शनिवार, ९ एप्रिल, २०२२

'sugar tax' च्या निमित्ताने

ब्रिटनमध्ये शीतपेयांवर `sugar tax' लावणार असल्याची चर्चा आहे. लागेलही. त्यात दोन मुद्दे आहेत. १) साखरेच्या जास्त सेवनाने माणसाचे वजन वाढते. वाढत्या वजनाचा हा धोका कमी करण्यासाठी त्यावर कर लावायचा आणि लोकांना साखरेचे सेवन कमी करण्याच्या दिशेने ढकलायचे. खरंच असं होतं का? होऊ शकतं का? लोक शीतपेये पिणं सोडतील की कर भरणं पसंत करतील? आजवरचा अनुभव पाहता कर भरण्यालाच लोक प्राधान्य देण्याची शक्यता अधिक. असं असताना आणि जगभरात अशा विविध विषयांना मिळणारा प्रतिसाद पाहता असे सहज म्हणता येते की, अशा उपायांनी माणसाचे भले वगैरे फारसे होत नाही. फास्ट फूड, धूम्रपान, दारू आदी विषयांचे हेच आहे. मुळात प्रश्न हा आहे की, कल्याणकारी राज्याने माणसाचे व्यक्तिगत वा सामाजिक आयुष्य किती हाती घ्यावे? मानवी जीवनाचे नियंत्रण राज्य, सरकार, कायदे, नियम यांनी किती करावे? सध्या नियंत्रणे वाढवण्याचा प्रकार वाढतो आहे. अशा प्रकारे माणसाचे भले वगैरे होत नाही हा अनुभव गाठीशी असूनही. याचा दुसरा परिणाम हा झाला आहे की, माणसाचा विवेक, सदसद्विवेकबुद्धी, चांगुलपणा, विचारक्षमता, विचारप्रक्रिया, विचारीपणा, आंतरिक विकास, जबाबदारीची भावना आणि जाणीव, सामूहिक जीवनासाठीची मानसिकता; या साऱ्याचा ऱ्हास होतो आहे. याच ठिकाणी दुसरा मुद्दा लक्षात घेतला तर विषय स्पष्ट होतो. २) काय आहे दुसरा मुद्दा? दुसरा मुद्दा हा की, या `sugar tax' ने ब्रिटन सरकारला जास्त महसूल मिळेल. खरी मेख इथे आहे. आज जगात कोणालाही पैसा पुरत नाही. व्यक्ती असो की सरकार. त्यामुळे वेळोवेळी पैसा मिळवण्याचे विविध उपाय केले जातात. कर, उपकर, सेस आदी त्याच प्रकारात मोडतात. तो किती योग्य वा अयोग्य किंवा ज्यासाठी कर आकारण्यात येतो ते त्याने साध्य होते वा नाही; हा मुद्दाच नसतो. आपल्या तिजोरीत अधिक पैसा जमा होणे हा एकच उद्देश. अगदी ग्रामपंचायतीपासून देशाच्या सरकारांपर्यंत हेच सूत्र. हेच व्यक्तीच्या पगाराच्या बाबतीत. कर्मचाऱ्याला देण्यात येणारे विविध भत्ते हे ज्यासाठी देण्यात येतात ते साध्य होते का? त्याची गरज आहे का? हे प्रश्न अस्थानी ठरतात. उत्पादनांच्या किंमती ठरवण्यात हेच सूत्र. आपल्या तिजोरीत पैसा अधिक जमा झाला पाहिजे. हे सूत्र का रुजले? कारण अर्थकारणाचा जीवनाशी संबंध तुटला. जेव्हा अर्थकारणाचा संबंध जीवनाशी होता तेव्हा- कामाचा मोबदला, त्या मोबदल्यातून खर्च, बचत आणि बचतीचा योग्य विनियोग हे सूत्र होते. खर्चाचा विचार मिळकतीनंतर होत असे. आता खर्चाचा विचार आधी आणि तो जुळवण्यासाठी मिळकतीचा विचार नंतर होऊ लागला आहे. खर्चाला मर्यादा असूच शकत नाही. मग त्या अमर्याद खर्चासाठी पैसा येत राहिला पाहिजे आणि तो वाढत राहिला पाहिजे. चलनवाढ, मंदी, संपत्तीचे असमान वितरण, साधने व संसाधने यांची उधळपट्टी, प्रदूषण, अभाव, अनास्था, अस्वस्थता, ताण, चिंता, स्पर्धा, सामाजिक- कौटुंबिक- मानसिक- अस्वास्थ्य; हे सारे याचे परिणाम आहेत. अधिक खर्च म्हणजे अधिक चांगलं जीवन, अधिक खर्च म्हणजे अधिक दर्जेदार जीवन, अधिक खर्च म्हणजे श्रेष्ठता; त्यासाठी जाहिराती, मालिका, चित्रपट, साहित्य, तत्वज्ञान, विचारव्यूह, शिक्षण, वातावरण यातून सतत आवाहनांचा- प्रलोभनांचा मारा; आणि यातून विकसित होणाऱ्या पद्धतशीर यंत्रणेतून पैसा आणि सत्ता मुठीत ठेवणे; असा हा व्यूह आहे. त्याचा माणसाच्या जगण्याशी वगैरे फारसा संबंध नाही. असलाच तर पैसा आणि सत्ता यावर प्रभुत्व मिळवण्याच्या प्रयत्नातील एक पाऊल एवढाच मानवी जगण्याचा संबंध. माणसाच्या जगण्यासाठी पैसा हे सूत्र जाऊन, पैशासाठी मानवी जगणं असा हा प्रकार आहे. या साऱ्या विचारासाठी वेळ आणि इच्छा नसलेला सामान्य माणूस मग, स्वच्छ हवेसाठी `प्राणवायू कर' देऊ लागतो. ज्यावर आपला काडीचाही हक्क नाही त्यावर कर्तेधर्ते कर लावू लागतात आणि तुम्ही-आम्ही living standard च्या उड्या मारू लागतो.

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, १० एप्रिल २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा