बुधवार, १३ एप्रिल, २०२२

आघात

काल उत्तर भारतात ७ क्षमतेचा भूकंप झाला. त्याच्या दोनच दिवस आधी ६.८ क्षमतेचा भूकंप झाला होता. कालच्या भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमार सीमेवर होता, तर त्याआधीच्या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानात होता. ६ पेक्षा अधिक क्षमतेचा भूकंप मोठा व गंभीर समजला जातो. गेल्या वर्षी नेपाळला उद्ध्वस्त करणारा भूकंप ७.८ क्षमतेचा होता. अलीकडे भूकंपाचे प्रमाण आणि चर्चा वाढली आहे. या पृथ्वीवर आपण करीत असलेल्या आघातांचा यात वाटा असू शकेल का? जेवढ्या शक्तीने आणि जेवढ्या वेगाने पृथ्वीवर आघात करता येतील तेवढे करणे सुरु आहे. जणू त्याची चढाओढच लागली आहे. अगदी तुम्हीआम्ही देखील यात सहभागी आहोत असे समजायला हरकत नाही. विमाने, रेल्वे, स्वयंचलित वाहने, बांधकामे, अणुस्फोट, सौंदर्यीकरणे, डीजे... अशा अनेक गोष्टी चढत्यावाढत्या प्रमाणात सुरु आहेत. हे धक्के आम्हाला जाणवत नाहीत असे नाही. डीजेच्या हादऱ्यांनी जीव गेल्याच्या गणेशोत्सवातील बातम्याही जुन्या झाल्या आहेत. तरीही हे कमी करण्याऐवजी वाढवता कसे येईल याचाच प्रयत्न सुरु असतो. सामान्य माणसालाही तेच हवे असते. प्रत्येक जिल्ह्यात विमानतळ असावे ही जिल्ह्यातील सामान्य लोकांचीही इच्छा असते. तो विकासाचा मापदंडही असतो. हेच योग्य आहे असा आपला समजही असतो. त्यात काही वावगे आहे किंवा असावे हे आमच्या मनाला स्पर्शही करीत नाही. पण आम्हाला वावगे वाटत नसले किंबहुना योग्य वाटत असले तरीही परिणाम होतच असतात. माती, पाणी, डोंगर, जंगल, खनिजे, त्यांचे पोत आणि प्रत हे निसर्गाच्या गतीनेच होत असते. अगदी आईच्या पोटातील बाळाची वाढ होण्यासाठीही अजूनही नऊ महिने लागतातच. आम्हाला मात्र घाई सुटली आहे. आम्हाला दोन दिवसात मूल मिळाले तरी हवे आहे. कदाचित आम्ही ते मिळवूही. आपल्या हातातील गोष्टींचा वेग वाढवूही, पण निसर्गाला वेग वाढवण्यासाठी आम्ही बाध्य करू शकत नाही. हे आघात केवळ भूकंप येण्यापुरते मर्यादित आहेत का? वास्तविक या आघातांचा परिणाम भूगर्भापर्यंत होतो. पाण्याचे स्रोत, पाण्याच्या वाहिन्या विकसित होण्यातही त्यामुळे अडथळे येतातच. अशा पुष्कळ गोष्टी. निसर्गाचा वेग आणि पद्धती यावर आघात करून ती बिघडवणे शेवटी आपल्या तरी हिताचे ठरेल का? आधुनिकता, विज्ञान, प्रगती या नावांनी परिणाम टाळता येतात का? अन हे समजूनही त्यापासून परावृत्त न होणे याला दंभ आणि दर्प याशिवाय काय म्हणायचे?

- श्रीपाद कोठे

१४ एप्रिल २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा