आंबे विकणारे दिसले आणि बाईक बाजूला घेतली, तर आंबे विकणाऱ्या त्या ३-४ जणांनी वेढून घेतलं. ये आम लो, ये आम मिठा है, काट के दिखाऊ क्या, पहले खा के देखो बाद मे लेने का... एकच गलका सगळ्यांचा. गाडी उभी सुद्धा केली नव्हती. मग तसाच गाडीवर बसून त्यांना म्हटलं- `मुझे देखने दोगे या नही? जो पसंद आयेगा ले लुंगा. पहले देखने तो दो.' मग शांत झाले. मनात ठरवलंच होतं, इथून आंबे घ्यायचे नाहीत. असा कलकलाट करणाऱ्या आणि माझं स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या आंबे विक्रेत्यांना हीच शिक्षा. (केवढा मोठा पराक्रम ना?) उगीच एक-दोन आंबे उचलून पाहिले. वास वगैरे घेऊन पाहिला. म्हटलं, पसंद नही है. पुढे निघालो.
माझी प्रतिक्रिया- काय हे आंबेवाले? तुटून पडतात अगदी. सुचू देत नाहीत.
पुढे एक जण दुकान थाटून बसलेला. आंबे चांगले वाटले. बाईक थांबवली, उभी केली. आंब्याच्या चार-पाच जाती होत्या. आंबेही चांगले. दुकानदाराला विचारलं- काय भाव आहे? तो आपल्याच तालात मग्न. आंबे हातात घेऊन पाहिले. रस होईल की चिरून खावे लागतील याचा अंदाज घेतला. पुन्हा विचारलं- काय भाव दिले आंबे? दुकानदाराने काहीतरी चुळबुळ केली फक्त. आंब्यांचा वास वगैरे घेऊन पाहिला. काही क्षण असेच गेले. चिडून गेलो. म्हटलं, `अरे भैय्या आम बेचना नही है क्या? मै कब से पुछ रहा हुं और आप है की जवाब ही नही दे रहे.' अखेर त्याला कंठ फुटला, `बोलो क्या चाहिये?' माझे उत्तर, `आम के दुकान मे आम ही लुंगा ना?' दुकानदार- `हां. कौनसा दू? कितना दू?' तिथे माझा संयम संपला. मनात म्हटलं, अरे बाबा पहले भाव बिव सांगशील की नाही? पण काहीही बोललो नाही. वळलो, गाडी काढली, मार्गाला लागलो. अपेक्षेप्रमाणेच तो काहीही म्हणाला नाही.
माझी प्रतिक्रिया- काय आंबेवाले असतात? धड बोलत सुद्धा नाहीत गिऱ्हाईकांशी.
सहज मनात विचार आला. एक जण असा, एक जण तसा; पण मी मात्र हे आंबेवाले म्हणून सगळ्यांना एकाच मापाने मोजतो. वास्तविक त्यांचा व्यवसाय फक्त सारखा. स्वभाव मात्र त्यांचे त्यांचे स्वत:चे. एखादा व्यवस्थित बोलणारा पण अंगावर न येणारा असा मध्यममार्गी आंबे विक्रेताही असू शकेलच. पण मी मात्र माझा एक अनुभव सगळ्या आंबेवाल्यांसाठी लागू करतो.
बाकी ठिकाणीही आपण बहुतेक असेच करतो आणि आपला अनुमान आणि निष्कर्षाचा खेळ सुरु असतो. एक-दोन अनुभव आले की लगेच, आपला समाज असा आहे तसा आहे इत्यादी. सवयी, स्वभाव, गुण वगैरे समाजाचे कसे असतील? मध्यंतरी वृत्तपत्रात एक लेख वाचत होतो. महिलाविषयक होता. लेखिकेने लिहिले होते- युरोपात महिलांनी मतदानाचा हक्क प्राप्त करण्यासाठी मोठा लढा दिला. आपल्या देशात तसा लढा द्यावा लागला नाही आणि लेखिकेची गाडी लगेच घसरली `आपला पुरुषप्रधान समाज'वर. म्हणजे काहीही चांगले होवो वाईट होवो, पुरुषप्रधान समाज म्हणून थोडी बोटे मोडलीच पाहिजेत. उदाहरणांची अशी जंत्री भरपूर देता येईल. मुद्दा एवढाच की एखाद्या गोष्टीचे सार्वत्रिकीकरण करून निष्कर्ष काढताना तारतम्य बाळगायला पाहिजे. सरधोपटपणे असे करता येत नाही.
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, २९ एप्रिल २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा