गुरुवार, २४ मार्च, २०२२

`खारपण'

ठाऊक आहे मला मी खार आहे. ना शक्ती, ना युक्ती, ना शिक्षण. पण मला ठाऊक आहे मी खार आहे आणि मला कळतं - रामकार्य कोणतं ते. मला रामकार्यच करायचं आहे हेही कळतं. मी ना सैनिक सुग्रीवाचा, ना सदस्य रामसैन्याचा. मी खार आहे अन खारीसारखंच काम करते. तसंच करू शकते. तुमच्या मोठाल्या गोष्टी तुमच्या तुम्ही पाहा, तुमची मोठाली कामे तुमची तुम्ही पाहा. मला नाही ठाऊक तुमचा राम अन मला ठाऊक करूनही घ्यायचा नाही. कसे नाही ठाऊक... पण मला फक्त रामकार्य ठाऊक आहे अन ते खारीच्या शक्तीने, खारीच्या पद्धतीने करणे ठाऊक आहे. वाळूचे चार कण उचलण्याची फक्त माझी शक्ती. ट्रकभर वाळू का नाही उचलता येत याची तक्रारही नाही, खंतही नाही अन मागणेही नाही. किनाऱ्यावर ये जा करता करता होणाऱ्या त्रासाचीही तक्रार नाही. होत असतील वादावादी, होत असेल बाचाबाची त्या वानरांशी... होत असेल तर होत असेल. मला काय त्याचे? कामात खंड पडू नये, बास. कसली भीती नाही, कसली क्षिती नाही. कोणी कोणी म्हणतात- जिवंत असेपर्यंत काम करत राहावं. तेही मनात नसू दे. कारण मला काय ठाऊक जिवंत म्हणजे काय, मरण म्हणजे काय, जन्म म्हणजे काय? अन कशाला शीण हवा. अन हो, आधी होऊन गेलीय म्हणतात एक खार. आलंय कानावर. म्हणून हे द्वाड मन आठवतं- त्या रामाची बोटे तिच्या पाठीवर उमटलेली. ती आठवण तेवढी काढून टाक. त्या खारीला कुठे ठाऊक होतं राम जवळ घेणार आहे आपल्याला. अन तिची इच्छा तरी कुठे होती तशी काही? तशी इच्छा असती तर ती खार राहिलीच नसती. ती झाली असती कोणी तरी दुसरी काही. बस... मी खार आहे अन मला राहू दे तशीच खार... `मी खार आहे, चार वाळूचे कण उचलण्याची माझी शक्ती आहे, अन रामकार्यासाठीच मला चार चार कण उचलत राहायचे आहेत' एवढं आणि एवढंच कळणारी. याहून अधिक काहीही देऊ नकोस, काहीही कळू देऊ नकोस... माझं `खारपण' अक्षय राहो... माझं `खारपण' अक्षय राहो... माझं `खारपण' अक्षय राहो... 

- श्रीपाद कोठे

रविवार

२५ मार्च, २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा