शुक्रवार, ४ मार्च, २०२२

स्मरण गुरुजींचे

आज माघ वद्य एकादशी, विजया एकादशी. `मै नहीं, तू ही' हा मंत्र हेच ज्यांचं जीवन होतं, त्या परम पूजनीय श्री. माधव सदाशिव गोळवलकर यांचा, रा.स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक गुरुजींचा आज जन्मदिवस. त्या महान विभूतीला कोटी कोटी वंदन.

`श्री. गुरुजी असं म्हणाले' हे पालुपद काढून टाकले तरीही सत्य आणि योग्य ठरणारे कालजयी अक्षय विचारधन त्यांनी दिलेले आहे. हे विचारधन नवीन नाही. ते त्यांनी पुन्हा सांगितले. पण विचारांची ही विशेषताच असते की, जुनेच विचार अनुभूतीचे अस्तर लेवून जेव्हा येतात तेव्हा आशयपूर्ण अन परिणामकारक ठरतात. नाही तर नुसते शब्द. गुरुजींचा प्रत्येक शब्द अनुभूत होता. त्या विचारांची, त्या राष्ट्रभावाची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करणे ही आपली, विशेषत: स्वयंसेवकांची जबाबदारी आहे.

आज गुरुजींबद्दल, त्यांच्या विचारांबद्दल खूप बरंवाईट बोललं जातं, टीकाटिप्पणी होते. त्याने अनेकदा क्षुब्धतादेखील येते. ती स्वाभाविक आहे. त्यामुळे प्रतिक्रिया दिल्या जातात. त्याही स्वाभाविक आहेत. या टीकाटिप्पणीचा समाचार जसा जमेल तसा, आपापल्या शक्ती बुद्धीनुसार घ्यायलाच हवा. त्यात काहीच वावगे नाही. त्यातून दोन गोष्टी होतात- १) प्रामाणिक लोक ते नीट समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. २) आपलं चिंतन, आपली जाण, आपली समज वाढते. मात्र प्रतिवाद करताना, समाचार घेताना काहीही सिद्ध करण्याचा भाव नसावा. कारण खंडनात्मक अन मंडनात्मक या दोन्हीच्या पलीकडे नेणारं ते सत्यदर्शन आहे. किती लोक ते मानतात अथवा किती मानत नाहीत यावर त्यांची शक्ती आणि योग्यता अवलंबून नाहीच. संख्या ही राजकारणासाठी महत्वाची असेलही कदाचित; पण विचारांसाठी, राष्ट्रकारणासाठी अन सत्यासाठी संख्येचं महत्व शून्य आहे. गुरुजींनी मांडलेले विचार किती लोक मानतात वा मानत नाहीत, यापेक्षाही किती जण ते विचार आत्मसात करतात, हृदयंगम करतात; किती जणांच्या अनुभूतीचा तो विषय होतो; हे महत्वाचे. अब्जावधी टीकाकार, अब्जावधी अडथळे यापेक्षाही त्या विचारांची अनुभूती घेणारा एक जण महत्वाचा आणि जगाचं अधिक भलं करणारा असेल. एकीकडे वर्तमान लढाया लढतानाच, दुसरीकडे त्याच वेळी गुरुजींनी प्रतिपादन केलेल्या राष्ट्रभावाची अधिकाधिक स्पष्ट अन उत्कट अनुभूती प्राप्त करण्याचा प्रयत्न आवश्यक आहे. ती अनुभूती जेवढी अधिक सघन आणि सांद्र असेल तेवढे योग्य ठरेल.

गुरुजींच्या ऋषित्वाचंही किंचित स्मरण प्रेरक ठरेल. सतत ३३ वर्ष एखाद्या संघटनेचं नेतृत्व करणारं हे एकमेव उदाहरण आहे. ती संघटना अन तो नेता यांना नेस्तनाबूत करण्याचे प्रयत्नही झालेत. त्या प्रयत्नांना ते पुरून उरलेत. संघटनात्मक, वैचारिक, सैद्धांतिक, भावात्मक अशा सगळ्या संघर्षात विजयी झालेत. अन अखेरीस हा संघर्ष, हा विजय `इदं न मम, इदं राष्ट्राय' म्हणून समर्पित केला. अनेक प्रकारची अद्वितीयता, उत्तुंगता, यशस्वीता यांचे धनी असूनही; अखेरच्या तीन पत्रातील तीन ठळक बाबी कोणत्या? १) माझे स्मारक करू नये, २) माझ्यामुळे कोणाला काही त्रास झाला असेल तर मोठ्या मनाने क्षमा करावी, ही याचना, ३) आपल्या कार्याची ध्येयपूर्ती लवकर व्हावी. हे केवळ येथेच थांबले नाही. ३३ वर्षात असेच आत्मविलोपी, समर्पित `मै नहीं, तू ही' हा मंत्र जगणारे असंख्य लोक उभे केलेत. कोणत्याही महापुरुषाला न जमलेले हे काम. गुरुजींच्या विभूतीमत्वाच्या स्मरणाने, चिंतनाने शक्ती, चैतन्य, विश्वास अन प्रकाश प्रकट होवो.

- श्रीपाद कोठे

५ मार्च २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा