मंगळवार, १ मार्च, २०२२

`आम’ नकोच

अरविंद केजरीवाल या माणसाने देशात गेली काही वर्षे खळबळ माजवली आहे. अण्णा हजारे यांचा हनुमान, त्यानंतर राजकीय पक्षाची स्थापना, त्या पक्षाचे नामकरण, दिल्ली विधानसभा निवडणूक, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आता देशभरात लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी करीत असलेल्या पक्षाचे सर्वेसर्वा म्हणून या व्यक्तीने खळबळ माजवली आहे. त्यांनी घेतलेले नाव आणि त्यांची कामे हे देखील त्याला साजेसेच आहे. पक्षाचे नाव `आम आदमी’, कृती आम आदमीसारखीच, विचार आम आदमीचे, दर्शन आणि वागणे आम आदमीसारखे, डोईवरच्या टोपीवरील अक्षरेही `आम आदमी’ अशीच. हे सगळे सामान्य माणसाला आवडेल असेच. तसेही सामान्य माणसाला खळबळ आवडतेच. `कपडे फाडा, मडकी फोडा, मग गाढवावर बसा; कशाही पद्धतीने का असेना प्रसिद्ध व्हा’ अशा आशयाचे; माणसाच्या गमतीशीर मानसिकतेचे वर्णन करणारे एक संस्कृत सुभाषित आहे. थोडक्यात काय तर आम आदमीला हे सगळे आवडते आणि आपली लोकशाही व्यवस्था ही लोकांच्या आवडीनिवडी आणि लोकांची मते यावर अवलंबून असल्याने आणि लवकरच या लोकशाहीचा पंचवार्षिक महोत्सव असल्याने या सगळ्याचे एक अपूर्व रसायन तयार झाले आहे.

अगदी अनादी काळापासून `लोक’ या बाबीची काही ठळक लक्षणे पाहायला मिळतात. स्वत: जबाबदारी न घेण्याची वृत्ती, आपली जबाबदारी दुसऱ्याने घ्यावी ही अपेक्षा, जबाबदारीची ढकलाढकल, कोणीतरी आपले भले करावे ही मानसिकता, आपल्यासाठी कोणीतरी धावून यावे ही वृत्ती, फारसा विचार न करणे, आपण काय करायला हवे या ऐवजी दुसऱ्याने काय करायला हवे आणि दुसरा काय करतो यावर भर, आपल्यावर वेळ आली की पळ काढणे, सतत असुरक्षितता आणि असमाधान, सतत काही ना काही मागणे, समस्या- समस्यांचे समाधान- यांचे बहुमुखी स्वरूप समजून न घेता एखाद्याच गोष्टीवर भर देणे; वगैरे काही ठळक लक्षणे म्हणता येतील. स्वत: केजरीवाल, त्यांचा पक्ष आणि त्यांचे कार्यक्रम- आंदोलने- योजना, या साऱ्यात `लोक’ची ही लक्षणे ठासून भरलेली दिसून येतात. लोक तर काय असेच असतात. त्यामुळे केजरीवाल, आम आदमी पार्टी आणि त्यांच्या घोषणा यांना पाठींबा दिसून येतो.

खरा मुद्दा असा आहे की, माणूस `आम’ राहीला तर चालेल का? सगळ्या जगाचा इतिहास आणि वर्तमान पाहिला तरी एक गोष्ट चटकन लक्षात येते की माणसाचे `आम’ असणे हीच मूळ समस्या आहे. त्यामुळेच जगभरात सर्वत्र सगळे संत-महात्मे, धर्म, धर्माचार्य, विचारवंत, समाजसुधारक, नेते, कार्यकर्ते, चळवळी यांनी मानवाला `खास’ करण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यासाठी त्यांनी स्वत: ते `खास’पण कमावले आणि सिद्ध केले. नेहमीच्या भाषेत बोलायचे तर या सगळ्यांनी नराचा नारायण करण्याचे प्रयत्न केले. या प्रयत्नातूनच समाज नावाची बाब विकसित होते. या प्रयत्नातूनच समस्या मार्गी लागतात. मानवी गर्दीचा समाज होणे आणि त्या समाजाचे शांत, स्वस्थ, सुखी जीवन उभे होणे ही एक प्रक्रिया असते. म्हणूनच अगदी वेदकाळी सुद्धा आमच्या ऋषींनी म्हणजेच या देशाच्या विचारवंतांनी प्रार्थना केली `सन्गच्छध्वम्, सम्वदध्वम्, सम्वोमनासि जानताम्‘. सगळ्यांची मने एक होवोत, सगळ्यांची वाणी एका स्वरात बोलू लागो, सगळ्यांचे ध्येय एक होवो. ही `खास’ होण्याची प्रार्थना आणि प्रक्रिया आहे. त्यासाठी नेता सुद्धा खास असायला हवा, आम नाही.

राजकीय क्षेत्रातील नेत्याला आपण साधारणपणे नेता म्हणतो. पण कलाकार, साहित्यिक, विचारवंत, उद्योगपती, क्रीडापटू, विविध क्षेत्रात ज्यांनी आपली नाममुद्रा उमटविली आहे ते सारे समाजाचे नेतेच असतात. संत, धर्मगुरू हे सुद्धा नेतेच असतात. हे नेते जेव्हा असामान्य असतात, `खास’ असतात; तेव्हा ते समाजालाही वर उचलतात आणि समाज जेवढा वर उचलला जाईल तेवढ्या समस्या मार्गी लागतात, तेवढी सुखशांती लाभते. जगभरच्या मानवाची सभ्यता अशीच विकसित झालेली आहे. राजकीय क्षेत्रात सुद्धा हेच दिसून येते. पंडित नेहरू, सरदार पटेल, महात्मा गांधी, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण यांच्यासारख्यांनी राजकारण घडवले. आज राजकारण समाजाला वर उचलण्याऐवजी समाज रसातळाला नेत असेल तर वर उल्लेख केलेल्या नेत्यांसारखे नेते राजकारणात असणे गरजेचे आहे. समाजातून असे नेते राजकीय व्यवस्थेत कसे जातील याचा विचार आणि प्रयत्न करावा लागेल. तसेच आज राजकारणात असलेल्या प्रामाणिक आणि कळकळीच्या नेत्यांनी मार्गातील अडथळे दूर करीत उत्तुंग नेतृत्वाची रिक्तता भरून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या ऐवजी नेतेही आम आणि लोकही आम, दुसऱ्या शब्दात म्हणजे बाजारबुणगे; यांचाच भरणा झाला तर समाज आहे त्याहून खाली घसरेल.

त्यासाठी प्रथम नेता खास हवा. हजारो वर्षांपूर्वी कालद्रष्ट्या भीष्माचार्यांनी नि:संदिग्धपणे सांगून ठेवले आहे, `राजा कालस्य कारणम्‘. या नेत्याकडे धीर असला पाहिजे, धैर्य असले पाहिजे, विवेक असला पाहिजे, निर्णयशक्ती असली पाहिजे, दूरचे पाहण्याची क्षमता असली पाहिजे, अनेक गोष्टींचा एकत्रित आणि समन्वित विचार करण्याची क्षमता असली पाहिजे, टोकाच्या विरोधकांशी सुद्धा संवाद करण्याची हातोटी असली पाहिजे, गुप्त गोष्टी गुप्त राखण्याची आणि मुक्त गोष्टी मुक्त करण्याची हातोटी असली पाहिजे, अवास्तव अपेक्षा शांत करण्याचे कौशल्य असले पाहिजे, लोकांना स्वप्ने दाखवण्यासोबतच योग्य-अयोग्य विवेक आणि सारासार विचार सांगण्याची ताकद हवी. `आम’ केजरीवाल यांच्याकडे यातील काहीही नाही. एकच मुद्दा पुरेसा आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून त्यांनी मुख्यमंत्री पद सोडले. ते एक विधेयक पारित झाले की भ्रष्टाचार संपला असे होणार नाही हे त्यांना कळते. त्यामुळे त्याचा एवढा बभ्रा करण्याऐवजी, काही काळापुरते ते विधेयक बाजूला ठेवून महिला सुरक्षेसाठी महिला कमांडो गट तयार करू शकले असते. त्यात काही अडचण आली नसती. एक मोठे काम झाले असते. महिला सुरक्षा ही मोठी समस्या आहे की नाही? मुख्यमंत्री म्हणून ही समस्या सोडवण्याची जबाबदारी असते की नाही? की, अमुक एक समस्या माझ्या पद्धतीने आणि माझे समाधान होईल अशा पद्धतीने निकाली निघेपर्यंत लोकांनी अन्य कोणत्याही समस्येचे नाव काढू नये. अन्य हजारो समस्यांसहच जगावे, असे म्हणणारा नेता काय नेता म्हणता येईल?

या `आम’पणाचा फायदा नेते घेतात. कोणी असामान्य होऊन फायदा घेतात तर कोणी सामान्य असल्याचे दाखवून फायदा घेतात. खरा नेता बाहेरून सामान्यच हवा. सामान्यांसारखा वागणारा, बोलणारा, राहणारा; सामान्यांशी जुळलेला आणि आतून मात्र असामान्य हवा; लोकांच्या कल्याणाची आग मनात पेटलेला, तरीही त्या आगीने काहीही भाजले जाणार नाही किंवा आवश्यक असलेले काही जळून जाणार नाही याचे व्यवधान बाळगणारा द्रष्टा हवा.

अरविंद केजरीवाल कदाचित प्रामाणिक असतील, कळकळीचे असतील, लोकांचे भले व्हावे ही त्यांची इच्छा असेल; पण त्यासोबतच ते अविवेकी, अपरिपक्व आणि आततायी आहेत. यातून फक्त `हंगामा’ उभा होईल, `सुरत’ मात्र बदलणार नाही. त्यांना जेवढ्या जागा मिळतील तेवढे त्यांचे उपद्रवमूल्य वाढेल. म्हणून त्यांना देशभरातून एकही जागा मिळायला नको. त्यासाठी ते आणि त्यांची आम आदमी पार्टी यांच्याविषयी नकारात्मक भाव निर्माण व्हायला हवा. समाज सुखशांतीपूर्ण राहण्यासाठी ५० टक्के जबाबदारी समाजाची असते आणि ५० टक्के जबाबदारी शासन-प्रशासनाची असते. आपली ५० टक्के जबाबदारी पार पाडण्यासाठी लोकांना `आम’ राहून चालणार नाही. लोकांना खास व्हावेच लागेल. तसा प्रयत्न सतत व्हायला हवा. शासन-प्रशासनाने ५० टक्के जबाबदारी पार पाडावी यासाठी नेता `खास’ हवा. आपला नेता निवडण्याची तशी खास संधी पाच वर्षातून एकदा मिळत असते. दोन महिन्यात तशी संधी मिळणार आहे. त्यावेळी लोकांनी `खास’ नेता निवडावा. `आम्हीही खास होऊ, नेताही खास असेल. आम नकोच,’ हाच आता जनतेचा नारा व्हायला हवा.

- श्रीपाद कोठे

नागपूर, २ मार्च २०१४

************

कोण म्हणतं समाज खास झाला नाही? आदिम समाज आणि आजचा समाज यात काहीच अंतर नाही का? एक अगदी ढोबळ उदाहरण घेता येईल. जगात दोन महायुद्धे झाली. पण त्याने जगाला मोठा धडा शिकवला आहे. त्यामुळेच आज सुमारे ७० वर्षे होत आली पण जागतिक युद्ध झालेले नाही. जगाच्या इतिहासात एवढा मोठा कालखंड अशा पद्धतीने गेलेला आहे का? याचा अर्थ युद्धे संपली असा काढणे हा वेडेपणा ठरेल. पण आम्ही काहीच प्रगती केली नाही असे नाही म्हणता येणार. अनेक गोष्टी आहेत. आपण रोज रात्री सुखाने झोपू शकतो हे या प्रार्थनेचेच फळ नाही का? माणसाला म्हणजेच त्याच्या मनाला उर्ध्वगामी विचार आणि भावभावनांनी उचलून घेतल्याशिवाय हे शक्य आहे का? माणूस स्वार्थी आहे म्हणून त्याला स्वार्थच शिकवला तर त्यातून काय साध्य होईल? किंवा तो स्वार्थी आहे म्हणून फक्त बोटे मोडत राहूनही काय होईल? शिकवण ही नि:स्वार्थ होण्याचीच द्यावी लागेल. काही बरे झाले तर त्यातूनच होईल. आणि दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा, जो कधी म्हणजे कधीही दृष्टीआड होऊ देता कामा नये- तो म्हणजे, असा एक दिवस कधीच नव्हता आणि कधीही असणार नाही, की जेव्हा सारे काही आलबेल, सुख शांतीपूर्ण, सुसंवादी वगैरे राहील. आणि तरीही त्याचीच आराधना करण्याशिवाय आपल्याला पर्यायही नाही. मुळातच या जगाचं रूप नीट समजून घेण्याची गरज आहे. पण नीट म्हणजे मला किंवा तुम्हाला किंवा आणखी कोणाला हवं तसं नाही. आपल्या मापदंडाने किंवा कल्पनेने किंवा अपेक्षेने जग समजून घेण्याची नाही, तर ते आहे तसे समजून घेण्याची आणि त्याबरहुकूम आपले मापदंड, आपल्या कल्पना, आपल्या अपेक्षा बेतण्याची गरज आहे. याचं एकमेव कारण हे आहे की हे जग आपण जन्माला घातलेलं नाही; या जगाने आपल्याला जन्माला घातलं आहे.

आराधना शिवत्वाची (चांगल्याची- सत्य, शिव, सुंदराची- not subjective or relative but objective and absolute) करायची आणि स्वत: माणूस होण्यासाठी करायची. जगाचं भलं करण्याचा अहंकार आणि बदल्यात काहीतरी मिळवण्याचा स्वार्थ हे दोन्हीही सोडून स्वत:ला माणूस बनवण्यासाठी, स्वत:ला परिष्कृत करण्यासाठी आराधना करायची.

कविता म्हणजे सत्य होत नाही.

आणि प्रार्थना या शब्दाची घृणा कशासाठी? प्रार्थना न म्हणता इच्छा म्हटले तरी आशय तर बदलत नाही ना? कशासाठी चांगल्याची इच्छा आणि प्रयत्न करायचे मग? ऋषीबिशी गेले उडत. सगळे समाज सुधारक किंवा समाजाचे भले व्हावे यासाठी झिजणारे मूर्खच होते म्हणायचे मग.

वकील साहेब बौद्धिक चर्चेत मी कधी टोकाला जात नाही, पण मला प्रामाणिकपणे वाटते की तुम्ही स्वत:ला जरा तपासून घ्यायला हवे.

कोणाकडून नाही, स्वत:चे स्वत:ला.

मला वेळ नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा