भय्याकडून दूध घेण्याचा अनुभव बहुतेकांना असतोच. त्याच्याकडून एक लीटर दूध घ्यायचे असेल आणि भांडं लहान असेल तर? एक तर त्याला उरलेलं दूध परत घेऊन जावं लागेल किंवा आपल्याला दुसरं भांडं आणावं लागेल किंवा त्याच भांड्यात ठरलेलं दूध घ्यायचं तर काही दूध वाया जावं लागेल. कारण ते भांड्यात मावणे शक्य नसणार.
दोन व्यक्तींच्या नात्यांना, देवाणघेवाणीला, संबंधांना हे लावून पाहिले तर... खरे तर लावून पाहावेच. फरक फक्त एवढाच की व्यक्तींच्या संबंधात दोघेही भय्या असतात अन दोघेही ग्राहक देखील. प्रत्येक जण दुसऱ्याला काही तरी देत असतो, अन प्रत्येक जण दुसऱ्याकडून काही तरी घेत असतो. कधी दोघेही दूध देतात अन दूध घेतात, कधी दुधाच्या बदल्यात गहू, कधी गव्हाच्या बदल्यात कपडे, कधी जमिनीच्या बदल्यात सोने, कधी सोन्याच्या बदल्यात आरोग्य, कधी आरोग्याच्या बदल्यात आनंद, कधी आनंदाच्या बदल्यात शहाणपण... असं काहीही. यात घेणाऱ्याचं भांडं भरलं आणि देणाऱ्याचा माल उरला असेल तर पंचाईत होते. किंवा घेणाऱ्याची गरज भागली नसेल आणि देणाऱ्याचा माल संपला तरीही पंचाईतच. दोघांचीही भांडी सारखी असली अन एकाने दुसऱ्याला कापूस दिला अन दुसऱ्याने त्याबदल्यात सोने दिले तर? एकाला कापूस कसा भरायचा हा प्रश्न, तर दुसऱ्याला भांड्याचा तळही भरला नाही ही खंत. वाया जाणं, कमी पडणं, नुपूर, उधळेपणा, खंतावणं, ओढाताण, संभ्रम, त्रागा, त्रास, असमतोल, असंबद्धता, खिन्नता, ओढाताण, फसवणूक; अशा अनेक छटा मग पाहायला मिळतात.
प्रत्येकाचं भांडं निराळं अन प्रत्येकाचा मालही निराळा. देण्याघेण्याचा मेळ कसा बसावा?
- श्रीपाद कोठे
९ एप्रिल २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा