मंगळवार, १ मार्च, २०२२

मुरारीबापूंचे मृत्यूचिंतन

गेले काही दिवस मुरारी बापूंचं 'मानस मृत्यू' ऐकलं. तुलसी रामायणाच्या आधारे मृत्यूचिंतन. यू ट्यूबवर नऊ व्हिडीओ आहेत. सिडनीला या विषयावर बापू नऊ दिवस बोलले होते त्याचे. ही व्याख्याने नाहीत. धार्मिक कथा/ प्रवचने असंच स्वरूप आहे. त्यामुळे कुठे कुठे कंटाळवाणं होऊ शकतं. मला झालं. माझ्यासारख्याच भाविक प्रकारात न येणाऱ्यांना थोडं धीराने घ्यावं लागेल पण मूळ विषय ऐकण्यासारखा, समजून घेण्यासारखा आहे. पहिल्या प्रवचनात प्रास्ताविक आहे. दुसऱ्या व्हिडीओपासून मूळ विषय सुरू होतो. तसाही मृत्यू हा माझ्या चिंतनाचा विषय आहे. 'हे मृत्यो' हा मृत्यूवरील ६७ कवितांचा माझा संग्रह आहे हे पुष्कळांना माहिती आहेच. जीवन समजून घ्यायचं तर मृत्यू समजून घेण्याला पर्याय नाही. त्याची पुष्कळ रूपेही आहेत. भारतीय आणि भारतेतर हा जीवनमूल्यांचा फरक समजून घ्यायचा असेल तरी मृत्यू आणि त्याकडे पाहण्याची दृष्टी समजून घ्यावीच लागते. कारण मृत्यूचा विचार हा संस्कृतीचा एक आधारभूत विचार असतो. प्राचीन इजिप्त संस्कृती लुप्त का झाली याबद्दल डीकिन्सन म्हणतो - 'त्यांच्या धर्माने मृत्यूच्या अपरिहार्यतेवर ना प्रकाश टाकला ना सांत्वना दिली.' स्वामी रंगनाथानंद म्हणतात - 'कोई भी तत्त्वज्ञान मृत्यू की समस्या सुलझाए बिना प्रगल्भता प्राप्त नहीं कर सकता. युनानी संस्कृती के महत दोषो मे से यह एक था.' तेव्हा ज्यांना रुची असेल त्यांनी (धर्म, ईश्वर मानणारे, न मानणारे दोघांनीही) जरूर 'मानस मृत्यू' ऐकावे.

- श्रीपाद कोठे

२ मार्च २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा