जगण्यासाठी व्यवस्था लागते. व्यवस्था विकसित होताना तिची चौकट तयार होत जाते. चौकटीचे नियम असतात. नियमांची उतरंड होते. त्यात अधिकार श्रेणी तयार होतात. त्या चौकटीत माणूस जगतो. चौकटीच्या सीमा असतात. पण जीवन मात्र असीम असते. चौकटीच्या सीमेबाहेरची ही असीमता कोणाकोणाला कधीकधी खुणावते. असीमाचे हे खुणावणे कधी गरजेच्या रूपात असते. कधी लोभ, मोहाच्या रुपात असते. तर कधी प्रेरणा, स्फुरण या रुपात असते. ज्याला असीमता खुणावते त्याला चौकटच्या बाहेर पडायचे असते. चौकटीतील बाकीच्यांना मात्र चौकटीला धक्का नको असतो. कारण चौकटीच्या बाहेरील काही त्यांना खुणावत नसते. छान आहे की सगळं अशीच त्यांची भूमिका असते. चौकट वाईट नसते, चुकीची नसते; पण अपूर्ण असते. दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. आपण जीवन आणि चौकट याकडे कसं पाहतो त्यावर ते अवलंबून असतं. जीवनाचं आकलन जेवढं अधिक तेवढं; चौकट समजून घेणं, ती लवचिक ठेवणं, तिच्या सीमा विस्तारत नेणं आणि अंति चौकट टाकूनही देणं याची समज आणि उमज वाढत जाते. ही समज आणि उमज जेवढी अधिक असेल तेवढे घर्षण आणि तेवढा संघर्ष कमी असतात.
अशा चौकटी सगळीकडे, सर्वत्र असतात. अन जुन्या चौकटी लयाला गेल्या की नवीन तयार होतात. हे सतत सुरू असतं. कुटुंब, समाज, रीतीभाती, परंपरा, व्यवहार, नीती, संस्था, संघटना, आंदोलने, चळवळी, उपासना, शासन, प्रशासन, शिक्षण, मनोरंजन; एवढेच काय विचार ही गोष्ट सुद्धा याला अपवाद नाही. जगण्याच्या गरजेतून सीमित चौकटी तयार होत राहतात आणि जीवनाची असीमता त्यांना धडका देत राहते. चौकटीबाहेरचं काही दिसलं, जाणवलं, अनुभवलं की ते खोटं वाटतं किंवा चुकीचं वाटतं. आपल्या चौकटीत नाही म्हणजे ते चूक वा अयोग्यच असेल असा विचार बळावतो. कारण असीमतेची कल्पना नसते. अगदी विज्ञानाच्या सुद्धा चौकटी असतात आणि तयार होतात. त्यांना शास्त्र म्हटले जाते. अन शास्त्राच्या बाहेरचं असेल ते चूक ठरतं. यातूनच असीम जीवनाचा प्रवाह संकुचित होतो. परिणामी कट्टरता, आग्रह, काच सुरू होतात. हे टाळायचे असेल तर; जगण्याच्या संदर्भात सीमित चौकटींची अपरिहार्यता आणि जीवनाची असीमता दोहोंची जाणीव वाढायला हवी. तरच कौटुंबिक वाद आणि कलहांपासून, मोठाल्या जागतिक प्रश्नांपर्यंत, अन त्याहीपुढील गुंतागुंतीच्या तात्त्विक प्रश्नांपर्यंत; सगळ्या गोष्टींना सामोरे जाता येईल.
- श्रीपाद कोठे
रविवार, २० मार्च २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा