फाल्गुन पौर्णिमा (होळी पौर्णिमा) हा १५ व्या ख्रिस्त शतकातील प्रसिद्ध भगवदभक्त चैतन्य महाप्रभू यांचा जन्मदिवस. इ.स. १४८६ साली बंगालमधील नवद्वीप येथे त्यांचा जन्म झाला. बंगाली मातृभाषा असलेल्या चैतन्य महाप्रभूंचे मूळ नाव विश्वंभर मिश्रा असे होते. कडुलिंबाच्या झाडाखाली जन्म झाल्यामुळे त्यांना निमाई असेही म्हणत असत. त्यांच्या गौर वर्णामुळे त्यांना गौरांग असेही नाव मिळाले. षडदर्शने, तर्कशास्त्र, ज्योतिष्य, भागवत या साऱ्याचे त्यांनी अध्ययन केले. प्रसिद्ध विद्वान म्हणून त्यांची गणना होत असे. वल्लभाचार्यांची कन्या लक्ष्मीप्रिया यांच्याशी त्यांचा वयाच्या पंधराव्या वर्षी विवाह झाला. लग्नानंतर चार पाच वर्षे झाली असतानाच लक्ष्मीप्रिया यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी सनातन मिश्रा यांच्या विष्णूप्रिया नावाच्या मुलीशी दुसरा विवाह केला.
वडिलांचे पिंडदान करण्यासाठी विष्णूगयेला गेले असताना त्यांची ईश्वरपुरी यांच्याशी भेट झाली. त्यानंतर त्यांचे जीवन पूर्ण बदलून गेले. पांडित्य सोडून ते कृष्णभक्तीकडे वळले. अध्यापन कार्य सोडून देऊन ते सतत नामसंकीर्तनात बुडून गेले. हळूहळू त्यांची ख्याती वाढली. मोठ्या प्रमाणात लोक त्यांच्याकडे येऊन शिष्यत्व पत्करू लागले. सार्वजनिक रीतीने सामूहिक नामसंकीर्तन करण्याची एक नवीन उपासना पद्धती त्यांनी विकसित केली. आपले महत्व कमी होईल या भीतीने शाक्त आणि सनातनी पंथाचे लोक त्यांना विरोध करू लागले. एकदा या लोकांनी चांद काझी नावाच्या मुसलमान अधिकाऱ्याकडे चैतन्यांची तक्रार केली. चांद काझीने महाप्रभूंच्या ग्राम संकीर्तनावर बंदी घातली. चैतन्य महाप्रभूंनी ही बंदी झुगारून दिली आणि संकीर्तन दळासह ते चांद काझीकडे पोहोचले. त्याने दळावर शिपाई पाठवले पण चैतन्य डगमगले नाहीत. त्यांचे संकीर्तन सुरूच राहिले. त्यांचा दृढनिर्धार, निष्कपट कृष्णभक्ती आणि आध्यात्मिक तेज यामुळे चांद काझीला माघार घेणे भाग पडले. अन तोही त्यांच्या संकीर्तनात सामील झाला. चैतन्य महाप्रभूंनी सविनय कायदेभंगाची जणू पायाभरणीच केली. जगाई व मधाई यांना इस्लाम पंथातून पुन्हा हिंदू करून घेण्याचे कार्यही त्यांनी केले.
वयाच्या २४ व्या वर्षी, १५०९ साली त्यांनी केशव भारती यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली आणि नंतरचा पूर्ण काळ भगवदभक्तीचा प्रचार करण्यात घालवला. वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी जगन्नाथपुरी येथे त्यांनी इहलोकाचा निरोप घेतला. समुद्र किनाऱ्यावरून संकीर्तन करीत जात असताना, समुद्राचा निळा रंग पाहून त्यांना श्रीकृष्णाचा भावावेश झाला आणि अत्यानंदाने कृष्ण कृष्ण करत ते समुद्रात गेले. त्यातच त्यांचा अंत झाला.
वृन्दावनातील कृष्णलीलांची स्थाने शोधून काढण्याचे महत्कार्यही त्यांनीच केले. एक मोठा कालखंड वृंदावन दुर्लक्षित झाले होते. कोणालाही त्याबद्दल काही माहिती नव्हती. तीर्थयात्रेला गेले असताना त्यांना आतून प्रेरणा झाली. त्यानुसार त्यांनी शोध घेतला आणि वृंदावन प्रकाशात आणले. त्यावेळी सर्वत्र इस्लामी राजवट होती. त्यामुळे श्रीकृष्णाचे वृंदावन प्रस्थापित करणे सोपे नव्हते. चैतन्यांनी विचारपूर्वक नियोजन करून आपले सात शिष्य त्या भागात पाठवले आणि सात मंदिरांची उभारणी करून समाजाला त्यांच्याशी जोडले. सैनिकी संघर्ष न करता त्यांनी स्वीकारलेल्या भक्तीमार्गाने, त्यांनी समाज संघटित करून लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
- श्रीपाद कोठे
रविवार, २८ मार्च २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा