गंमत, राग आणि दु:ख एकत्र होऊ शकतं का? मला आज तो अनुभव आला. साडेसहा सातच्या सुमारास नागपूरच्या व्हीआयपी रस्त्यावर होतो. डावीकडे पाहिलं तर चंद्र झाकोळलेला. ग्रहण होतं ना? मग तशीच गाडी बाजूला घेतली आणि अर्धा तास मनसोक्त चंद्रग्रहण पाहिलं. ज्यांना व्हीआयपी रस्ता ठाऊक आहे त्यांना कल्पना येईल, पण बाकीच्यांसाठी काही खुलासा. रस्त्याच्या कडेला शे-पाचशे माणसे गाड्यांसहित थांबली तरी गर्दी झाली नसती. ट्राफिकलाही त्रास होण्याचा प्रश्नच नाही. रस्त्याला लागून पंजाबराव कृषी विद्यापीठाची मोकळी जागा. कडेला लावलेल्या झाडांची पानेही गळलेली. त्यामुळे इतका सुंदर आनंद घेता आला ग्रहणाचा. पण राग आणि दु:ख हे की, बाजूने शेकडो (कदाचित हजार सुद्धा) गाड्या जात होत्या, पण माझ्याशिवाय कोणालाही थांबावेसे वाटले नाही. कोणीही थांबले नाही अन ग्रहणबिहण पाहिले नाही. काय आहे त्यात? पैसा मिळणार, धांगडधिंगा करायला मिळणार, खायलाप्यायला मिळणार... नाही ना... मग कशाला थांबायचे? वेडं कोण झालंय जग की मी? काही कळत नाही.
- श्रीपाद कोठे
४ एप्रिल २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा