सहज वरखाली करता करता नितीन गडकरी यांच्या संसदेतल्या एका भाषणाची चित्रफीत दिसली. पूर्ण भाषण नव्हते. पाचेक मिनिटांचा तुकडा. ग्रामीण उद्योग, विकास, खादी इत्यादी विषय होते. छान माहिती आणि योजना ते सांगत होते. जयराम रमेश, गुलाम नबी आझाद हेदेखील शांतपणे ऐकत होते. इतकंच नाही तर मेज वाजवून समर्थन पण देत होते. एक गोष्ट मात्र खटकली. गडकरी बोलत असताना त्यांनी आपल्या मनगटावरील घड्याळ दाखवली आणि खादी ग्रामोद्योगने तयार केलेल्या त्या घड्याळाचं भरपूर गुणवर्णन करून सगळ्या घड्याळी बाजारात विकल्या गेल्याचे, आता उपलब्ध नसल्याचे सांगितले. ते ही माहिती सांगत असताना कोणी तरी मागणी केली की, सगळ्या सदस्यांना ही घड्याळे द्यावी. अन ती भेट म्हणून द्यावी. गडकरींनी ते नाकबूल केले आणि सवलतीत देऊ असे आश्वासन दिले. त्या चित्रफीतीतील हा भाग मात्र खटकला. म्हणजे सदस्यांनी घड्याळाची भेट मागणेही खटकले आणि त्यांना सवलतीत देण्याचे आश्वासन पण खटकले. खासदारांना फुकट मागायची इच्छाच कशी होते? उलट प्रत्येक खासदाराने शंभर शंभर घड्याळी घ्याव्या आणि भेट किंवा मदत म्हणून द्याव्या, अन व्यवसाय आणि उत्पादन वाढीला हातभार लावावा; अशी सूचना खासदारांनी का करू नये? समजा खासदार असे करीत असतील तरीही स्वतःसाठी फुकट मागावेच का? वृत्ती आणि संवेदनशीलता यांची ही समस्या आहे. ती वरून खालपर्यंत आणि संपूर्ण समाजात पसरत जाते. पसरलेली आहे. यात बदल व्हायचा असेल तर तोही वरूनच व्हावा लागेल. त्यासाठी मनाचं conviction लागेल. त्या conviction चा deficit खूप मोठा आहे. हा deficit कसा दूर होईल हा प्रश्नही फार मोठा आहे. हा deficit दूर होण्याची गरज मात्र आहे. अन कायदे, नियम, गडकरींसारखे कळकळीचे नेते; या कशानेही हा deficit भरला जाऊ शकत नाही. वेगळ्या प्रश्नांना वेगळी उत्तरे शोधावी लागतील.
- श्रीपाद कोठे
१० मार्च २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा