गुरुवार, १० मार्च, २०२२

परिवर्तन नव्हे पूर्णता

परिवर्तन, बदल हा शब्दच चुकीचा वाटू लागला आहे. बदल होतो स्थिर वस्तूत. परिवर्तन होतं चौकटीत. पण माणूस, समाज, जीवन ही काही स्थिर चौकटीतली गोष्ट नाही. तो काही मखरात बसवलेला गणपती नाही. म्हणूनच बदल वा परिवर्तन करताना त्रास होतो, खळखळ होते. बदलायला हवं म्हटलं की पहिली प्रतिक्रिया नकाराची असते. मी वा आम्ही का बदलायचं? हाच प्रश्न मग निरनिराळी रूपं घेतो. स्त्रियांनी का बदलायचं? पुरुषांनी का बदलायचं? परंपरा का बदलायच्या? व्यवस्थेत बदल नको. बदल म्हणजे अस्मितेवर घाला, बदल म्हणजे स्वत्वावर घाला, बदल म्हणजे अन्याय, बदल म्हणजे जबरदस्ती, बदल म्हणजे काही तरी गमावणे; अशी मानसिक रूपे त्याला येतात. वयाचे बदल, परिस्थितीचे बदल हेही टोचू लागतात. विचार, भावना, क्रिया प्रतिक्रिया, attitude  यातील किंचितसा बदल सुद्धा स्वीकारणं, समजून घेणं जड जातं. अनेक बदल आश्चर्य, भीती, निराशा, अविश्वास, निरर्थकता, टवाळखोरी जन्माला घालतात. स्त्री दाक्षिण्यासाठी ओळखला जाणारा पुरुष स्त्रियांचा राग करतो, पुरुषांना पाण्यात पाहणारी स्त्री पुरुषांचा सहानुभूतीने विचार करू लागते, डॉ. बोकरे यांच्यासारखा कम्युनिस्ट हिंदुत्ववादी होतो, एखादा ईश्वरवादी नास्तिक होतो, क्रांतिकारक डॉ. हेडगेवार तो मार्ग सोडून देतात किंवा अहिंसेचा पुजारी असलेला महात्मा त्राग्याने अपरिहार्य म्हणून शस्त्रांचे समर्थन करतो; तेव्हा ते आपल्याला बुचकळ्यात टाकते. याचे कारण आपण याकडे बदल वा परिवर्तन म्हणून पाहतो. ज्याला आपण परिवर्तन म्हणतो ते मुळात परिवर्तन नसतेच, तो पूर्णतेच्या प्रवासाचा एकएक टप्पा असतो. व्यक्ती वा समाज वा परिस्थिती निर्मितीच्या क्षणीच परिपूर्ण असतो असं आपण गृहीत धरतो. अन मग जगताना होणारी फरपट वाट्याला येते. आम्हाला बदलायला लावणारे तुम्ही कोण, असा टोकदार सवालही त्यातून येतो. किंवा परिस्थितीच्या नावे बोटे मोडली जातात. अंती 'बदल हीच एकमेव स्थायी बाब आहे' असे उसासे टाकले जातात. मोठमोठ्या सामाजिक वा धार्मिक नेत्यांना आलेले अपयश सुद्धा परिवर्तन या शब्दामुळेच. व्यावहारिक मानसिकतेपासून तात्त्विक जीवनदर्शनापर्यंत एक नकारात्मक परिणाम या परिवर्तन शब्दांमुळे होतो. आणि वास्तविक तो चुकीचाही आहे. अन चुकीचा असल्यानेच त्याचा मेळ न बसता अडथळे निर्माण होतात. परिवर्तन हा शब्द आणि कल्पनाच चुकीची आहे. त्याऐवजी पूर्णतेचा प्रवास ही कल्पना पुढे येणे, समजून घेणे, त्याचा विकास आणि परिवर्तन याऐवजी पूर्णता असा शब्दप्रयोग ठीक राहील.

- श्रीपाद कोठे

नागपूर

रविवार, ११ मार्च २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा