गुरुवार, १० मार्च, २०२२

अर्थ आव्हाने

आज india today conclave मध्ये नितीन गडकरींना ऐकले. मुलाखत घेणारा राजदीप सरदेसाई. दोन्ही व्यक्ती सगळ्यांच्या परिचित. राजदीप संघ, भाजप विरोधक असूनही गडकरींना पकडू शकला नाही. तसंही गडकरींचं व्यक्तिमत्व वेगळं आहेच. विरोधक सुद्धा त्यांच्याशी फारसं शत्रुत्व करू शकत नाहीत. मुद्दा वेगळा आहे. रोजगाराचा विषय होता. गडकरींनी अतिशय आत्मविश्वासाने राजदीपला परतवून लावले. त्यांनी दिलेली माहिती, आकडेवारी यावर विवाद करण्याचे कारण नाही. त्यांनी सांगितले ते योग्यच होते. आज देशभरात सुरु असलेले रस्ते, पूल, सिमेंट उत्पादन, सिमेंटवापर, त्यातून निर्माण होणारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार हे सगळे खरे आणि योग्यच आहे. गडकरींच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या मंत्रालयाच्या कामांमुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष असे ५० लाख रोजगार निर्माण झाले वा होतील. ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु...

परंतु मुद्दा असा की- हे रस्ते, हे पूल, सिमेंट उद्योग, या कामांसाठीचे कौशल्य आणि त्याचे प्रशिक्षण हे सगळे पुढील १० वर्षे साधारण सुरु राहील. रस्ते, पूल इत्यादी दीर्घ काळ टिकावे यासाठीच बांधले जातात, जावेतही. पण १० वर्षांनी ही कामे करणारे, या कामांचे कौशल्य शिकणारे काय करतील? आज वयाच्या विशीत, तिशीत असणारे त्यावेळी वयाच्या अशा टप्प्यावर असतील की नवीन काम पुन्हा त्याच उर्मीने सुरु करू शकतील का? हे प्रश्न केवळ गडकरी वा त्यांच्या कामासंबंधीचे नाहीतच. हे आजच्या अर्थकारणाचे प्रश्न आहेत. माहिती तंत्रज्ञानापुढे हे प्रश्न आज उभे झालेले आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयांची आजची स्थिती आणि घटणारी मागणी याच समस्येचा भाग आहेत.

जीवनाचे स्थैर्य, माणूस यांना वजा करून जगभर धुडगूस घालत असलेल्या अर्थकारणाचे हे स्वाभाविक प्रश्न आहेत. माणसाला माणूस म्हणून जगू न देणारे असे हे अर्थकारण आहे. सुमारे २०० वर्षांपूर्वी याची सुरुवात अमेरिकेने केली. त्यानंतर युरोप, मग अन्य काही देश आणि १९८० च्या दशकात globalisation च्या नावाने जगभरात हे सुरु झाले. एकमेकांना पिळून काढत, नवनवी स्वप्ने दाखवत, त्यासाठी सामान्य माणसाच्या उथळ वृत्तीला आवाहन करत स्वत:चे उखळ पांढरे करून घेण्याचा हा धंदा आहे. या साखळीत कोणाकोणाला काही काही मिळतं. परंतु आता त्याचेही saturation झाल्याने प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. म्हणूनच protectionism नाकारणारे जागतिकीकरण बाजूस ठेवून ट्रंप भारताला विनंत्या करू लागले आहेत. पण यात भारताचा थोडाफार गौरव असला तरीही त्यात तथ्यापेक्षा गंमत अधिक आहे.

मूळ बाब आहे ती म्हणजे अर्थकारण मानवी जगण्याशी जोडणे. अन मानवी जगणे म्हणजे केवळ रोजगार, पैसा कमावणे, क्रयशक्ती वाढवणे, वस्तूंची खरेदी; अन त्यातही हे सारे तात्पुरते; असे नसते. त्यासाठी आधी मानवी जगणे समजून घेणाऱ्या, समजावून देणाऱ्या एका महा वैचारिक अभियानाची गरज आहे. कम्युनिझम निरर्थक आहे. भांडवलशाही मृत्युपंथाला लागली आहे. अन भाजप, काँग्रेस, तिसरी आघाडी ही काही या प्रश्नांची उत्तरे नाहीत. कोणताही पक्ष आणि कोणीही नेता आला तरीही यातून मार्ग काढणे त्याच्या आवाक्यातील नाही. हे प्रश्न समाधानकारक रीतीने सोडवणे हे पुढच्या किमान ५० वर्षांचे समाजाचे अभियान व्हावे लागेल. त्यासाठी धीर तर लागेलच, सोबत काही किंमतही चुकवावी लागेल.

- श्रीपाद कोठे

११ मार्च २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा