनी रचनेचे अविभाज्य भाग बनून जातात. प्रारंभी केवळ आईची कूस असलेले घर, अखेर केवळ घरासभोवारच्या भौगोलिक परिसरापर्यंतच नव्हे तर राष्ट्रीय जीवनाच्या विशाल पटाचा समावेश होण्याएवढे विस्तारते. माणसाच्या घराचा परीघ केवढा तरी विस्तारलेला असतो.'


सगळ्यात अलीकडच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यात प्रसिद्ध पावलेल्या लाल- बाल- पाल- या त्रयीतील श्री. बिपीनचंद्र पाल म्हणतात-

`राष्ट्रीयता ही जागतिक मानवतेपासून वेगळी करता येणार नाही. स्वाधीनता आणि स्वातंत्र्य यांचे मूल्य आणि वैशिष्ट्य `स्व' शब्दाच्या आशयातील भव्यतेत आहे. हा `स्व' जसा व्यक्तिगत आहे तसा तो वैश्विकही आहे. वस्तुत: दोन्ही एकच आहेत. माणसाच्या खऱ्या स्वातंत्र्याची कक्षा तो वैश्विक `स्व'शी स्वत:ची एकता जेवढी अनुभवेल त्या प्रमाणात विस्तारत असते. सभ्यतेची अंतिम अवस्था म्हणजे माणसाची परिपूर्णता. केवळ शारीरिक वा भौतिक अर्थाने नव्हे, तर नैतिक आणि आध्यात्मिक अंगांनीही परिपूर्णता. माणसाला समाजाचा एक घटक, संपूर्ण समाजाचा एक अवयव या नात्याने लाभणारी परिपूर्णता अधिक महत्वाची होय. हिंदुत्व ही केवळ एक federal कल्पना नाही. ती आणखी पुढे गेलेली आहे. इतकी की, भारत म्हणजे जागतिक ऐक्याचे, जागतिक संघराज्याचे; कोणीही पाहावे असे प्रतिक झालेला आहे.'

- श्रीपाद कोठे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा