रविवार, २७ मार्च, २०२२

अजरामर गीत

हे गीत रामायणाचे दिवस आहेत. जेव्हा रेडिओचे चलन जास्त होते तेव्हा गुढीपाडवा ते राम नवमी या नऊ दिवसात सकाळ आणि संध्याकाळच्या कार्यक्रमात गीत रामायणातील कोणते ना कोणते गाणे ऐकायला मिळत असेच. यात हमखास ऐकायला मिळणारं आणि आजही अतिशय लोकप्रिय असलेलं गाणं आहे - 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा'. यमन रागाचा गोडवा, सुधीर फडकेंचा मधुर खणखणीत स्वर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग. दि. माडगुळकर यांच्या लेखणीतून उतरलेले भावोत्कट अर्थवाही शब्द. मनाला नेहमीच सादावणारं हे गीत आज तर अधिक गहिरं होतं. त्याचा सखोल अर्थबोध आपोआप मनात उतरतो.

गाण्याचं ध्रुवपदच किती सखोल आहे. 'दैवजात दु:खे भरता, दोष ना कुणाचा... पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' श्रीराम आपला धाकटा भाऊ भरत याला सांगतो आहे - दु:खे ही दैवजात आहेत. जसं रूप जन्मजात असतं, जन्माला चिकटलेलं असतं; तसं दु:ख दैवजात आहे, माणसाच्या दैवाला चिकटलेलं आहे. ते वेगळं काढता येत नाही. त्याच्यासह जगावं लागतं. यासोबतच श्रीराम दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतात - या चिकटलेल्या दु:खासाठी कोणीही दोषी नाही. मानवी जीवनातील सुखदु:खाच्या चक्रासाठी कोणाला वा कोणाकोणाला दोषी ठरवण्याचा खेळ किती फसवा असतो हे जाणिवा प्रगल्भ होत जातात तसतसे कळत जाते. स्वतःचे वा बाकीच्यांचे मानवी प्रयत्न, हेतू, परिस्थिती या साऱ्याच्या पलीकडे आपल्या सुखदु:खाचे मूळ आहे हे उमजत जाते आणि ध्रुवपदाची दुसरी ओळ ओठांवर येते - पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा. मानवाचा पुत्र स्वाधीन नाही, पराधीन आहे.

यानंतरच्या तीन तीन ओळींच्या दहा कडव्यात, ध्रुवपदातील हाच मध्यवर्ती भाव उलगडून सांगितला आहे. यातील सहा कडव्यात प्रत्यक्ष राम - भरताच्या जीवनातील प्रसंगांचे संदर्भ आहेत, तर चार कडव्यात तात्विक विवेचन आहे. पहिल्याच तीन ओळीत राम सांगतात - माता कैकयी किंवा पिता दशरथ हे त्यांचा राज्यत्याग, वनवास यासाठी जबाबदार नाहीत. हा त्यांच्या संचिताचा खेळ आहे असं मत ते व्यक्त करतात. यात श्रीरामांच्या मनाचा मोठेपणा, विनय हे तर दिसतेच; पण दोषारोपणाची तार्किक परिणती निष्कर्षशून्य असते हे वास्तवही अधोरेखित होते.

त्यानंतरच्या दोन कडव्यात, सहा ओळीत; श्रीराम जीवनाचं तत्वज्ञान सांगून भरताचं मन शांत करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक उन्नतीचा शेवट पतनात होतो. प्रत्येक चढावाला उतार असतो. सगळ्या प्रकारच्या संग्रहाचा अंती नाशच होतो. नाश होत नाही अशी गोष्टच जगात नाही. अतिशय कठोर असं जीवनाचं हे वास्तव सांगून आणखीन एक सत्य भरतासमोर मांडतात. ते म्हणतात - वियोगार्थ मीलन होते... मीलन हे वियोगासाठीच होत असते. परस्परांपासून दूर जाण्यासाठीच जीव जवळ येतात.

जीवनसत्याचं इतकं परखड विवेचन करून प्रभू राम पुढच्या कडव्यातही त्याचा विस्तार करतात. यात तर ते थेट मृत्यूलाच हात घालतात. जीवासोबतच मृत्यू जन्माला येतो, जीव जन्माला आला म्हणजेच मृत्यूही जन्माला आलाच. जीवन आणि मृत्यू यांची ही जोडीच आहे. दिसणारं, भासणारं सगळं विश्व नाशवंत आहे, नाश पावणारं आहे. इथे माडगुळकर दिसणारं आणि भासणारं असे दोन शब्द वापरतात. दिसणारं म्हणजे व्यक्त आणि भासणारं म्हणजे अव्यक्त, हे दोन्हीही नाश पावणारे आहे. म्हणजे व्यक्ती, व्यवस्था हे जसे नाशवान तसेच; विचार, भावना या अव्यक्त, अमूर्त गोष्टीही नाश पावणाऱ्याच. हे विश्व म्हणजे एक स्वप्न आहे आणि जे जे फळ वाट्याला येतं ते स्वप्नातील आहे. त्यामुळे त्यासाठी शोक काय करायचा? स्वप्नातील गोष्टी स्वप्नात असतात. त्यासाठी शोक करायचा नसतो, अशी ते भरताची समजूत घालतात.

भरताची समजूत घालत श्रीराम पुढे म्हणतात - वडिलांचा स्वर्गवास, भावाचं (म्हणजे त्यांचं स्वतःचं) वनवासाला येणे; या गोष्टी अकस्मात झाल्या तरी त्यात अतर्क्य असं काही नाही. अन या कडव्याच्या तिसऱ्या ओळीत, भरताच्या पितृविरहावर फुंकर घालत त्याला सांगतात - मरण या कल्पनेशी जाणत्या माणसाचाही तर्क थांबतो. इथे गदिमांनी मरणाला कल्पना म्हटले आहे. वास्तविक ही मानवी जीवनातील वास्तव घटना. परंतु श्रीराम हे मानव कुठे आहेत? ते तर भगवदावतार आहेत. लौकिकार्थाने आपल्या धाकट्या भावाचे सांत्वन करतानाही ते त्याला एक आध्यात्मिक जीवनदृष्टी देत आहेत. मृत्यू ही केवळ कल्पना आहे. आपण अमर आहोत. कधी व्यक्त तर कधी अव्यक्त एवढंच. मृत्यू म्हणजे अव्यक्त स्वरूपात जाणे. त्याला प्रत्यक्ष अस्तित्वच नाही. त्यामुळे 'मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा'.

त्यानंतरच्या दोन कडव्यात, सहा ओळीत; श्रीराम पुन्हा एकदा जीवनाच्या मूलभूत गोष्टींचं विवेचन करतात. ते भरताला विचारतात - वार्धक्य, मरण यातून कोणता प्राणी सुटला आहे? दु:खमुक्त असं जीवन कोणी जगला आहे का? 'जगी सर्वसुखी असा कोण आहे' ही समर्थोक्ती इथे आठवल्याशिवाय राहत नाही. तिसऱ्या ओळीत ते म्हणतात -  वर्धमान होत जाणारे सारेच काही एक प्रकारे क्षयाचा (संपत जाण्याचा) मार्गच चालत असतात. इथे ज्ञानेश्वर माऊलींचे 'जे जे उपजे, ते ते नाशे' मनात येऊन जाते. यानंतरच्या तीन ओळी या 'यथा काष्ठम च काष्ठम च' या संस्कृत सुभाषिताचे चपखल भावांतर आहे. या ओळीच मराठीतील स्वतंत्र वेचा झालेल्या आहेत. दोन ओंडक्यांची सागरात भेट होते, एक लाट येते, त्यांना विलग करते, पुन्हा काही त्यांची गाठ पडत नाही. माणसांचा मेळ हा त्या ओंडक्यांच्या भेटीप्रमाणेच क्षणिक आहे. श्रीराम भरताच्या दु:तप्त मनाला वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगत आहेत.

पहिल्या सहा कडव्यात भरताची समजूत घालणे, त्यासाठी जीवनाचं वास्तव त्याला समजावणे, हे झाल्यावर पुढल्या चार कडव्यात मात्र पुन्हा एकदा कर्तव्यकठोर, मर्यादा पुरुषोत्तम, आदर्श राजाराम समोर येतात. भरताला आता जणू आदेशच ते देतात - आता अश्रू ढाळू नकोस, डोळे पूस. तुझा आणि माझा प्रवास वेगळा आहे. तू अयोध्येत राजा व्हायचं आहे अन मी वनातील सामान्य माणूस म्हणून राहणार आहे. मला परतण्याचा उगाच आग्रह करू नकोस. पित्याने दिलेलं वचन पाळून आपण दोघेही कृतार्थ होऊ. त्यासाठी मुकुट, कवच धारण कर. तापसी वेष का घालतो? एकामागोमाग एक आज्ञा आणि सूचना श्रीराम भरताला करत आहेत.

एवढं सगळं झाल्यावर, तत्वज्ञान सांगून झालं, मोठा भाऊ म्हणून आज्ञा देऊन झालं; तरी भरत काही ऐकत नसणार. तुम्ही परत अयोध्येला चला हे त्याचे पालुपद सुरूच असणार. तेव्हा श्रीराम त्याला निर्वाणीचं आणि निक्षून सांगतात - वनवसाची चवदा वर्ष संपल्याशिवाय अयोध्येला येणं नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. हे त्रिवार सत्य आहे. यात काहीही बदल होणार नाही. आता अयोध्येच्या राज्य संपदेचा तूच एकमेव स्वामी आहेस. परंतु श्रीराम इथेच थांबत नाहीत. अगदी निर्वाणीचं सांगतात - 'पुन्हा नका येऊ कोणी, दूर या वनात'. कोणीही पुन्हा यायचं नाही इथे. आले तर पाहा, असंच त्यांना सांगायचं आहे. अन याचा परिणाम केवढा की, सीता हरणानंतरही आयोध्येतून कोणीही आलं नाही. मात्र एवढे कठोर शब्द वापरल्यानंतर लगेच ते करुणामय होऊन सांगतात - 'प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनात'. आपल्याला कठोर कर्तव्य पार पाडायचं असलं तरी, माझ्या मनात तुमच्या बद्दलचा प्रेमभाव जागता आहे. केवळ प्रेमभाव आहे आणि कडीकुलुपात ठेवला आहे, असं नाही. तो जागता आहे. तुम्ही माझ्या सतत स्मरणात असाल. केवढं आश्वासक वचन !! अन शेवटी सांगतात - 'मान वाढवी तू लोकी, अयोध्यापुरीचा'. अयोध्येबद्दलचा मनातला जिव्हाळा, अयोध्येच्या सन्मानाची काळजी, अन पुढील काळात भरताने काय करायचे याचे मार्गदर्शन; असे सारे या एका ओळीत आले आहे.

अतिशय गोड, अर्थपूर्ण, आशयघन असं हे गाणं. जीवनाच्या कठोर सत्याकडे पाठ न फिरवता, किंबहुना त्याला सामोरे जात; कर्तव्यबोध शिकवणारे अजरामर गीत. अजरामर राम चरित्रासारखेच.

- श्रीपाद कोठे

शनिवार, २८ मार्च २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा