रविवार, ३ एप्रिल, २०२२

`सत्वा'वर लक्ष केंद्रित असणारे हनुमंत

आज हनुमान जयंती. मनापेक्षाही वेगवान, इंद्रियांवर ताबा असलेला, बुद्धिमतां वरिष्ठम, वायूचा आत्मज, वानर युवकांचा प्रमुख, श्रीरामदूत; अशा हनुमंताला नमस्कार असो. भारतीय परंपरेतील आदर्श व्यक्तिरेखेतील एक !! आज या महावीराला प्रणाम करताना मनात येतो आहे, त्याने केलेला लंकादहनाचा पराक्रम. सीता हे मानवी सत्वाचं व्यक्तीरूप आहे. तिला डांबून ठेवणारा रावण ब्रम्हज्ञ, बलसंपन्न, कुबेराला लाजवेल अशा संपन्नतेचा स्वामी आहे. मारुतीरायाचं लक्ष मात्र फक्त आणि फक्त `सत्वा'वर, सीतेवर, सात्विकतेवर आहे. त्याला तिची सुटका करायची आहे. अन `सत्व'विरोधकांना कापरं भरवायचं आहे. शारीरिक बळ, बौद्धिक बळ, आर्थिक बळ या कशापुढेही झुकायला ते तयार नाहीत. त्यांची शेपटी वाढतच वाढत जाते. कुठलीच गोष्ट त्यांना घाबरवू शकत नाही अन दीपवूही शकत नाही. सत्वावर लक्ष केंद्रित असणारा, कशानेही प्रभावित न होणारा, शक्ती-बुद्धी-युक्तीने परिपूर्ण महारुद्र हाच आज आदर्श व्हायला हवा.

हे म्हणत असताना आपली दृष्टी जगभर फिरते पण आपल्यावर जात नाही. हे टाळता यायला हवे. गजांत लक्ष्मीचा मोह न धरता लंका उद्ध्वस्त करण्याची प्रेरणा आणि हिंमत आमच्यात किती आहे. झुप्कन येणाऱ्या मोटारीतून उतरणाऱ्या स्त्री वा पुरुषाचा आमच्यावर विपरीत प्रभाव नसतो? अशा व्यक्तीपुढे तोंड उघडायला तरी आपण तयार असतो? पहिल्या पगाराचा आनंद साजरा करण्यासाठी मळलेली शाल पांघरून जाणाऱ्या आई-लेकीला अडवणाऱ्या, गरीब मुलाला हॉटेलच्या आतही आणण्यास मज्जाव करणाऱ्या किंवा महिन्याची कमाई नसणाऱ्या डॉक्टरला व्हिसा नाकारणाऱ्या पंचतारांकित संस्कृतीचा आमच्या मनावरील प्रभाव आणि पगडा हनुमंत भक्तीला शोभणारा म्हणावा काय? याच संस्कृतीत क्रिकेट आणि चित्रपट नायक, नायिकांचा समावेश करावा लागेल.

हनुमानाने लंकेची संपत्ती, महाल, हवेल्या यांची तर वाट लावलीच; पण तेथील जंगलही जाळून टाकले. स्वत: वनवासी असूनही जंगल खाक केले. कारण त्यात डांबलेल्या सत्वाची त्याला मुक्तता करायची होती. आज पूर्व- पश्चिम- उत्तर- दक्षिण- जंगलात डांबलेल्या सत्वाची सुटका करण्यासाठी बलभिमासारखे कठोर होण्याची गरज आहे. चहा कंपन्यांच्या मालकांपासून कामगारांपर्यंत कोणालाही पळवण्याच्या रूपाने असो, नक्षलवाद्यांच्या रूपाने असो, तस्करांच्या रूपाने असो, की जमीन माफियांच्या रूपाने असो; जंगलात कोंडलेल्या सत्वाच्या मुक्तीसाठी बजरंग पराक्रमाची गरज आहे.

रामराज्याची मूल्य, त्यांचे व्यावहारिक संदर्भ, संकल्पना या साऱ्याचं दर्शन घडवणारे हे व्यक्तित्व आहे. हनुमान चिरंजीव या अर्थाने आहेत. त्यांची शक्तीमत्ता, बुद्धिमत्ता, गुणवत्ता मनामनात जनाजनात जागो यासाठी प्रार्थना करूया.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शनिवार, ४ एप्रिल २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा