शुक्रवार, ८ एप्रिल, २०२२

वाघ्या अन वाघोबा

एक आटपाट नगर होतं. त्या नगरात एक दिवस सकाळीच शेजारच्या जंगलातील एक ढाण्या वाघ शिरला. गावात एकच पळापळ झाली. सगळा गोंधळ, आवाज, हाकारे, लाठ्याकाठ्या... हे पाहून वाघ कुठेतरी सांदिकोपऱ्यात दडला. वाघ दिसत नाही म्हणून थोड्याच वेळात गावकरी सुस्त झाले. मग सुरु झाल्या फोकनाड्या. त्यातल्या दोघांचा सुरु झाला वाद. एक जण म्हणाला, गावात घुसला आहे तो आहे वाघ्या; तर दुसरा म्हणाला, गावात घुसला आहे तो आहे वाघोबा. झालं दोघेही इरेला पेटले. एक म्हणे- वाघ्या, दुसरा म्हणे- वाघोबा. बाकीचे लागले त्या दोघांना पेटवण्याच्या मागे. कोणी तेल ओत, कोणी काड्या सरकंव, असं सुरु झालं. असाच थोडा वेळ गेला अन गाव दणाणून सोडणारी डरकाळी फोडून तो जो कोणी होता त्याने झेप घेतली. अन वाघ्या अन वाघोबा करणाऱ्या दोघांचीही मानगूट एकदम एकाच जबड्यात पकडून त्याने धूम पोबारा ठोकला जंगलाच्या दिशेने. मागे गावकरी धावले पण कसचे काय? आले हात हलवत परत. दोन दिवस वाट पाहिली त्या दोघांची, शोधाशोधही केली. अखेर आता गावकऱ्यांनी गावाच्या वेशीवरच फलक लावला आहे म्हणे- `वाघ्या म्हटले तरी खातो अन वाघोबा म्हटले तरी खातो.'

- श्रीपाद कोठे

९ एप्रिल २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा