आज शेगावच्या श्री गजानन महाराजांचा प्रकटदिन आहे. जगभरातील त्यांच्या भक्तांसाठी हा मोठा दिवस असतो. विदर्भात तर घरोघरी या दिवशी महाराजांची पूजाअर्चा होते. गजानन महाराजांच्या जीवनाची सुरुवात, त्यांचे प्रकट होणे अन्नाशी जोडलेले आहे. त्यातही विशेष म्हणजे उत्सवानिमित्त झालेल्या जेवणावळीच्या बाहेर टाकलेल्या पत्रावळीवरील अन्न वेचून खाताना ते प्रकट झाले. म्हणूनच महाराजांचे प्रकट होणे केवळ अन्नाशी नव्हे अन्नब्रम्हाशी जोडलेले आहे.
त्यांच्या चरित्रात नंतरही अन्नाशी संबंधित बरेच प्रसंग आहेत. परातभर पंचपक्वान्न खाऊन त्याची उलटी करणे आणि पुन्हा तीच प्राशन करणे, भक्ताच्या भाजी भाकरीची वाट पाहत तिष्ठत बसणे, किडे पडलेली श्राद्धाची चिंचवणी निर्मळ करणे, शिंकाळ्यावर पडून राहिलेला कानवला मागून घेणे, ओढ्याचे गढूळ पाणी प्राशन करणे; असे अनेक प्रसंग आहेत. वर्तमान युगाला साजेशा रीतीने आजचा हा दिवस 'अन्न पवित्रता' दिवस म्हणून पाळायला हरकत नाही. त्यासाठी युनो, केंद्र वा राज्य सरकार आदींकडे पाठपुरावा वगैरे न करता, त्यांच्या भक्तांनी स्वयंस्फूर्तीने त्यांचा प्रकटदिन हा 'अन्न पवित्रता' दिवस पाळणे सुरू करावे. या दिवशी अन्नदान करणारे पुष्कळ असतातच, त्याला 'अन्न पवित्रता' दिवसाची जोड द्यावी. काय करावे या निमित्ताने?
१) अन्न वाया घालवणार नाही,
२) अन्नाचा अपमान करणार नाही,
३) अन्नाला नावे ठेवणार नाही,
४) अन्न फेकणार नाही,
५) अन्न ग्रहण करण्यापूर्वी अन्नाला नमस्कार करेन,
६) अन्न हे ब्रम्ह आहे हा भाव अन्न ग्रहण करताना आणि अन्य वेळेलाही जोपासेन,
७) शिळे अन्न उरलेच तर पोळ्यांचा कुचकरा, फोडणीचा भात, वरण वा भाजीचे थालीपीठ असा उपयोग करून त्याचा वापर करेन,
८) काही कारणाने अन्न विटलेच तर ते फेकणार नाही, टाकेन; (फेकणे आणि टाकणे यात मनोवस्थेचा खूप फरक आहे तो समजून घेईन);
९) अन्नाचा आग्रह आनंदापुरताच करेन, अवास्तव आग्रह करणार नाही,
१०) पोटभर आनंदाने अन्न ग्रहण करेन, पण अन्नावर ताव मारल्याची भावना ठेवणार नाही,
११) अन्नपदार्थ बिघडल्यास ते अन्नाचा वा करणाऱ्यांचा अवमान न करता सांगेन,
१२) या भूतलावर सर्व भूतमात्रांना पुरेसे अन्न मिळो, अशी रोज प्रार्थना करेन;
या आणि अशा आशयाची प्रतिज्ञा करावी. या दिवशी केलेली प्रतिज्ञा वर्षभर रोज करत राहावी. पुढे ती आयुष्यभराची सवय व्हावी. महाराजांच्या भक्तांचे पाहून अन्य लोकांमध्ये सुद्धा 'अन्न पवित्रतेचा' हा भाव पसरत जाईल. असे करत करत हा मानवी समाजाचा अविभाज्य भाव होईल. तोच उद्देश मनी बाळगावा.
यात अनेक किंतु परंतु येऊ शकतात. जसे कॅटरिंग व्यवसाय करणाऱ्यांना हे मॅनेज करण्यात काही अडचणी असू शकतात. अन्य लोकांनाही काही अडचणी असू शकतात. पण आपली वृत्ती अडचणी सांगण्याची न राहता, काय मार्ग काढता येईल याचा विचार करणारी असावी. मूळ अन्नब्रम्हाची पवित्रता, त्याविषयीचा आदर, जबाबदारी हे मनात असणे महत्त्वाचे. मार्ग, उपाय हे सगळे आपोआप गवसत जाईल. आपली भाषासुद्धा त्याप्रकारे बदलत जाईल. मूळ गोष्ट आहे अन्नाविषयीचा मनोभाव. श्री गजानन महाराजांचे स्मरण स्वतःसाठी काहीतरी मागणे किंवा त्यांच्या संस्थांनाचे कौतुक एवढेच न राहता; आपली वृत्ती अधिक शुद्ध होण्यासाठी आणि या जगातून क्षुधा संपून जावी यासाठी करावे; एवढेच मागणे.
- श्रीपाद कोठे
शुक्रवार, ५ मार्च २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा