रविवार, २७ मार्च, २०२२

`भारत माता की जय'च्या निमित्ताने

सगळ्या जगात भारतमातेचा जयजयकार व्हावा.- डॉ. मोहनजी भागवत

भारत माता की जय म्हणण्याची जबरदस्ती करू नये.- डॉ. मोहनजी भागवत

ही दोन वाक्ये वृत्त वाहिन्यांवर आणि सोशल मिडीयावर दिसत आहेत. त्यावरील चर्चाही दिसत आहेत. ही एकाच भाषणातील दोन वाक्ये आहेत की दोन वेगळ्या भाषणातील हे माहीत नाही. पण ही दोन वाक्ये परस्परविरोधी आहेत आणि हा `यु टर्न' आहे अशा चर्चा पाहायला, ऐकायला मिळाल्या. यात परस्पर विरोध कसा किंवा घूमजाव कसे हे कळायला मात्र मार्ग नाही. सगळ्या जगाने भारतमातेचा जयजयकार करावा, याचा अर्थ तो जबरदस्तीने करायला लावावा असा होतो का? किंवा भारत माता की जय म्हणण्याची जबरदस्ती करू नये याचा अर्थ जगाने भारतमातेचा जयजयकार करू नये असा होतो का? अर्थात संघ विरोधकांनाच फक्त सगळे कळत असल्याने असे होत असावे.

वास्तविक या दोन्हीत काहीही विरोध नाही. हा विरोध कसा नाही आणि याचा नेमका आशय काय हे समजावून सांगणाराच, संघाचा नऊ दशकांचा इतिहास आहे. पण तो नीट पाहून, समजून घेणाऱ्यांसाठी. कसा अभिव्यक्त होतो हा आशय संघाच्या इतिहासातून? `भारत', `भारत माता की जय', `वंदे मातरम', `हिंदू, हिंदुत्व, हिंदू राष्ट्र' आदी शब्द आणि विचार मांडायला संघाने १९२५ साली सुरुवात केली. त्यावेळीही त्याला प्रचंड विरोध होता. पण संघाने कोणावरही कसलीही जबरदस्ती न करता आज कोट्यवधी लोकांच्या ते गळी उतरवले आहे आणि कोट्यवधी लोक संघाची भाषा आणि विचार बोलू लागले आहेत. तेही कोणत्याही जबरदस्तीविना. अन ही केवळ संघाची विशेषता नाही. स्वामी विवेकानंद याविषयी बोलताना म्हणाले होते की, फुलाच्या सुगंधासारखे पसरणे हे भारतीय विचारांचे वैशिष्ट्य आणि पद्धती आहे. ते जबरदस्ती न करता पसरत जातात. संघानेही नऊ दशकात ते करून दाखवले आहे. पण जबरदस्ती हीच पद्धती आणि जबरदस्ती हीच वृत्ती, असे मानणाऱ्या, समजणाऱ्या अन तसाच व्यवहार करणाऱ्यांना; ही पद्धती माहीत नसल्याने डॉ. भागवत यांच्या या विधानांमध्ये विरोध किंवा घूमजाव दिसून येणे स्वाभाविक आहे.

या अनुषंगाने काही नोंद घेणे उचित ठरेल. संघाची एक प्रार्थना आहे. ती रोज म्हटली जाते. त्यात दुसऱ्या कडव्याची सुरुवात `प्रभो शक्तिमन' अशी आहे. ईश्वराला काही गुण मागितले आहेत. एकदा सहज विचार करताना, थोडा टोकाचा पण सूक्ष्म विचार मनात आला- हिंदूच्या व्याख्येत सगळ्यांचा समावेश होतो. सगळे याचा अर्थ विविध ईश्वर मानणारे यांच्यासोबतच ईश्वर न मानणारे, अद्वैती यांचा सुद्धा. हे ईश्वर न मानणारे आणि अद्वैती (कारण ते निर्गुण निराकार ईश्वर मानत नाहीत. स्वाभाविकच त्याला काही मागणे हेही अशक्य.) यांनी संघाची प्रार्थना कशी म्हणावी? ते हिंदू आहेत, संघही त्यांना हिंदू मानतो. त्यामुळे संघात सहभागी होण्याला आडकाठी काहीच नाही. पण ही प्रार्थना म्हणणे म्हणजे स्वत:च्या मतांशी वा श्रद्धांशी फारकत घेणेच. कोणाशी बोलावे हा प्रश्न पडला आणि संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, भाष्यकार, विचारवंत श्री. मा. गो. उपाख्य बाबुराव वैद्य यांच्याशी बोललो. त्यांना मनातील विचार सांगितला. त्यांनी ऐकून घेतले. मग ते म्हणाले- `तू म्हणतोस ते बरोबर आहे. पण काही गोष्टी नीट समजून घे. एक तर एवढा सूक्ष्म विचार फार कोणी करीत नाहीत. संघाची प्रार्थना सुद्धा ज्या भावनेने म्हटली जायला हवी त्या भावनेने सगळे म्हणत नाहीत. त्यात उपचाराचा भागही बराच असतो. संघाने एक पद्धत आणि विचार, संघटना उभारणीसाठी निश्चित केला आहे. ईश्वर न मानणारे किंवा अद्वैती यांनी प्रार्थना करण्यात संघाला अडचण नाही. पण अशी वेळ आली तर संघ जबरदस्ती करणार नाही. निर्णय त्या-त्या लोकांनी घ्यायचा आहे.' त्यावर माझा प्रश्न होता- `पण संघ तर नि:शेष हिंदू समाजाचे संघटन करतो. मग ईश्वर न मानणाऱ्यांना बाजूला कसे ठेवता येईल, वगळता कसे येईल. अन प्रार्थना म्हणायची नाही तर कार्यात सहभागी कसे होता येईल?' त्यावर बाबुरावजी म्हणाले- `संघ अशा लोकांना बाजूलाही ठेवत नाही, वगळतही नाही. पण संघाच्या शाखेच्या रचनेत उभे राहायचे तर प्रार्थना म्हणावी लागेल. अन ती न म्हणण्याचा निर्णय कोणी घेतला तर तो रचनेच्या बाहेर उभा राहील. रचना सोडून बाकी तो संघाचा राहील, संघाचे कामही करू शकेल.' श्री. वैद्य यांच्याशी झालेली ही चर्चा अन त्यांनी दिलेली उत्तरे इतकी स्पष्ट आहेत की- जबरदस्ती, अभिव्यक्ती, विसंगती इत्यादी प्रश्नांना जागाही उरू नये. अर्थात हे सारे, समजून घेण्याची इच्छा अन तयारी असलेल्यांसाठी.

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार, २८ मार्च २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा