रामायण, महाभारत यानंतर उपनिषद गंगा आजपासून पुनःप्रसारित होणार आहे. रामायण, महाभारता एवढे प्रेक्षक; तेवढी लोकप्रियता उपनिषद गंगाला मिळणार नाहीच. आधीही मिळाली नव्हती. पण उपनिषदांचा अभ्यास अन केवळ अभ्यास नव्हे तर उपनिषदांचा ध्यास घेणारे वाढायला हवेत हे मात्र खरं. रामायण, महाभारत यांची गोडी, त्यांचे आकर्षण आहेच. ते मानवी जगण्याचे ग्रंथ आहेत हेही खरे. सत्याचा असत्यावर विजय, न्यायाचा अन्यायावर विजय वगैरे ठीकच. परंतु हे दोन पुराण ग्रंथ मानवी जीवनाचा पूर्णविराम नाही हेही लक्षात घेतले पाहिजे. मानवी जीवनाचे स्वरूप या दोन ग्रंथात व्यापक स्वरूपात, सखोल रीतीने आलेले आहे हे खरेच; पण मानवी जीवनाचे ते अंतिम चित्र नाही. शिवाय व्यावहारिक मानवी जीवनाचे मार्गदर्शन त्यातून होत असले तरीही, मानवी जीवनाच्या मुळाला ते हात घालत नाहीत. उपनिषदे ही या अर्थाने पुढची पायरी आहेत. नवीन युगाच्या मानवासाठीही उपनिषदे मार्गदर्शक ठरतात. ज्या भारतात उपनिषदे जन्माला आली त्या भारतानेही याआधी वा आतापर्यंत उपनिषदे आपल्या जगण्याचा भाग बनवलेली नाहीत. प्रयत्न जरूर केलेत पण अजून ते पूर्णत्वाला गेलेले नाहीत. उपनिषदे भावी जगाचा आधार होऊ शकतील वा नाही हे तर काळच सांगेल पण आजच्या मानवाच्या प्रश्नांची उत्तरे मात्र तेच देऊ शकतील. उपनिषदे अव्यक्तिक (impersonal) आहेत, सार्वभौमिक आहेत. ती कुठलाही प्रश्न नाकारत नाहीत. कशालाही बुद्धिभेद म्हणत नाहीत. माहीत नसलेल्या गोष्टींना माहीत नाही म्हणायला शिकवतात आणि हे म्हणतानाच ओशाळलेपणा, अपमान, लघुता येऊ देत नाहीत. अन उत्तर देता आले नाही तरी शांति आणि समाधान हिरावून घेत नाहीत. ती मानवाचा प्रवास थांबवित नाहीत आणि त्याला अकारण फिरवतही ठेवत नाहीत. उपनिषदांचा हात अधिकाधिक लोकांनी धरायला हवा हे मात्र वाटतं.
- श्रीपाद कोठे
१ एप्रिल २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा