शुक्रवार, ८ एप्रिल, २०२२

दान

भारतावरील कर्ज gdp च्या तुलनेत ९० टक्क्यांवर पोहोचले आहे, असे नाणेनिधीचा अहवाल म्हणतो. केंद्राच्या अर्थसंकल्पाप्रमाणे रुपयातील २० पैसे म्हणजे एक पंचमांश पैसे कर्जावरील व्याज देण्यात खर्च होणार आहेत. कर्ज नव्हे त्यावरील व्याज देण्यात. पुन्हा कोरोना दुसरी लाट सुरू झालेली आहे. नवीन दृष्टीने विचार करण्याची गरज आहे. 'दान' ही एक धार्मिक कल्पना असल्याचे आम्ही, पाश्चात्य प्रभावामुळे, नजीकच्या भूतकाळापासून समजू लागलो आहोत. वास्तविक ती आर्थिक कल्पना आहे. ती समाजात दृढमूल करण्यासाठी त्याला धार्मिक पाया देण्यात आला. जीवनाचे विविध पैलू नीट गुंफण्याची ती अनोखी भारतीय पद्धत होती. आज सगळाच विचार तुटक तुटक करण्याची पद्धत असल्याने त्याचे आकलन आपल्याला होत नाही. शिवाय व्यक्तिवादाची भोंगळ आणि विकृत कल्पना त्यात भर घालते. परंतु वर्तमान विचार आणि व्यवहार पद्धती बदलून 'दान' ही कल्पना पुन्हा समाजात मजबूत करण्याची गरज आहे. श्रीमंत व्यक्तींवर अधिक कर वगैरे फारसे उपयुक्त नाहीत. त्याऐवजी एक कोटी रुपये दान देऊ शकणाऱ्या आणि ते दान देऊनही ज्यांच्या आयुष्यात संपूर्ण जीवनभर काहीही अडचण येणार नाही अशा, एक कोटी लोकांना सरकारने उघडउघड दान मागावे. दान मागण्यात आणि देण्यात काहीही गैर नाही. सरकारकडे सगळी माहिती असते. त्यानुसार सरकारने देशासाठी किमान एक कोटी लोकांना प्रत्येकी एक कोटी दान मागावे. कोणाकडे दान मागितले ते जाहीर करावे आणि कोणी प्रतिसाद दिला तेही जाहीर करावे. यातून पैसा उभा होईल.  Liability राहणार नाही. विश्वास निर्माण होईल. कुचाळक्या होणार नाहीत. देशावरचा भार हलका होईल. अन योग्य नसले तरीही देशभक्तीची परीक्षाही होऊन जाईल. कधीकधी अशी परीक्षाही समर्थनीय ठरते.

- श्रीपाद कोठे

९ एप्रिल २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा