गुरुवार, २४ मार्च, २०२२

थोडे स्मरणरंजन

चाळीसेक वर्षांचा क्रम आज खंडित झाला. वर्ष प्रतिपदेला रेशीमबागेत जाण्याचा. पूर्वी तर संघाच्या सहा उत्सवांपैकी पाच उत्सव रेशीमबागेतच होत असत. मग शहराचा आणि कामाचा विस्तार झाल्यानंतर चार उत्सव भागांचे स्वतंत्र होऊ लागले. वर्ष प्रतिपदा उत्सव मात्र कायम रेशीमबागेतच होत राहिला. इथेच संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे समाधी स्थळ आहे. त्यांचा जन्मही गुढीपाडव्याचाच. स्वाभाविकच विशिष्ट भावपोषण यातून होत आले आहे.

चाळीसेक वर्षातल्या गुढीपाडव्याच्या चाळीसेक आठवणी तर आहेतच. तिसरे सरसंघचालक स्व. बाळासाहेब देवरस यांची प्रकृती अगदीच नाजूक होती. १९९३ साल होते. ते कार्यक्रमाला आले होते खुर्चीवर बसूनच. उठता येतच नव्हते. बोलणेही नव्हते. त्या उत्सवात स्व. दत्तोपंत ठेंगडी यांचे बौद्धिक झाले होते. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी बाळासाहेबांचा उल्लेख शरपंजरी भीष्माचार्य असा करून, महाभारतातील भीष्माचार्यांप्रमाणे नुसत्या उपस्थितीनेही ते आमच्यात प्रेरणा आणि चैतन्य संक्रमित करतात असा भावपूर्ण उल्लेख केला होता. अशाच एका कार्यक्रमात डॉ. मुरलीमनोहर जोशी यांनी भारतीय कालगणना हा विषय मांडला होता. प्रथमच हा विषय कानावर पडला होता.

अशा अनेक आठवणींमधील एक विशेष आठवण आज होते आहे. साल होते १९७९. लक्षात राहण्याचे कारण म्हणजे ते दहावीचे वर्ष होते. आणीबाणी संपून दोन वर्ष झाले होते. काम व्यवस्थित सुरू झाले होते. नागपूर स्तरावर नगरश: गीत स्पर्धा त्यावर्षी घेण्यात आली होती. सगळी गीतं डॉ. हेडगेवार यांच्या प्रेरक जीवनावर होती. तशीच योजना होती. त्यावेळी नागपुरात एकूण अकरा नगर होते आणि घोष पथक बारावे. एकूण १२ गीतं झाली होती. त्यातील आमच्या नगराचे आणि घोषाचे अशी दोन गीतं वडिलांची होती. दोन्ही खास त्या स्पर्धेसाठी नव्याने रचली होती. त्यावेळचे घोष प्रमुख श्री. अरविंद देशपांडे आणि आमचे नगर कार्यवाह श्री. भय्याजी पारधी यांनी मागणी करून, मागे लागून ती गीतं तयार करून घेतली होती. श्री. अरविंद देशपांडे हे स्वतः संगीतातील बाप माणूस असल्याने घोष पथकाच्या गीताला त्यांनीच चाल लावली होती. आमच्या नगराच्या गीताला आकाशवाणीचे अ श्रेणी शास्त्रीय गायक श्री. प्रभाकर काळे यांनी चाल लावली होती. योगायोग असा की ही दोन गीतं पहिल्या दोन क्रमांकावर आली. पहिला क्रमांक आमच्या नगराने म्हटलेल्या 'चंदनाचे चैत्रबन तू' या गीताला मिळाला तर दुसरा क्रमांक घोष पथकाने म्हटलेल्या 'संघ हमारा' या गीताला मिळाला होता. संघाच्या स्पर्धा वेगळ्याच असतात. स्वयंसेवकांना माहिती आहे. स्पर्धा जिंकली तरी आरडाओरड वगैरे नसते. गीत स्पर्धेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे गीत कोणाचे हेही कोणाला माहीत नसते. गीत रचणाऱ्यालाही त्याची अपेक्षा नसतेच. असे अनेक गीतकार आहेत. तरीही ज्यांना ठाऊक असते त्यांच्यासाठी आणि व्यक्तिशः गीतकारासाठी ते आनंदाचे क्षण असतात. त्यावर्षी ते क्षण अनुभवले होते. भय्याजी पारधी, अरविंद देशपांडे, वडील या सगळ्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. प्रभाकर काळे यांना दीर्घायु लाभो.

१९७९ च्या त्या उत्सवात, त्यावेळी अ. भा. शारीरिक प्रमुख असलेले कु. सी. सुदर्शनजी यांचे स्व. बाळासाहेबांच्या उपस्थितीत भाषण झाले होते. याज्ञवल्क्य मैत्रेयी यांच्यातील काक भुशुंडी संवादाच्या अनुषंगाने त्यांनी विषय मांडला होता. फार समजण्याचे ते वय नव्हते पण सुदर्शनजींच्या भाषणाची ओढ आणि गोडी असणारे ते दिवस होते. काही समजले नाही तरी ऐकावेसे वाटत असे. ते भाषणही तसेच होते.

आज रेशीमबागेत जाता आले नाही. समाधीचे दर्शन नाही. आद्य सरसंघचालक प्रणाम नाही. थोडेसे स्मरणरंजन करून आजची वर्ष प्रतिपदा साजरी केली.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, २५ मार्च २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा