शनिवार, २ एप्रिल, २०२२

व्याजदर

व्याजदरांच्या संदर्भात केंद्र सरकारने एक निर्णय घेणे आणि लगोलग तो मागे घेणे, यामुळे ठेवींवरील व्याजाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. काही गोष्टींचा मुळातून विचार करायला हवा. बचतीवरील व्याजदर कमी असावेत यावर आर्थिक विचार करणाऱ्यांचे बहुतेक एकमत असते. यामुळे कर्जावरील व्याजदर कमी ठेवता येतात आणि अधिक कर्जउचल होऊन अर्थव्यवस्था गतिमान होते. सोबतच बचतीवर कमी व्याज असल्याने, खर्चाचा पर्याय लोक स्वीकारतात आणि त्यानेही अर्थव्यवस्था गतिमान होते. साधारण हाच त्याचा आशय असतो. मात्र -

१) बचतीवर ६ टक्के व्याज आणि कर्जावर ८-९ टक्के व्याज, आणि

२) बचतीवर १० टक्के व्याज आणि कर्जावर १२-१३ टक्के व्याज यात नेमका फरक काय?

दोन्ही पर्यायात खेळ तर २-३ टक्क्यातच खेळावा लागतो. तरीही सर्वदा सर्वत्र व्याजदर कपातीचा जोर का असतो? यामागे एक वेगळे अर्थकारण असू शकते.

मुख्य मुद्दा आहे मानसिकतेचा. सामान्य माणसाला एवढेच कळते की बचतीवर व्याज कमी मिळते मग तो बचतीऐवजी खर्च करू लागतो. परिणामी बचत कमी होते आणि भांडवल कमी उपलब्ध होते. मग उद्योग, व्यवसाय, विकास यांच्यासाठी भांडवल आणायचे कुठून? त्यासाठी अतिरिक्त चलन छापले जाते. यातून चलनवाढ होते. यातच जागतिकीकरणाची भर पडते. लहान अर्थव्यवस्थांना कर्ज दिले जाते. त्यातून debt trap तयार होतो. देशांतर्गत debt trap मध्ये सामान्य माणूस अडकतो आणि जागतिक व्यवस्थेत देश debt trap मध्ये अडकतात. शिवाय चलनफुगवटा, महागाई, टंचाई या गोष्टी एकावर एक free या पद्धतीने मिळतातच.

यातूनच 'पैशाकडे पैसा' जातो अशी स्थिती तयार होते. त्याच्या समर्थनासाठी त्याचे तत्वज्ञान तयार केले जाते. मुळात 'पैशाकडे पैसा' जातो ही स्थिती असू नये यासाठी प्रयत्न हवा. राज्यसंस्थेचे ते काम आहे. परंतु राज्यसंस्था ते करू शकत नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे, गुंतागुंतीची जागतिक जीवन व्यवस्था. या जागतिक जीवन व्यवस्थेचे काही फायदे आहेत तर असंख्य तोटे आहेत. याचे कारण म्हणजे जीवनाच्या प्रेरणा स्वार्थी, मतलबी, मालकी हक्क सांगणाऱ्या आणि वर्चस्ववादी आहेत. एक व्यक्ती असो, एखादा उद्योग असो की एखादा देश; त्यांचे बहुशः क्रियाकलाप याच प्रेरणांनी होतात. मग एखाद्याला वेगळी वाट चालायची असेल तरी फारसा वाव राहत नाही. वेगळी वाट चालणे शक्यही होत नाही.

वेगळ्या वाटेने जायचे असेल तर त्याची किंमत चुकवण्याची तयारी हवी. किंमत न चुकवता मानवी कल्याणाची वाट चालता येईल हे म्हणणे पुरेसे निरर्थक आहे. ही वाट चालायची तर त्या वाटेची कल्पना असलेले आणि त्यासाठी किंमत चुकवण्याची तयारी असलेले लोक हवेत. असे लोक मोठ्या प्रमाणात हवेत. त्या अभावी यातून मार्ग निघणे नाही. हे लोक कसे आणि कुठून येणार?

******

व्याजदर कमी असण्यात गैर काहीही नाही फक्त त्यातून सार्थक अर्थव्यवस्था आणि अर्थकारण आकारास यायचे असेल तर, कमी व्याजदराला घटत्या किंमतींची सोबत हवी. व्याजदर कमी कमी आणि किमती अधिक अधिक, यातून काही साध्य होणार नाही. व्याज आणि किमती दोन्ही कमी होतील असे पाहिले पाहिजे. तसे न होण्यातच वखवखलेल्या अर्थमार्तंडांचे हित असते अन तोच त्यांचा हेतूही असतो.

- श्रीपाद कोठे

३ एप्रिल २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा