आज श्री रामकृष्ण परमहंस यांची जयंती. त्यानिमित्त -
(नागपूर तरुण भारतच्या वाचकांनी काल हा लेख वाचला असेल.)
गुरू शिष्य परंपरा आणि गुरू शिष्य जोडी या काही नवीन गोष्टी नाहीत. परंतु गुरू आणि शिष्य दोघांनाही लोकप्रियता आणि स्वीकार्यता लाभणे, तसेच दोघांचाही प्रभाव असणे; या गोष्टी विरळाच. कधी शिष्य तर कधी गुरू जनमानसावर प्रभाव टाकतात. संत निवृत्तीनाथ आणि संत ज्ञानेश्वर, संत रामदास आणि त्यांचा शिष्य कल्याण, गोपालकृष्ण गोखले आणि महात्मा गांधी; अशी उदाहरणे सांगता येतील. रमण महर्षी, संत तुकाराम, तुकडोजी महाराज, मीराबाई, कबीर, तुलसीदास; यांच्या बाबतीत गुरू वा शिष्य या दोन्ही नात्यांनी कोणाचे नावही सांगता येत नाही, प्रभाव ही दूरचीच गोष्ट. नाही म्हणायला गुरू नानक आणि त्यांच्यानंतरचे दहा गुरू ही परंपरा आहे पण गुरू शिष्य जोडी समान रूपाने प्रभावी असं नाही म्हणता येणार. शिवाय त्यांना शीख पंथाची एक मर्यादा आहेच. मात्र १९ व्या आणि २० व्या शतकाच्या संधिकाळात गुरू आणि शिष्य दोघेही समान रूपाने स्वीकार्य आणि प्रभावी अशी एक जोडी पाहायला मिळते. ती म्हणजे - श्री रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद.
श्री रामकृष्ण परमहंस यांचे अवघे ५० वर्षांचे जीवन हे युगप्रवर्तक जीवन होते. ख्रिस्तोफर इशरवूड म्हणतात त्याप्रमाणे श्री रामकृष्ण एक phenomenon होते. इशरवूड म्हणतात, 'this is the story of phenomenon. I will begin by calling him simply that, rather than 'holy man', 'mystic', 'saint' or 'avatar'; all emotive words with mixed associations which may attract some readers, repel others. A phenomenon is often something extraordinary and mysterious. Ramkrishna was extraordinary and mysterious; most of all to those who were best fitted to understand him. A phenomenon is always a fact, an object of experience. That is how I shall try to approach Ramkrishna.'
जगाची एक आध्यात्मिक परंपरा तर आहेच पण त्यातही भारताची एक महान, मोठी, सशक्त आणि अद्भुत अशी आध्यात्मिक परंपरा आहे. श्री रामकृष्ण परमहंस या आध्यात्मिक परंपरेचे एक उत्तुंग शिखर तर आहेतच शिवाय त्याहूनही खूप काही आहेत. त्यांनी अमुक अमुक कार्य केलं किंवा अमुक अमुक साधना केल्या, असं म्हणणं हेदेखील तोकडं आहे. ते स्वतः तर मी अमुक केलं वा करतो असे म्हणतच नसत. आपण जगन्मातेचे बालक असून तीच सारे काही करते अशी त्यांची केवळ श्रद्धा नव्हती तर तेच त्यांचे जीवन होते. त्यांची भाषाही 'मी'चा प्रयोग केलाच तर त्याच अर्थाने करीत असे.
श्री रामकृष्ण परमहंस म्हणून जग ज्या जीवनाला ओळखतं ते जीवन घडून गेलं एवढंच म्हणता येईल. अतिशय मोठा, कर्तृत्ववान माणूस ज्याप्रमाणे काम करतो, कार्य करतो, विचार आणि व्यवहार करतो; त्या अर्थाने त्यांनी काहीही केलं नाही. विचार, चिंतन, योजना, नियोजन, आढावा, कार्यपद्धती असे काहीही त्यांच्या जीवनात नव्हते. विश्वचालक अचिंत्य शक्ती त्यांच्या माध्यमातून या जगासाठी कार्य करीत होती. योगायोग असा की असे असूनही ते केवळ इतिहासातील कल्पनेत अडकून पडणार नव्हते. नव्या युगाला हव्या असणाऱ्या प्रत्यक्ष पुराव्याच्या रुपात ते जगाला लाभणार होते. छायाचित्रण, लेखन, प्रकाशन, विज्ञान या माध्यमातून दंतकथा वाटावी असे हे जीवन त्यांच्या काळातच नव्हे तर भविष्यासाठीही प्रत्यक्ष झाले.
त्यांच्या जीवितकाळातच लोकांना त्यांच्या महात्मतेची आणि अपूर्वतेची जाणीव होऊ लागली होती. अनेक देशी विदेशी सुबुद्ध सुज्ञ लोक त्यांना भेटत असत. श्री रामकृष्ण स्वतःदेखील पुष्कळांना भेटत असत. अशा अनेक लोकांनी त्यांच्याविषयी आपले अभिप्राय दिलेले आहेत. त्यांच्या जीवितकाळानंतर देखील अनेकांनी त्यांच्या जीवनाचे अनुशीलन केले आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे, करीत आहेत.
विविध संप्रदायांचे आचार्य, विविध शास्त्रांचे अधिकारी पंडित त्यांना भेटून जाणून घेण्याचा प्रयत्न करत. आर्य समाजाचे संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती १५ डिसेंबर १८७२ ते १५ एप्रिल १८७३ या काळात कोलकात्यात मुक्कामाला होते. श्री रामकृष्णांना हे कळल्यावर एक दिवस ते त्यांना भेटायला गेले. त्याच वेळी ब्राम्ह समाजाचे एक नेते केशवचंद्र सेन दयानंद सरस्वती यांना भेटायला आले. सेन यांना श्री रामकृष्ण ओळखत होते. त्यांना पाहताच श्री रामकृष्णांची समाधी लागली. त्याबद्दल कॅप्टन विश्वनाथ उपाध्याय यांच्याजवळ आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना दयानंद सरस्वती म्हणाले, 'आपण फक्त वेद वेदांताचा अभ्यास करतो. परंतु त्या शास्त्रांचं फळ मला या महान आत्म्यात पाहायला मिळालं. त्यांना पाहिलं की समजतं की, पंडित फक्त ताक पितात तर यांच्यासारखे महान आत्मे नवनीत मटकावत असतात.'
राजाराम मोहन रॉय यांनी स्थापन केलेल्या ब्राम्ह समाजाच्या अनेक नेत्यांना श्री रामकृष्ण भेटले होते. महाकवी रवींद्रनाथ टागोर यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर यांना भेटायला ते त्यांच्या जोडासांको येथील निवासस्थानीही गेले होते. श्री रामकृष्णांवरील पहिला लेख २८ मार्च १८७५ रोजी Indian Mirror मध्ये प्रकाशित झाला होता. ब्राम्ह समाजाचा प्रचार करायला युरोप, अमेरिका, जपान इत्यादी देशात जाऊन आलेले प्रतापचंद्र मुजुमदार यांनीही १६ एप्रिल १८७६ रोजी Sunday Mirror मध्ये श्री रामकृष्णांवर लेख लिहिला होता. ख्रिश्चन मिशनरी जोसेफ कुक आणि मेरी पिगॉट २३ फेब्रुवारी १८८२ रोजी गंगेच्या प्रवाहात नावेवर श्री रामकृष्णांना भेटले होते आणि त्यांनीही २६ फेब्रुवारी १८८२ रोजी त्यांच्यावर लेख लिहिला होता.
शिक्षण क्षेत्रात मोठं काम केलेले, प्रसिद्ध विचारक, लेखक, संस्कृत व्याकरणावर पुस्तक लिहिणारे आणि बंगाली साहित्याला नवीन वळण देणारे ईश्वरचंद्र विद्यासागर यांचीही श्री रामकृष्णांशी भेट झाली होती. त्यावेळी झालेल्या संभाषणात श्री रामकृष्ण त्यांना म्हणाले होते, 'ब्रम्ह ही एकच गोष्ट अद्याप उष्टी झालेली नाही.' (ब्रम्ह काय हे अजून कोणीही तोंडाने सांगू शकलेले नाही.) पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर या वाक्याने एकदम प्रभावित झाले होते. आपल्याला नवीन प्रकाश लाभला असे उद्गार त्यांनी काढले होते.
महाकवी रवींद्रनाथ टागोर २ मे १८८३ रोजी ब्राम्ह समाजात श्री रामकृष्णांना भेटले होते. नंतर १९३६ साली श्री रामकृष्ण यांच्या शताब्दी निमित्त त्यांनी त्यांच्यावर इंग्रजी आणि बंगालीत कविताही केल्या होत्या. याच जन्मशताब्दी निमित्त १ मार्च ते ८ मार्च या काळात कोलकात्याला एक धर्मपरिषद भरवण्यात आली होती. एकूण १५ सत्रांमध्ये जगभरातील अनेक विद्वान, विचारवंत सहभागी झाले होते. त्यातील ३ मार्चच्या संध्याकाळच्या सत्राचे अध्यक्षपद रवींद्रनाथ टागोर यांनी भूषवले होते. धर्म नाकारण्याच्या या काळात श्री रामकृष्ण यांनी प्रत्यक्ष अनुभूतीच्या आधारे भारताच्या आध्यात्मिक परंपरेचे सत्य सिद्ध केले, असे भावपूर्ण गौरवोद्गार त्यांनी त्या अध्यक्षीय भाषणात काढले होते.
वंदे मातरम गीताचे रचयिता बंकिमचंद्र चॅटर्जी हेदेखील अधर सेन यांच्या घरी श्री रामकृष्णांना भेटले होते. इंग्रजी रीतिरिवाजांचा पगडा असलेले बंकिमचंद्र, त्यावेळी समाधीच्या उन्मनी अवस्थेत श्री रामकृष्णांनी केलेल्या नृत्य गायनाने इतके प्रभावित झाले की, जाताना त्यांनी श्री रामकृष्णांची पायधूळ मस्तकी लावून त्यांना आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यांचे निमंत्रण मात्र तसेच राहिले.
'फिनिक्स', 'ट्रिब्युन', 'लीडर', 'प्रदीप', 'प्रभात' या नियतकालिकांचे संपादक राहिलेले नागेंद्रनाथ गुप्ता; आर्यधर्म प्रचारिणी सभेचे संस्थापक आणि 'धर्मप्रचारक'चे संपादक कृष्णप्रसन्न सेन; 'संध्या' आणि 'स्वराज'चे संपादक भवानीचरण बॅनर्जी आणि उपाध्याय ब्रम्हबांधव यांनीही आपल्या लेखणीद्वारे श्री रामकृष्णांचे जीवन, कार्य आणि तत्वज्ञान देशविदेशात पोहोचवले होते. त्यांचे भक्त, शिष्य, ते ज्या काली मंदिरात पुजारी होते ते मंदिर उभारणारी राणी रासमणी आणि त्यांचे कुटुंबीय, त्यांच्यावर वेळोवेळी उपचार करणारे डझनभराहून अधिक डॉक्टर्स या सगळ्यांनी त्यांच्याबद्दल भरभरून लिहिले, बोलले आहे. स्वामी विवेकानंद यांना तर त्यांचे इंग्रजीचे प्राध्यापक हेस्टी यांनीच प्रथम श्री रामकृष्ण यांच्याबद्दल सांगितले होते.
हिंदी साहित्यातील प्रसिद्ध छायावादी कवी 'निराला' यांच्यावरही श्री रामकृष्ण यांचा मोठा प्रभाव होता. 'समन्वय' मासिकाच्या १९२२ च्या मे-जूनच्या अंकात निराला यांनी श्री रामकृष्णांवर पहिला लेख लिहिला होता. त्यानंतर १९२३ च्या मार्च-एप्रिल अंकात 'श्री रामकृष्ण आणि राष्ट्रीय जीवन' हा दुसरा लेख लिहिला होता. भारताच्या राष्ट्रीय सत्वाची मर्मग्राही चिकित्सा निराला यांनी त्या लेखात केली होती. 'मतवाला' साप्ताहिकाच्या ५ एप्रिल १९२४ च्या अंकातही निराला यांनी श्री रामकृष्णांवर लेख लिहिला होता. श्री रामकृष्ण केवळ विश्वगुरु नाहीत तर प्रत्यक्ष सत्य आहेत अशी निराला यांची धारणा होती. 'समन्वय'च्या एप्रिल-मे १९२९ च्या अंकात, 'माधुरी' मासिकाच्या मार्च १९३२ च्या अंकात देखील निराला यांनी श्री रामकृष्णांवर लेख लिहिले होते. त्यांच्या कवितांवर सुद्धा श्री रामकृष्ण तत्वज्ञानाचा प्रभाव आहे. एक कविता तर त्यांनी श्री रामकृष्णांचे अंतरंग शिष्य स्वामी प्रेमानंद यांच्यावर लिहिली आहे.
Indology चे विद्वान प्राध्यापक मॅक्समुलर यांचा स्वामी विवेकानंद यांच्याशी पत्रव्यवहार झाला होता आणि त्याआधारे त्यांनी श्री रामकृष्णांवर थोडेबहुत लिहिलेही होते. १९१५ साली साहित्याचा नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे रोमा रोला यांनी तर श्री रामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद यांची चरित्रे लिहिली होती. त्यांनी ही चरित्रे प्रसिद्ध मनोचिकित्सक, आधुनिक मानसशास्त्राचे प्रणेते सिगमंड फ्रॉइड यांनाही पाठवली होती. फ्रॉइड यांनी रोमा रोला यांच्या त्या पत्राला उत्तर द्यायला तब्बल दीड वर्ष लावलं होतं. श्री रामकृष्णांचा माँ कालीचा अनुभव हा 'ocean of spirit boundless, dazzling' असा असल्याचे रोमा रोला यांचे म्हणणे होते. या 'oceanic feeling' वर आपले मत काय असेही रोमा रोला यांनी फ्रॉइडला विचारले होते. त्यावर त्याने या अनुभवाची सांगड मृत्यूच्या इच्छेशी घातली होती. श्री रामकृष्णांच्या या अनुभवाने आपली शांति भंग केली असेही त्याने म्हटले होते. अर्थात आध्यात्म आणि त्याची भारतीय धारणा आणि परंपरा याची काहीही जाण नसल्याने फ्रॉईडला श्री रामकृष्णांचे अनुभव आणि तत्त्व आकलन होणे कठीणच होते. एवढेच नाही तर त्यांचे चरित्र लिहिणारे रोमा रोला यांनाही त्याचे यथायोग्य आकलन होऊ शकले नव्हते. दोघांनीही विश्वविषयक आणि जीवनविषयक आपल्या मर्यादित आणि पाश्चात्य आकलनात श्री रामकृष्णांना बसवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याबद्दलचे या दोघांचे कुतूहल मात्र प्रामाणिक होते. नंतरही अनेक पाश्चात्य अभ्यासकांनी श्री रामकृष्ण समजून घेण्याचा प्रयत्न केला पण मानवी तर्क आणि पुस्तकी पांडित्य यात गुरफटल्याने त्यांना श्री रामकृष्णांचे नीट आकलन तर दूरच, उलट ते मनोरुग्ण होते इत्यादी भ्रम त्यातून निर्माण झाले. अर्थात योग्य आध्यात्मिक धारणेतून श्री रामकृष्णांची मांडणी करणारे पाश्चात्य विद्वानही आहेतच.
वर्तमान युगाच्या व्यक्तिवाद आणि स्वातंत्र्य या मूल्यांना ठोस व भक्कम अन तोही अनुभूत आधार देण्याचे युगप्रवर्तक ईश्वरी कार्य करण्यासाठी श्री रामकृष्ण या जगी आले होते. स्त्री, पुरुष, पंथ, संप्रदाय, भाषा, भूगोल, जातीपाती हे सगळे बाजूस सारले जाण्याचा काळ आलेला आहे; व्यक्तीचे महत्व अतोनात वाढणार असल्याने समाजव्यवस्था विस्कळीत होणार आहेत. ऐहिक भोग आणि भोगलालसा चरम सीमेवर पोहोचणार आहेत. परिणामी कट्टरता वाढेल. अशा काळात सगळ्यांना धरून ठेवणारे तत्त्व काय असेल, सगळ्यांना जीवनाचा आशय आणि अर्थ प्रदान करणारे तत्त्व काय असेल; ते श्री रामकृष्णांनी जगाला प्रत्यक्ष दाखवून दिले. ते तत्त्व म्हणजे निरुपाधिक ईश्वरी तत्त्व. सगळ्या अस्तित्वाचा लय ज्यात होतो असं तत्त्व. एकीकडे या ईश्वरी तत्त्वाचं चालतं बोलतं रूप असलेले श्री रामकृष्ण आणि दुसरीकडे - या विश्वाचं जे काही आदिकारण असेल ते आमच्या मुठीत असलं पाहिजे. त्या आदिकारणाने आमच्या आज्ञेने चालायला हवं; असा हट्ट करणारा पाश्चात्य विचार. अशी ही स्थिती आहे. त्यामुळे पश्चिमेतील मी मी म्हणणाऱ्या लोकांनाही श्री रामकृष्णांचं आकलन होऊ शकलं नाही तर त्यात आश्चर्य नाही. मात्र, या जगाची सूत्र आपल्या मुठीत घेण्याच्या भूताने झपाटल्याने उत्पन्न होणारे रोजचे नवनवे प्रश्न आणि त्रास; अखेर तो प्रयत्न सोडून देण्याला बाध्य करतील हे निश्चित. त्यावेळी पुढे काय हा प्रश्न घेऊन उभे असलेल्या मानवजातीला मार्ग दाखवायला श्री रामकृष्ण उभे आहेत.
- श्रीपाद कोठे
रविवार, १४ मार्च २०२१