महात्मा गांधी यांची हत्या संघाने केली असा कंठशोष करणाऱ्यांना हे सांगितले पाहिजे की, गांधीवाद्यांचे हे म्हणणे नाही. गांधीजींप्रमाणेच गांधीवाद्यांना संघाबद्दल तक्रार नाही. गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात संघाचा प्रशिक्षण वर्गही झालेला आहे. प्रसिद्ध गांधीवादी, गांधीजींच्या `नई तालीम'मध्ये प्राथमिक शिक्षण घेतलेले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग संघाच्या तृतिय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाला प्रमुख पाहुणे आलेले आहेत. प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत प्रो. धरमपाल हेदेखील तृतिय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाला प्रमुख पाहुणे आले होते. गांधीजींचे अनुयायी आचार्य विनोबा भावे यांच्याशी संघाच्या कार्यकर्त्यांचे चांगले संबंध होते. विख्यात मराठी साहित्यिक आणि मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले दिवंगत राम शेवाळकर हे मूलत: गांधीवादीच होते. सर्वोदय चळवळीतर्फे सुरु करण्यात आलेल्या आचार्य कुलाचे ते बिनीचे नेते होते. त्यांचाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या शीर्ष नेतृत्वाशी आत्मीय, अंतरंग संबंध होता. डॉ. हेडगेवार जन्मशताब्दीच्या नागपूर समितीचे ते अध्यक्षही होते. या कोणालाही संघाबद्दल आक्षेप नव्हते आणि संघाने गांधीजींची हत्या केली वगैरे त्यांची कधी तक्रारही नव्हती. एवढे असले तरीही राहुल गांधी ते कुमार केतकर आणि त्यांच्या छापाचे लोक स्वत:चा कंडू शमवून घेण्यासाठी हा आरोप चघळतच राहणार.
- श्रीपाद कोठे
१० मार्च २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा