शुक्रवार, ११ मार्च, २०२२

आपापल्या गावी जावे

शेतकरी मोर्चा, त्यामागील भावना, त्यांची स्थिती, त्यांच्या गरजा, अपेक्षा या सगळ्यांशी कोणीही सहमत होईल. मीही आहेच. त्यातही परीक्षेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दाखवलेली शिस्त आणि संवेदनशीलता निश्चित आदरास पात्र आहे. फक्त एक विनंती- अशा सगळ्यांना ज्यांना याबद्दल आस्था आहे, त्यात पत्रकार, माध्यमे, सामान्य वा असामान्य माणसे सगळे आलेत- शेतकऱ्यांना जे काही मिळावं असं वाटतं, त्यांची परिस्थिती बदलायला हवी असं वाटतं; त्यातील आपली भूमिका काही असू शकते का, असा प्रश्न आपणच आपल्याला विचारावा. केवळ sympathy, empathy एवढ्यापेक्षा; आपली जीवनशैली, जीवनाचे प्राधान्य, सवयी, अपेक्षा या साऱ्याचा कुठे काही संबंध आहे का हे थोडं तपासून पाहिल्यास बरं. या परिस्थितीला आम्ही जबाबदार आहोत का, हा फारच ढोबळ आणि उथळ मुद्दा ठरेल. कोण जबाबदार वगैरे चर्चाच फारशी योग्य नाही. एकूण परिस्थितीचं विश्लेषण करणे अन त्यात आपला संबंध शोधणे हा मुद्दा आहे. पहा वाटलं तर.

एकूणच आर्थिक संदर्भात एक कल्पना विचारार्थ-

निवृत्ती वेतन मिळणाऱ्या साऱ्यांनी, शिक्षक, प्राध्यापक, बँक कर्मचारी, विमा कंपन्या, सरकारी कर्मचारी- अधिकारी अशा निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले लोक; यांनी निवृत्त झाल्यावर आपापल्या गावी नाही तर किमान आपापल्या तालुका स्थानी जाऊन राहण्याची सुरुवात केली; मनातील शहरी वातावरणाचं आकर्षण थोडं नियंत्रित करून तालुक्याच्या ठिकाणी असे लोक राहू लागले, त्यांच्या वसाहती होऊ लागल्या तरीही परिस्थितीत सकारात्मक बदल व्हायला आपोआप सुरुवात होईल. असे प्रयोग समाजातून पुढे यायला हवेत. बाकी चर्चा हा एक timepass आहे.

- श्रीपाद कोठे

१२ मार्च २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा