आटोपशीरपणा, प्रमाणबद्धता, तारतम्य, विवेक; हे शब्दसुद्धा बहुसंख्य लोकांना माहिती नसतील बहुधा. अन ज्यांना माहिती असतील त्यांना त्याचा नीट अर्थबोध आणि त्यानुसार व्यवहार याची जाण किती असेल हा तर गहन चिंतनाचा, सर्वेक्षणाचा अन अभ्यासाचा विषय व्हावा. झाडे लावण्यापासून तर स्वच्छतेपर्यंत, आरोग्यापासून तर आनंदापर्यंत, परस्पर संबंधांपासून तर पैशापर्यंत; कोणताही विषय असो, कोणतेही क्षेत्र असो; आटोपशीरपणा, प्रमाणबद्धता, तारतम्य, विवेक; यांचा अभावच अभाव. हे खरे की प्रत्येकाच्या या गोष्टींच्या कल्पना वेगळ्या असतील पण किती? ज्याला ऊंनीस बिस म्हणतात तेवढा फरक समजून घेता येतो. पण वास्तव असे आहे की या गोष्टींची वानवाच आहे. रोज जगाला शहाणे करण्यासाठी लिहिणारे लोकही याला जबाबदार आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत राजकारण राजकारण राजकारण याशिवाय त्यांना काहीही दिसत नाही अन दिवसरात्र त्यासाठीच लेखणी झिजवणारे तद्दन निरर्थक आहेत. वाईट वाटेल पण नाईलाज आहे. जणू अमक्या नेत्याने काय केले, तमक्याने बरोबर केले की चूक इत्यादी इत्यादी चघळले की सगळं आलबेल होणार आहे जणू. या लोकांना दुसरं काही दिसत नाही, दुसरं काही सुचत नाही, दुसरं काही समजत नाही. अन हे लोक इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत की परिणामी भाजी विक्रेत्यांपासून माळ्यापर्यंत, वाहन चालकापासून कॉर्पोरेट लोकांपर्यंत सगळे तेच चघळत राहतात. खरंच मानव आणि मानवसमाज भला व्हावा, त्यांचं भलं व्हावं असं कणभर तरी वाटतं का?
- श्रीपाद कोठे
१२ मार्च २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा