सहा वर्षे झाली मी फेसबुक वापरतो आहे. बहुतेक रोजच काही ना काही लिहितो. त्यापूर्वीचा सुमारे दोन दशकांचा main stream media चा अनुभव असला तरीही, फेसबुकवरील प्रतिक्रिया हा संपूर्ण वेगळा अन अनोखा भाग आहे. प्रथम प्रतिक्रिया देणाऱ्यांचे आभार. या प्रतिक्रियांचा विचार करताना विशिष्ट प्रतिक्रियांचा वेगळा विचार करावा लागतो. या प्रतिक्रिया मुद्दे सोडून तर असतातच, पण त्यात आकस आणि मनाचा- बुद्धीचा- वृत्तीचा हलकेपणा दिसून येतो. अशा प्रतिक्रियांमध्ये मग `काळी टोपी, खाकी चड्डी' यांचा उद्धार असतो. ब्राम्हण, देवदेवता यांचा उद्धार असतो. संस्कृती, परंपरांचा उद्धार असतो. आई- बहिणींचा उद्धार असतो. किंवा काही तरी असंबद्ध, अचकट विचकत शेरेबाजी असते. अशा व्यक्तींना ब्लॉक करणे हा त्यावरील उपाय. तो अनेक जण करतात. मीही करतो. पण अशा प्रतिक्रिया देणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, त्यांच्या अशा प्रतिक्रियांमुळे तेच उघडे पडतात. पोस्ट लिहिणाऱ्याला काय वाटत असेल वगैरे जाऊ द्या, पण या पृथ्वीवरील जो कोणी अशी प्रतिक्रिया वाचेल त्याला क्षणात लक्षात येते की, प्रतिक्रिया देणारा मुद्यांवर बोलूच शकत नाही. एक तर त्याची तेवढी मानसिक- बौद्धिक तयारी नाही किंवा मुद्दे एवढे बिनतोड आहेत की त्यावर काही म्हणता येत नाही किंवा प्रतिक्रिया देणारा दुष्ट बुद्धीचा आहे. कोणालाही हे सांगावे लागत नाही. अन हे अशा प्रतिक्रिया देणाऱ्या कोणालाही लागू होणारे आहे. उद्या मी अशी प्रतिक्रिया दिली तर मलाही ते लागू होईल. हा, तो, ते, ती असा काहीही भेद याबाबत करता येत नाही. ते सार्वकालिक, सार्वत्रिक सत्य आहे. तेव्हा प्रतिक्रिया द्या, पण मुद्यांवर बोला- लिहा. तर्कपुर्ण बोला- लिहा. मुद्दे भरकटवू नका. त्याने तुमचा अन तुमच्या विचारांचाच तोटा होतो. तुम्हाला हे पटणार नाही असे नाही. अगदी १०० टक्के पटेल. मात्र नुसते पटवून घेऊ नका ही विनंती. अर्थात तुम्ही स्वतंत्र आहात. मी म्हणतो वा सुचवतो म्हणून अशा प्रतिक्रिया बंद करू नका. पण तुम्हाला मनातून वाटले तर बदल करा. अन्यथा... या पोस्टवर सुद्धा तुमच्या पद्धतीने प्रतिक्रिया द्यायला तुम्हाला मोकळीक आहेच.
- श्रीपाद कोठे
७ मार्च २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा