सोमवार, २१ मार्च, २०२२

देव

संजय राऊत यांचं एक वाक्य पाहण्यात आलं - 'संकटाच्या वेळी पहिले देव पळून जातो' असं काहीसं. निरर्थक या एका शब्दात या वाक्याचे वर्णन केले पाहिजे. पण त्याहीपेक्षा कोणाला तरी, कशाला तरी कमी लेखणे हा त्यातील आशय जास्त बालिश आहे. मूळ मुद्दा हा की, असं वाक्य का येतं? कारण देव आपल्यासाठी काही करत नाही/ करू शकत नाही, या भावनेतून. ही भावना का तयार होते? कारण देवाने आपल्यासाठी काही करावे/ करायला हवे, या अपेक्षेतून. मात्र ईश्वर न मानणारे, बुद्धिनिष्ठ, विज्ञानवादी लोक; जर देव मानतच नाहीत तर अपेक्षा का करतात की देवाने काही करावे? यावर उत्तर येईल की, 'आम्ही अपेक्षा करतच नाही. आम्ही फक्त अपेक्षा करणाऱ्या अज्ञानी, बुद्धीहीन लोकांना समजावून देऊन प्रबोधन करतो. या वाक्याचा तोच अर्थ आहे.' प्रबोधनाची ही कळकळ खरी मानायला काहीच हरकत नाही. पण ज्या विषयाचे प्रबोधन करायचे त्याचा गांभीर्याने विचार करायला हवा की नको? देव वगैरे काही नसतं, देवाकडून अपेक्षा करणे गैर असं म्हणताना सुद्धा देवाला गृहितच धरले जाते. देवाने कधी म्हटले आहे की मी तुमच्यासाठी काही करीन. त्याने म्हटलेलेच नाही. ही भक्तांची किंवा अभक्तांची अपेक्षा असते. तो काही आपला नोकर वा गुलाम आहे का? तो करेल वा करणार नाही. तो तुमच्याशी बांधील नाही.  त्याने कधी करार केलेला नाही, शब्द दिलेला नाही. देवाला आपण आपल्या भल्यासाठी पगारी नेमलेले आहे असं समजण्याचं काय कारण? यावर भगवद्गीतेचा हवाला देऊन 'यदा यदा ही धर्मस्य' सांगितले जाईल. गंमत अशी की, याच भगवद्गीतेत 'कर्मण्येवाधिकारस्ते' हेही सांगितलं आहे हे विसरलं जाईल.

'देवाने अवतार घेतला का' हा विचार करतानाही आम्ही विचार करतो तो त्याने काही करावे ही अपेक्षा ठेवून. त्याने कर्म करण्याचा अधिकार दिला आहे. फळाची अपेक्षा सोडून द्यायला सांगितली आहे. देव अवतार घेईल न घेईल, कधी कुठे कसा ते त्याचे तो पाहील, एवढेच नाही तर अवतार घेतल्यावर सुद्धा काय करायचे तो ठरवेल. त्याला तुम्हा आम्हाला नष्टच करायचे असेल तर? त्याने तसे करू नये हे सांगणारे आम्ही कोण? शिवाय अमुक कर्माचं अमुक हे, एवढं, असं फळ, अमक्याला मिळेल; असं वगैरेही देव सांगत नाही. देवाने सांगितलेलं नाही. आम्ही आपल्या अपेक्षा, आपलं वाटणं त्याच्यावर लादतो अन मग तो आहे की नाही हे सिद्ध करण्याच्या मागे लागतो.

सत्य जाणणारा हेही म्हणत नाही की, देव आमचं भलं करेल किंवा तो हेही म्हणत नाही की, देव वगैरे थोतांड आहे. तो म्हणतो - तुला वाटतं तसं. तो जेव्हा यापेक्षा वेगळं काही म्हणतो तेव्हा फक्त कोणावर तरी कुरघोडी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतो. या जगाचं अंतिम सत्य आपल्या मुठीत आहे या भ्रमापोटी. राऊतांच्या वाक्याचा फक्त हाच अन्वयार्थ आहे.

- श्रीपाद कोठे

२२ मार्च २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा