महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजच्या १२५ व्या जयंती दिनी युनोपासून सर्वत्र त्यांना भावांजली अर्पण करण्यात आली हे योग्यच झाले. त्यांच्या जीवनाचा अन विचारांचा उहापोह देखील झाला. काही चित्रवाणी वाहिन्यांनी तर त्यांचे विचार समजून घेण्यासाठी संपूर्ण आठवड्याचे नियोजन केले. दलितांचे मसीहा आणि राज्यघटनेचे शिल्पकार यापेक्षा अधिक असलेले त्यांचे योगदान, त्यांचे अन्य पैलू यांचेही या निमित्ताने दर्शन घडले. राजकीय पक्षांनी त्यांच्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. हे सगळे ठीकच झाले. दिवस मावळता मावळता काही गोष्टी मनात आल्या.
१) या महामानवाने बंधुतेवर जोर दिला होता. ही बंधुता सगळ्या समाज घटकात असावी असे त्यांचे म्हणणे. त्यामुळे सवर्णांनी दलित व अन्य मागासवर्गीय यांच्याबद्दल मनात अढी व द्वेष ठेवू नये. तसेच दलितांनी सवर्ण आणि अन्य मागासवर्गीय यांच्याबद्दल मनात अढी व द्वेष ठेवू नये. अन अन्य मागासवर्गीयांनी सवर्ण आणि दलित यांच्याबद्दल मनात अढी व द्वेष ठेवू नये. आजचे चित्र फारसे सुखद नाही. ते बदलण्याची सुरुवात स्वत:पासून करावी.
२) बाबासाहेब आधुनिक काळातील विचारक्रांतीचे प्रवर्तक होते. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित गोष्टी व्यक्तिवादी न होऊ देणे हे महत्वाचे ठरते. त्यांनी स्वत:च विभूतीपूजेवर कोरडे ओढले होते. आज त्यांना सन्मान देण्याचा विचार त्यांच्या तसबिरी, त्यांचे पुतळे आणि त्यांची स्मारके यातून बाहेर यायला हवा. उदाहरण म्हणून एक सांगता येईल. दिल्ली, मुंबई आणि लंडन येथील त्यांच्या संबंधित वास्तू स्मारक करण्यात आल्या. आजच्या निमित्ताने नागपूरच्या श्याम हॉटेलचाही त्यात समावेश करण्यात आला. हे आवश्यक होते का? हे टाळायला नको का? त्याऐवजी श्याम हॉटेलच्या जागेचा उपयोग वसतिगृह किंवा नागपुरात उपचारासाठी किंवा परीक्षा इत्यादीसाठी येणाऱ्या लोकांना आवश्यक असणाऱ्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी करता येणार नाही का? भावना, विचार अन व्यवहार (जागा इत्यादी... वाढत्या लोकसंख्येत जागा हा महत्वाचा घटक आहे) यांची सांगड घालता यायला हवी.
३) त्यांचे महान कार्य असलेल्या राज्य घटनेविषयी नीट विचार करता आला पाहिजे. त्यांनी स्वत:च म्हटले होते की, ही घटना राबवणारी माणसे चांगली नसतील तर तिचा उपयोग होणार नाही. याचा सरळ अर्थ असा होतो की, राज्यघटना आणि माणसे या दोन स्वतंत्र बाबी आहेत. राज्यघटना राबवली म्हणजे चांगली माणसे तयार होतील असे नाही, तर राज्यघटना राबवायला चांगली माणसे हवीत. ही कुठून अन कशी येणार? चांगली माणसे तयार होणे अन मिळणे ही राज्यघटनेच्या बाहेरील बाब आहे, असाच त्याचा आशय होऊ शकतो. याचाच अर्थ ती राज्यघटनेची मर्यादा आहे. राज्यघटनेवर एक नजर टाकली तरीही हे स्पष्ट होते. तिचे २२ भाग आणि १२ शेड्यूल यांच्या शीर्षकांची नावे वाचली तरीही हे स्पष्ट होते की, ही राज्यघटना शासन व प्रशासन यंत्रणेची चर्चा करते. मानवी भावभावना, विचार-विकार, व्यवहार, त्यांचे परस्पर संबंध, त्यांचे होणारे परिणाम, अशा अनेक विषयांचा त्यात अंतर्भाव नाही. याच कारणाने स्वत: लिहिलेली राज्यघटना असूनही धर्माचे महत्व त्यांना वाटले आणि राज्यघटना स्वीकारल्यानंतर सहा वर्षांनी त्यांनी बौद्ध पंथाचा स्वीकार केला. थोडक्यात म्हणजे राज्यघटनेचे कार्य आणि तिचा परीघ वेगळा आहे. व्यक्ती अन त्याचे व्यक्तिगत अन सामुहिक जीवन; तसेच त्याच्या जीवनाचा व्यापक आशय हे त्याहून मोठे आहे. त्यामुळे राज्यघटनेला `पोथीनिष्ठ पावित्र्याची भावना' जोडणे योग्य ठरणार नाही. बाबासाहेबांचे अनुयायीच नाहीत, तर त्यांचा विविध कारणांसाठी विविध पद्धतीने उपयोग करून घेणारे लोकही याबाबतीत बोटचेपी भूमिकाच घेताना दिसतात.
- श्रीपाद कोठे
१४ एप्रिल २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा