सध्या `कोर्ट' चित्रपट बराच गाजतो आहे. एवढेच नाही तर तो चित्रपट आवडणारे आणि नावडणारे यांच्यातील वाद-चर्चा त्याहून अधिक गाजत आहेत. तशातच काल दिल्लीत आपच्या सभेत एका शेतकऱ्याने गळफास लावून घेतला. या दोन्ही गोष्टींचा विचार सुरु असताना वाटले- खरंच चित्रपट काय, राजकारण काय आणि प्रसार माध्यमे काय; यांचा जगण्याशी संबंध किती असतो? `कोर्ट' चित्रपट खूपच चांगला असेल किंवा अतिशय सुमार असेल. एक कलाकृती यापेक्षा त्याचे महत्व ते काय? यापूर्वीही न्यायव्यवस्थेचे वाभाडे हिंदी-मराठी चित्रपटांनी काही कमी काढलेले नाहीत. किती विचार केला गेला त्याचा? किती फरक पडला परिस्थितीत? हां, त्या चित्रपटांचा प्रभाव कदाचित नवीन चित्रपटापेक्षा कमी असेल. पण त्याने काय फरक पडतो? तुम्हा आम्हाला चघळायला एक विषय यापेक्षा काय अधिक? बरे अशा चित्रपटांनी व्यक्तीच्या संवेदना वगैरे जागृत होतात असे आपण बिनधास्त गृहीत धरतो. तसे असते तर आजवर समाज असा संवेदनाहीन का राहिला असावा? जी बाब कोर्टाची तीच बाब शेतकरी आत्महत्यांची. आजपासून १५ हून अधिक वर्षांपूर्वीची गोष्ट. अशाच तापल्या उन्हाळ्यात मी आणि आमचे छायाचित्रकार शेखर सोनी यांनी आठ दिवस सगळा विदर्भ आमगाव ते खामगाव पालथा घातला होता. एकच विषय- शेतकरी आत्महत्या. सरकार, प्रशासन सगळे हालले होते. मुख्यमंत्री मनोहर जोशींना विदर्भात तातडीने धाव घ्यावी लागली होती. त्यानंतर त्या कामाला पत्रकारितेचा मोठा पुरस्कार वगैरेही मिळाला आणि आम्ही तो मिरवला. पण आज काय स्थिती आहे? का असे होते?
दोन गोष्टी आहेत. एक तर- चित्रपट असो वा माध्यमे, ही प्रत्यक्षात फारसे काही करू शकत नाहीत. आर्थिक, सामाजिक, राजकीय, भावनिक, वैचारिक; कुठल्याही अर्थाने फार काही करू शकत नाहीत. दुसरे म्हणजे- तुमच्या माझ्यासारखा मोठा वर्ग, आपले जगणे या साऱ्याशी जोडून घ्यायला तयार नसतो. आम्ही चर्चा करू, सहानुभूती दाखवू, मदतही करू; पण हे सगळे ज्या विशिष्ट जीवनपद्धतीमुळे आणि जीवनदृष्टीमुळे होते, ती पद्धती आणि दृष्टी बदलायला मात्र आमची तयारी नसते. आम्ही मिरच्या खाऊ पण त्या तिखट लागायला नको, अशी आमची उफराटी विचारपद्धती आहे. स्वत:च्या सवयी, सुख, सवलती यांच्यावर पाणी सोडण्यास कोण तयार आहे? स्वत:ला चिरत जाऊन स्वत:च्या चुका आणि मर्यादा किमान स्वीकारण्याची कोणाची किती तयारी असते?
- श्रीपाद कोठे
२३ एप्रिल २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा