रविवार, २७ मार्च, २०२२

मोगरा फुलताना

मोगरा फुलताना पाहणं आल्हादक असतं अन वेदनादायीही ! शुभ्र, गच्च पाकळ्यातून मनोहारी धुंद गंध वाटत राहणारा मोगरा भुरळ घालत नाही असा कुणी असेल का? जीवनाशी अम्लान, शुद्ध, शुभ्र, निर्डाग नातं जोडतो मोगरा. सकाळी फुले खुडताना पाहावं तर इवल्याशा असणाऱ्या कळ्या, संध्याकाळी टपोर झालेल्या असतात. निशेने त्याच्यावर काळी चादर पांघरली की हळूच केव्हातरी उमलू लागतात त्याच्या पाकळ्या अन सकाळी हसत असतात शुभ्र टवटवीत सुगंधित फुले.

छोट्या छोट्या, मोहरीहूनही लहान मुग्ध कळ्यांची पूर्ण उमललेली फुलं; हा प्रवास निरखणं ओढाळ असतं. त्या प्रत्येक अवस्थेत त्यांना डोळा भरून पाहावं. त्यांना हळू स्पर्श करावा. त्यांच्यावर हलका हात फिरवावा. अन शेवटी हळूच खुडून भरून घ्यावी ओंजळ. अन भरून घ्यावा त्या ओंजळीतला अद्वितीय सुवास तनामनात. जीवनाच्या त्याच त्या रहाटगाडग्यात आल्हादाची पेरणी करतो मोगरा. वसंताची चाहूल लागताच अंगोपांगी फुलून येणारा मोगरा भरून आणि भारून टाकतो नंतरचे दोनेक महिने. या दोनेक महिन्यातील सारे सणवार, समारंभ, कार्यक्रम, उत्सव, लोकांताचे आणि एकांताचे क्षण मोगरामय होत राहतात.

हा आल्हाद पसरणारा मोगरा स्वतः मात्र मौन असतो. काहीही बोलत नाही. त्याचाच आल्हाद त्यालाच सुख देत नाही बहुतेक. त्याची सारी गात्र, त्याचे पंचप्राण, त्याची सगळी शक्ती लागलेली असते सोसण्याकडे. भास्कराचा वणवा पिऊन टाकत, तो दाहक लाव्हाच सुखद सुगंधात रूपांतरित करीत असतो मोगरा. मोगरा सोसत असतो. मोगरा साहत असतो. सृष्टीच्या समस्त तापांचा घनीभूत जाळ. न जळता. सारं चैतन्य निष्प्राण करणारं विष रिचवून टाकणाऱ्या महाकालाच्या व्रतस्थतेने पण त्याच्यासारखे रौद्रतांडव न करता. आत्यंतिक मृदू सहनशीलतेने.

मोगरा फुलू लागला की, आल्हादाचा हात धरून वेदना येते. पाहते फक्त एकटक. काहीही न बोलता. निर्भाव होऊन. अभावितपणे फिरू लागतो हात मोगऱ्यावर. पाने, फांद्या, कळ्या, फुले यांना गोंजारत कुजबुजतो त्याच्या कानात हळूच - 'मला दे ना तुझा ताप थोडासा. दे ना तुझी वेदना मूठभर. दे ना तुझे ओंजळभर सोसणे.' मोगरा फक्त हसतो. निर्विष. छद्मशून्य. अन घालतो समजूत - 'नाही रे देता येत. नाही घेता येत वाटून. सोसावं लागतं ज्याचं त्यालाच. भोगावा लागतो ताप आपला आपल्यालाच. माझे सोसणे देताही येणार नाही अन तुझे काही सोसणे असेल तर ते घेताही येणार नाही. ज्याचा त्याचा ताप अन ज्याचं त्याचं भोगणं.'

माझी अवस्था बिकट होते. मोगऱ्याचं सोसणं कणभरही वाटून घेता येत नाही याची वेदना जाळू लागते. तो वाटत असलेला सुगंध बाजूला सारून त्याचा अनमानही करता येत नाही. एका हाती ज्वालामुखी तोलत, दुसऱ्या हाती टवटवीत सुगंधित फुले तोलायची असतात. स्वर्गीय सुगंधाला चिरंतन वेदनेचं अस्तर लावणाऱ्या सृष्टीचं कवतिक हसूही देत नाही, अन रडूही देत नाही.

- श्रीपाद कोठे

रविवार, २८ मार्च २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा