आज नवीन संवत्सर सुरू होतं आहे. पहिला दिवस गुढीपाडवा. सगळ्यांना शुभचिंतन. हो मुक्त मनाने शुभचिंतन. कारण मी त्या मानवजातीचा प्रतिनिधी आहे ज्या मानवजातीने आजवर कितीतरी संकटे पाहिली आणि पचवली आहेत. ही मानवजात हेही संकट पचवून पुढे वाटचाल करेल.
आजच्या दिवशी कडुलिंबाची पाने खाण्याचीही रीत आहे. त्यात शास्त्रही आहे आणि भावही. त्यामुळे हा थोडा कडू घास.
साधारण गेल्या आठवडाभरात जगव्यापी कोरोनाची कल्पना आणि झळ भारतातही जाणवू लागली. रविवारच्या 'जनता कर्फ्यू'चे पाऊल आता २१ दिवसांच्या देशव्यापी lockdown पर्यंत आले आहे. विविध प्रकारच्या चर्चा सुरू होणे स्वाभाविकच होते. त्यात माहिती, विश्लेषण, सूचना, चिंता, उपाय असे सगळे आहे. २१ दिवस घरात बसून काय करायचे हा मोठा प्रश्न आहे अन त्यावर विविध उपायही सुचवले आणि केले जात आहेत. मात्र या उपायांमधून आपल्या मर्यादा फार ठळकपणे दिसतात. खाणेपिणे, संगीत, वाचन, झोप, गप्पा, आवरसावर एवढंच करता येतं माणसाला फक्त? आज जी अभूतपूर्व परिस्थिती आहे ती अभूतपूर्व मानव्याची मागणी करते आहे. त्या दृष्टीने विचार, चिंतन केले पाहिजे असा सूर अभावानेही ऐकायला मिळू नये याची नक्कीच खंत वाटते. आपण स्वतःला छोटेच ठेवण्यात समाधानी आहोत का? का आहोत? थोडा वेगळा विचार, थोडा मेंदूला ताण दिल्यावर जर लगेच आमचं डोकं दुखायला लागत असेल किंवा आम्हाला कंटाळा येत असेल तर तो आम्हीच केलेला आमचा अपमान नाही?
प्लेगच्या साथी, देवीच्या साथी येण्याला अजून शतकही झालेले नाही. पुस्तकांमधून आम्ही ते वाचतो. त्यावेळची परिस्थिती, साधने, समाजाचे समाज म्हणून चित्र हे आज कितीतरी बदलले आहे. तरीही आम्ही पायाखालची जमीन सरकल्यासारखे का वागतो आहोत? कसली भीती, कसला त्रास आम्हाला एवढे भेडसावतो आहे? हे भांबावलेपण माणसाला न शोभणारे आहे. संकटाचे गांभीर्य नसणे हे जेवढे चुकीचे तेवढेच संकटाने सैरभैर होणे हेही चूकच. आम्हाला आपल्या चुकाही कबूल करता यायला हव्यात. मानवीयता, करुणा, प्रेम म्हणजे रडकेपणा अथवा बावचळलेपणा नाही; हे समजून घेणे गरजेचे आहे.
आशावादाच्या सगळ्या गप्पा एका विषाणूच्या भीतीने हवेत उडून गेल्या यातच आमचे दुबळेपण आणि जगण्याचा मुखवटा दिसून येतो. आम्हाला यातून बाहेर पडले पाहिजे. संकटाचा मुकाबला भिऊन होत नाही. त्यासाठी निर्भय व्हावे लागते. आपली भगवद्गीता तर त्याहीपुढे जाऊन अभय सांगते. दैवी गुणांमध्ये पहिलं स्थान अभयाला आहे. अभय म्हणजे स्वतः निर्भय असणे आणि भ्यालेल्याला निर्भय बनवणे. अभय म्हणजे स्वतःच्या आणि अन्यांच्या भीतीचे परिमार्जन. भीतीचे हे परिमार्जन केवळ गोड वा गोड वाटणाऱ्या शब्दांनी होत नाही. त्यात गोड शब्दांचे स्थान आहेच पण तेवढ्याने भागत नाही. कठोर आणि क्रूर वास्तवाला डोळ्यात डोळे घालून पाहावे लागते. आपण भारतीय आहोत. हे भारतीयत्व नुसते घोषणा देण्यापुरते नसावे. भगवद्गीतेचा दहावा अध्याय आठवावा. काळाचे जे कराल वर्णन आहे ते पाहावे, अभ्यासावे. धैर्य त्यातून येते. भित्यापाठी ब्रम्हराक्षस ही म्हण प्रसिद्धच आहे. अन कसली भीती? मृत्यूची? जी गीता कानीकपाळी सांगते - 'नैनं छिंदंती शस्त्राणी' ती विसरून गेलो का आपण? की ऊर्जा कमीही होत नाही अन वाढतही नाही केवळ रूप बदलते, असं सांगणारं विज्ञान विसरलो? याचा अर्थ अविचाराने घराबाहेर पडून मनसोक्त भटकावे असा होत नाही. अविचार आणि भय यांच्या मधले समतोल शहाणपण हवे. अविचारी अविचार करतातच. ते अन्य कशाकडे लक्ष देत नाहीत. त्यांचा बंदोबस्त करायचा असतो. ते करणारे आहेत आणि ते त्यांचे काम चोख करतीलही. प्रश्न विचारी लोकांनी आपल्या कोषातून, आपल्या भयातून बाहेर पडण्याचा आहे. कारण त्यातूनच नवीन परिस्थितीला हवा असणारा नवा माणूस उभा राहणार आहे.
कोरोना संकटानंतरचे जग एकदम वेगळे राहील. त्याची चर्चाही सुरू झाली आहे. या चर्चा आर्थिक, सामाजिक, राजकीय व्यवस्थांच्या आहेत; व्यक्ती आणि देशांच्या परस्पर संबंधांच्या आहेत; विज्ञान तंत्रज्ञानाच्या आहेत. पण त्या तेवढ्याच असून भागणार नाही. भविष्यातील बदल अधिक सखोल राहावे लागतील. जीवन, करियर, छंद, कमावणे, मिळवणे, जगणे, आनंद, celebration अशा संपूर्ण जीवनाच्या आकृतिबंधाच्या कल्पनाचित्राची फेरमांडणी करावी लागेल. त्यातला प्रत्येकाचा सहभाग, प्रत्येकाची जबाबदारी यांचा बोध जागावा लागेल, हे सगळ्यांना पुरेशा प्रमाणात कळावं लागेल. आम्हाला आमची मन बुद्धीही त्यासाठी नांगरावी लागेल. मिळालेल्या संधीचा त्यासाठीही उपयोग करता यायला हवा.
नवीन संवत्सर, प्रभू राम आणि भगवतीच्या शक्ती जागरणाच्या या काळात; समस्त मानवजातीला त्यासाठी शक्ती बुद्धी प्राप्त होवो या कामनेसह...
कोण रे तू?
कोण रे तू?
मी...
मी 'कोरोना';
अस्सं... काय काम आहे?
तुला नष्ट करायला आलो आहे...
बरं
गमती स्वभाव दिसतो तुझा...
'???'
अरे जे शक्यच नाही
ते सांगतो आहेस
म्हणून म्हटलं...
'नाही, मी खरंच त्यासाठीच आलोय'
'काय करणार नेमकं?'
'खाऊन टाकणार तुला'
'त्याने माझा कोरोना होऊन जाईल
मी संपणार कसा?'
- नाही सुचत उत्तर,
उत्तर सुचेपर्यंत ऐक
मी काय सांगतो ते;
माझा होऊन जाईल कोरोना
मग येईल कोणीतरी
अन टाकेल संपवून मला
तेव्हा होईल माझी माती
देईन आधार सगळ्यांना
जे असतील त्यावेळी या मातीवर
पडेल कधीतरी पाऊस
मग येईन मी उगवून
त्या मातीतून चाफा होऊन
देईन फुलं, देईन सावली;
किंवा होईल
मातीऐवजी पाणी
भागवेन तहान
किंवा जाईन ढगात
येईन पुन्हा परतून पावसातून
समुद्राचा थेंब होईन
फिरून येईन सगळे समुद्र
अगदी तळापर्यंत;
कदाचित होईन
वारा पाण्याऐवजी
फिरून येईन सारं विश्व
स्पर्श करून येईल
उंच उंच गिरीशिखरे
जाऊन येईल थेट
गूढ अंधाऱ्या गुहांमधून
भटकत राहीन खोल खोल दऱ्यातून;
असाच होईन हे किंवा ते किंवा ते
कदाचित पुन्हा माणूस आत्तासारखा
किंवा कदाचित
तुझ्या माझ्यासह हे सगळं
ज्यातून येतं ते
आदिकारण होऊन जाईल
अन होईन एकाच वेळी
माणूस, कोरोना, माती
पशु पक्षी, पाणी, हवा
अन सगळं काही
एकाच वेळी, एकाच ठायी...
पण नष्ट नाही होणार
सांग कसा करणार मला नष्ट?
वल्गना उगाच...
- श्रीपाद कोठे
बुधवार, २५ मार्च २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा